विलक्षण मानवधर्म भाग - २

(उत्तरार्ध)

‘क्षमेचा सागर असणारा भगवंत क्षमाशील आहे, भगवंताचे कार्य मानवाला शिक्षा करणे हे नसून मानवाला प्रारब्धाच्या गुलामीतून सोडवून मानवाचा समग्र विकास करून आपल्या प्रत्येक लेकराला सर्वस्वी आनंदी बनवणे हीच भगवंताची इच्छा आहे. तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचतच असते, त्यासाठी कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, भगवंत आणि त्याचा भक्त यांचे नाते थेट आहे, त्यांच्यात कुणाही एजंटची गरज नाही.’ अशी ही शाश्‍वत संकल्पना डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी श्रद्धावानांच्या मनावर ठसवली आणि सर्वसामान्य श्रद्धावानांचा प्रवास ‘भीतीपोटी भक्ती’कडून ‘प्रेमापोटी भक्ती’, ‘प्रेमापोटी कुलाचार’ असा घडवून आणला.

डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींच्या प्रत्येक कार्याचा पायाभूत सिद्धान्त आहे - ‘कॉमन इंटरेस्ट ऑफ कॉमन मॅन’. परमेश्‍वराच्या सर्वसामान्य कष्टकरी आणि गरजू लेकरांची निरपेक्ष सेवा करणे ही भक्तीचीच अभिव्यक्ती असल्याचे डॉ. अनिरुद्ध म्हणजेच बापू आवर्जून सांगतात. ‘सेवेलाही भक्तीचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या सेवेचा अहंकार मानवाला येत नाही. उलट, भगवंताने मला सेवा करण्याची संधी देऊन माझ्या प्रारब्धाचा भार हलका करण्याचा मार्ग दाखविला, ह्या भावनेने मानव भगवंताचा ऋणी राहतो आणि अधिकाधिक सेवा करत राहतो.’ या भक्तिसेवेच्या विलक्षण मार्गावर चालण्यास बापुंनी श्रद्धावानांना शिकवले.

पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या क्षेत्रात ‘कागदाच्या लगद्यापासून इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याचा’ उपक्रम हे बापुंच्या मार्गदर्शनाने सुरू झालेले आणखी एक विलक्षण कार्य आहे, ज्याचा विस्तार प्रत्येक वर्षी अधिकाधिक वाढतच चालला आहे. या उपक्रमा अंतर्गत काम करण्यासाठी मूर्ति बनवण्याचे विशेष कौशल्य असणे आवश्यक आहे असे नाही. आज अनेक ठिकाणी स्वेच्छेने अनेक श्रद्धावान या उपक्रमात मूर्ती आकार घेईपर्यंतच्या अनेक टप्प्यांतील कार्यात आनंदाने सहभागी होत आहेत. कार्य यशस्वी होण्यासाठी कार्याचे सर्वांमध्ये यथोचित वितरण करण्याची (डिव्हिजन ऑफ लेबर) दिशाही बापू याद्वारे देतात.

‘माझ्याकडे विशेष नैपुण्य नाही म्हणून मी काही करू शकणार नाही, माझा समाजाला काही उपयोग नाही’ या न्यूनगंडातून बापुंनी प्रत्येकाला बाहेर काढून ‘मलादेखील या विधायक कार्यात नक्कीच सहभागी होता येऊ शकते’ हा विश्‍वास प्रत्येकाच्या मनात जागृत केला आहे. विशेष कौशल्य नाही, वय जास्त आहे, कार्यस्थळापर्यंत प्रवास करून किंवा घराबाहेर पडून कार्य करणे शक्य नाही म्हणून कुणी भक्तिसेवेच्या कार्यापासून वंचित राहता कामा नये, हा बापुंचा हेतु बापुंच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणार्‍या कार्यात पूर्णपणे यशस्वी झाला आहे आणि हीच या कार्याची विलक्षणता आहे. भारताच्या संसदभवनावर २००१ साली अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाची आत्यंतिक गरज ओळखून बापुंनी ताबडतोब ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ची स्थापना केली आणि नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नागरिकांना नि:शुल्कपणे दिले जाऊ लागले. आजपर्यंत ७०,०००हून अधिक जणांना याचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले असून सुमारे ४५० प्रशिक्षक तयार करण्यात आले आहेत.

त्या काळी भारतीय आस्थापनांमध्ये या क्षेत्राबाबत फारशी जागृती नसताना नागरिकांना आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यास शिकवणार्‍या या संस्थेची स्थापना करणे हे बापुंचे विलक्षण कार्यच म्हणावे लागेल. युद्धकालीन आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी उपयोगी पडणार्‍या हॅम रेडियोचे प्रशिक्षणही श्रद्धावान घेत आहेत.

रक्तदानाचे महत्त्व सर्वच जण जाणतात. बापुंच्या मार्गदर्शनाखाली सन १९९९ पासून रक्तदान शिबिर दर वर्षी चालू झाले. बापुंच्या प्रेरणेने त्यांच्या श्रद्धावान मित्रांनी चालू ठेवलेला हा रक्तदानयज्ञ नक्कीच विलक्षण म्हणावा लागेल. सांघिक खेळ खेळणे हे मानवास आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असण्याबरोबरच ते त्याच्यात सांघिक भावना व खिलाडूवृत्ती निर्माण करणारे आहे. सांघिक खेळांमुळे मुलं लहानपणीच हार स्वीकारायला, पचवायला शिकतात आणि यामुळेच जीवनात त्यांना अपयशसुद्धा समर्थपणे पचवता येते, परीक्षेतील किंवा अन्य क्षेत्रातील अपयशामुळे खचून जाऊन ती आततायी निर्णय घेण्यापासून दूर राहतात आणि म्हणूनच उपलब्ध जागा आणि साधनसामग्रीमध्ये प्रत्येकाला उत्तम प्रकारे खेळ खेळता यावे यासाठी बापुंनी ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑ​फ ​स्पोर्टस् ऍण्ड बोन्साय स्पोर्टस्’ ची स्थापना केली. खेळ फक्त युवावस्थेपर्यंतच खेळायचे ही आमची चुकीची संकल्पना बापुंनी आमच्या मनातून काढून टाकली. बापुंनी सुरू केलेल्या या विलक्षण उपक्रमाचा लाभ आज आबालवृद्ध घेत आहेत.

‘द फॅमिली दॅट प्रेज् टूगेदर, स्टेज् टूगेदर’ याप्रमाणे ‘द फॅमिली दॅट प्लेज् टूगेदर, स्टेज् टूगेदर’ हेदेखील बापुंनी आमच्या ध्यानात आणून दिले. १६ वर्षावरील मुलांना छोट्या छोट्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्यास बापू सांगतात, जेणेकरून पुढे जीवनात त्यांना उचित निर्णय घेण्याची सवय होते, ती समर्थपणे स्वत:हून उचित निर्णय घेऊ शकतात. भारत ‘समर्थ’ आणि ‘समृद्ध’ बनण्यासाठी भारतातील प्रत्येक गाव समर्थ व समृद्ध बनणे आवश्यक आहे आणि गावातील प्रत्येक छोट्यातील छोटा घटक समर्थ बनणे हाच खर्‍या अर्थाने ग्रामविकास होणे आहे. भारतातील सुमारे ७० टक्क्याहून अधिक समाज हा गावात राहतो आणि म्हणूनच या समाजाचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे, हा विचार बापुंनी आम्हाला दिला.

विज्ञान-तन्त्रज्ञान आणि कृषि व तत्संबंधित जोडधंदे या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित विकास झाल्याशिवाय ग्रामविकास आणि पर्यायाने समाजाचा व देशाचा विकास होणे शक्य नाही. डॉ. अनिरुद्धांनी हा दृष्टिकोन आम्हाला दिला. रामराज्याचा प्रवास ग्रामराज्याच्या स्टेशनपासून सुरू होतो आणि ग्रामराज्य म्हणजे ग्रामविकास’ हे सांगून बापुंनी ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑ​फ ​ग्रामविकास’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे कार्य आहे, ग्रामवासियांना शेती आणि तत्संबंधित जोडधंदे यांबद्दल नि:शुल्क मार्गदर्शन करून त्यांच्या सर्वांगीण विकासास सहाय्यभूत होणे. या संस्थेतर्फे गरजूंना प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडे उपलब्ध असणार्‍या स्रोतांचा वापर करून त्यांना स्वावलंबी बनवण्यास मार्गदर्शन करणे अशा दृष्टीने आवश्यक असणारे कार्य नि:शुल्क केले जाते. निराशाग्रस्त होऊन आत्महत्या करण्याची पाळी शेतकर्‍यांवर येऊ नये, ‘मी स्वावलंबी बनून प्रगती करू शकतो’ हा विश्‍वास त्यांच्यात जागृत करणे आणि गावातील प्रत्येक छोट्या घटकास समर्थ बनवणे यासाठी बापुंच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक अविरत परिश्रम घेत आहेत.

मुद्गलविद्या, वज्रमुष्टी, सूर्यभेदन इत्यादि भारतीय प्राचीन बलविद्यांची नावे आम्ही ऐकलेलीसुद्धा नसतात. समर्थ भारत घडवण्यासाठी भारतीय प्राचीन बलविद्यांचे महत्त्व ओळखून त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी भारतीय प्राचीन बलविद्येचे संशोधक, मार्गदर्शक व तज्ञ प्रशिक्षक म्हणून बापू कार्यरत आहेत. पुरुषांप्रमाणे महिलांनाही बलविद्येचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वत:बरोबर इतरांचेही संरक्षण करण्यास सक्षम बनविण्यासाठी बापुंनी अहिल्या संघाची स्थापना केली. आज जगात दररोज नवनवीन व अधिकाधिक घातक शस्त्रास्त्रे सर्वत्र निर्माण होत असताना, ह्या मिसाईल्सपुढे व अणुबॉंबपुढे किंवा अगदी गावठी हातबॉंबपुढेही तुमची प्राचीन बलविद्या किती उपयोगाची ठरणार? हा प्रश्न काही जणांना पडू शकतो. याचे निराकरण करताना बापू म्हणतात- ‘ही बलविद्या ह्या आण्विक शस्त्रास्त्रांप्रमाणे केवळ संहारविद्या नसून ही मनुष्याच्या कुठल्याही क्षेत्रातील क्षमतेचा व कुवतीचा उत्कर्ष करणारी विद्या आहे आणि त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की शस्त्रापेक्षाही शस्त्र चालविणारा अधिक महत्त्वाचा असतो व ही बलविद्या उत्कृष्टरित्या शस्त्र वापरणारे वीर निर्माण करते.

‘भारतीय प्राचीन बलविद्या’ या पुस्तकाद्वारे बापुंनी हे ज्ञान सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकाच्या उपोद्घातात म्हटल्याप्रमाणे या बलविद्येचा देशातील तरुणवर्गाला नक्कीच विशेष लाभ होऊ शकेल. सध्याच्या युगातील जीवघेण्या स्पर्धेमुळे व अनियमित जीवनशैलीमुळे देशातील तरुणवर्ग तणावग्रस्त बनला आहे. ऑफिसच्या अनियमित वेळा व कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तो स्वत:च्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष पुरवू शकत नाही, ज्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. अशा वेळेस शरीर, मन व बुद्धीला चालना देणार्‍या या ‘भारतीय प्राचीन बलविद्ये’चे तरुणांनी प्रशिक्षण घेतल्यास त्यांचे शारीरिक आरोग्य तर उत्तम राखले जाईलच, शिवाय मन व बुद्धीला चालना मिळाल्यामुळे, ते ज्या क्षेत्रात कार्यरत असतील, त्या क्षेत्रातही चांगले यश मिळवणे त्यांना सहज शक्य होईल.

भाषावाद, प्रांतवाद असे अनेकविध प्रश्‍न आज निर्माण होत असताना, मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषा या ‘मावशी’सारख्या आहेत, हा एक नवा विचार श्रद्धावानांच्या मनात दृढ करून बापुंनी त्यांना मातृभाषेशिवाय अन्य भारतीय भाषा शिकण्यासाठी उद्युक्त केले. सर्व भारतीय भाषिकांचे परस्परसौहार्द वाढावे व परस्पर-भाव-विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी, या उद्देशाने ‘भारतीय भाषा संगम’ची स्थापना केली. बापुंच्या मार्गदर्शनानुसार भारतीय भाषा संगमतर्फे ‘प्रवासी संभाषण मार्गदर्शिका’ (ट्रॅव्हल कन्व्हर्सेशन गाईड) प्रकाशित केली गेली. विविध भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषा यांमध्ये एकत्रित रूपात संवाद असणारे हे ट्रॅव्हल कन्व्हर्सेशन गाईड हा प्रवाशांचा एक विशेष मार्गदर्शक मित्रच आहे.

पाश्‍चिमात्य देशांमध्ये प्रचलित असलेले ‘डबल इनकम सिंगल किड’ किंवा ‘डबल इनकम नो किड’ या संकल्पनेचे लोण भारतात येऊ पाहत आहे. येणार्‍या काळातील या धोक्याबाबत आपल्या श्रद्धावान मित्रांना सावध करताना बापुंनी याची जाणीव करून दिली की जर कुटुंबात एकच मूल असेल तर दुसर्‍या पिढीनंतरच्या त्या कुटुंबातील अपत्यास काका, आत्या, मामा, मावशी असे कुणीच नातेवाईक उरणार नाहीत आणि स्वकेन्द्रित वृत्तीमुळे व एकाकीपणातून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अनेक समस्या नक्कीच जन्म घेतील. नातेसंबंध ही मानवाची एक फार मोठी गरज आहे आणि म्हणूनच अशा प्रकारच्या चुकीच्या संकल्पनांचे धोके बापुंनी वेळीच त्यांच्या श्रद्धावान मित्रांपर्यंत पोहोचवले.

आज सर्वच क्षेत्रांत ज्ञानाच्या अनेक नव्या दिशा आणि वाटा खुल्या होत आहेत. झपाट्याने होणार्‍या या बदलांची माहिती घेऊन स्वत:ला अप डेट करणे ही प्रत्येक क्षेत्राची गरज बनली आहे. पण सर्वच माहिती मिळवणे ही एका व्यक्तीकरिता अशक्यप्राय गोष्ट आहे आणि हे जाणून घेऊन श्रद्धावानांना मार्गदर्शक ठरतील अशी अनेक विषयांवरील ई जर्नल्स बापुंनी ‘द एक्सपोनेट ग्रुप ऑफ जर्नल्स’ या उपक्रमा अंतर्गत सुरू केली आणि विशेष म्हणजे ती सर्वांसाठी विनामूल्य उपलब्धही करून दिली. आजच्या या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनपद्धतीमुळे व्यक्तिगत स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वच स्तरांवर प्रत्येकाला आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. ‘आमचे नक्की कुठे आणि काय चुकते’ इथपासून ते आम्ही ‘निरामय जीवन कसे जगू शकतो’ येथपर्यंतच्या सर्व मुद्द्यांबाबत सर्वांना सहज समजेल अशा भाषेत डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी दि. १३ डिसेंबर २०१४ रोजी ‘सेल्फ हेल्थ’ या महा-व्याख्यानात मुंबई अन्धेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलाच्या विशाल, भव्य मैदानात उपस्थितांशी संवाद साधला.

सर्वांसाठी नि:शुल्क प्रवेश असणार्‍या या महाव्याख्यानासाठी देश-विदेशातून जमलेल्या लाखाच्या सुजनसमुदायास अनिरुद्ध उचित आहार, व्यायाम, तेल व साखर, पाणी, व्हिटॅमिन डी, ताणतणाव, स्थौल्य, मेटाबॉलिक सिंड्रोम, मधुमेह, हृदयविकार, मणक्यांचे आजार, क्षयरोग, कर्करोग, अल्झायमर्स डिसीज, मानसिक आजार इथपासून ते पोस्चर, अर्दिंग, एपिडेमिक ऑफ मेल बॉडी हेट्रेड, एपिडेमिक ऑफ ब्युटी सिकनेस, एपिजेनेटिक्स आदि अनेक विषयांबाबत मौल्यवान माहिती देत होते. सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशा भाषेत या कठीण विषयांबद्दल सांगण्याची बापुंची हातोटी सर्वांनाच अवाक् करत होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बापुंनी कुठल्याही अपेक्षेशिवाय आपल्या मित्रांसाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा अनमोल खजिना खुला केला. आपल्या आरोग्यसमस्यांचे मूळ कारण जाणून घेऊन त्यानुसार प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे, याची जाणीव उपस्थितांना झाली.

म्हातारपण म्हणजे आजरपण, परावलंबी जीवन, उपेक्षित जीवन असे नसून वृद्धापकाळ समर्थपणे जगताना आम्ही स्वत:च्या अनुभवांनी इतरांचे जीवन समृद्ध करू शकतो, हा विलक्षण विचार बापुंनी सर्वांच्या मनात रुजवला. प्रत्येक वृद्धाचे जीवन कमीत कमी क्लेशदायी आणि अधिकाधिक आनंददायी कसे बनेल या हेतुने कार्य करणार्‍या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जेरिऍट्रिक्स अँड रीसर्च सेंटर’ची बापुंनी स्थापना केली.

स्वत: ऍलोपॅथिक डॉक्टर असूनही आयुर्वेद आणि होमियोपॅथीचाही बापुंनी सखोल अभ्यास केला व वेगवेगळ्या परिस्थितीत वेगेवेगळ्या उपचार पद्धातींचा उपयोग कसा करता येईल ही समन्वयाची भूमिका विशद केली. नासिक येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ संचालित ‘श्रीगुरुजी रुग्णालया’तील आयुर्वेद पॅकेजेसच्या उद्घाटन प्रसंगी बापुंनी तेथील डॉक्टरांशी संवाद साधताना ‘येऊ घातलेल्या तिसर्‍या महायुद्धाच्या काळात एनर्जी लेव्हलवर काम करू शकणारी होमियोपॅथी उपचारपद्धती नक्कीच उत्कृष्टपणे कार्य करू शकेल’ असे ठामपणे सांगितले. ‘पॅथींसाठी मानव नसून मानवासाठी पॅथीज आहेत’, हा दृष्टिकोन बापुंनी आम्हाला दिला. बापुंच्या मार्गदर्शनानुसार गेली बारा वर्षे कोल्हापूर-पेंडाखळे येथील आसपासच्या गावांमध्ये स्वच्छता व आरोग्य मोहीम राबविली जात आहे आणि त्या अंतर्गत वार्षिक आरोग्य व वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजनही पूर्णपणे नि:शुल्क केले जात आहे, ज्यात ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात येतात. गरजूंना चष्म्यांचे वाटपही करण्यात येते. या शिबिरामध्ये रुग्णांच्या ई.सी.जी., एक्स-रे आदि तपासण्या करण्यात येतात व त्याचबरोबर दंतचिकित्सा सेवाही पुरविण्यात येते.

या वर्षी (२०१६मध्ये) शिबिरात एकूण १५,२१० रुग्णांची तपासणी नि:शुल्क केली गेली. १३७ शाळांमधील एकूण ९२७२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली गेली. त्यांना टोप्या, स्लीपर्स, दोरीवरच्या उड्या, रिंग्स, फुटबॉल, फ्रीसबीज, मेणबत्त्या, सुका मेवा अशा उपयुक्त साहित्याचे वाटप केले गेले. जुने ते सोने योजने अंतर्गत एकूण ८५ गावांमध्ये कुटुंबोपयोगी साहित्याचे वाटप केले गेले, ज्याचा लाभ एकूण ८१०१ कुटुंबांना झाला. या उपक्रमाचा लाभ घेणार्‍या गावांमधील दोन विद्यार्थ्यांनी आज वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

Kolhapur Medical Camp गेली बारा वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे व २०१७ हे या उपक्रमाचे १३वे वर्ष असेल. १० एकर जमिनीवर पसरलेला ८०,०० स्केअर फूटचा मंडप, जवळपास ४००० स्वयंसेवक, १५०००हून अधिक जणांची आरोग्य तपासणी, गरजूंना औषधे, चष्मे देणे, ५५,००० ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचा लाभ आणि एवढे सर्व असूनही कुठेही गोंधळ गडबड नाही, सर्व काही शिस्तीत चालणे या अत्यंत विस्मयकारक गोष्टीच आम्हाला या उपक्रमाची विलक्षणता दर्शवतात.

गावागावांमध्ये फिरून केलेल्या सर्वेनुसार दंतमंजन, साबण, पाणी शुद्ध करण्याचे औषध, गोधडी अशा अनेक जीवनावश्यक वस्तुंचे वाटपही करण्यात येते. या साहित्यात, मुलींच्या केसांत जटा न होऊ नयेत यासाठी फणीचा आवर्जून समावेश केला जातो. फणीसारखी छोटीशी वाटणारी गोष्ट किती महत्त्वाची आहे, हे ध्यानात घेऊन या आरोग्य शिबिराची संकल्पकता, आखणी आणि नियोजन करणे हीदेखील बापुंच्या कार्यातील खरोखरच विलक्षण गोष्ट आहे. ‘अन्नपूर्णाप्रसादम्’ उपक्रमा अंतर्गत ग्रामीण, आदिवासी विभागांतील शालेय विद्यार्थ्यांना रोजचे दुपारचे भोजन विनामूल्य पुरविले जाते. स्वयंसेवक स्वतः अन्न शिजवून मुलांना प्रेमाने वाढतात. सध्या एकंदर १६ शाळांमधील १६०० विद्यार्थी ह्या सेवेचा लाभ घेत आहेत.

आज बापुंचे श्रद्धावान मित्र स्वत:च्या कौटुंबिक जबाबदार्‍या आणि नोकरी-व्यवसाय सांभाळून, पदरमोड करून, स्वत:चा वेळ देऊन, श्रम करून कुठल्याही अपेक्षेशिवाय सर्व प्रकारच्या उपक्रमांंमध्ये उत्साहाने सहभागी होतात आणि याचं कारण एकच आहे, बापुंचं त्यांच्यावर असणारं निरपेक्ष प्रेम आणि बापुंच्या प्रेमाला ते देत असलेला प्रतिसाद. एवढ्या प्रचंड प्रमाणावर विविध सेवा निरपेक्षपणे करून घेणारा सुसंस्कृत श्रद्धावान वर्ग सक्रिय करणे हे बापुंचे अत्यंत विलक्षण आणि त्याचबरोबर लक्षणीय कार्य आहे. बाह्य जगाचं ऐंशी टक्के ज्ञान आपल्याला दृष्टीद्वारे मिळते. पण दृष्टिहीनतेमुळे ज्यांना याचा लाभ मिळत नाही अशा बांधवांचं काय! स्वप्रयासाने शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यासाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांचा ही मंडळी अभ्यास करतात, पण सर्वच पुस्तके ब्रेल लिपीत छापणे शक्य नाही. त्याचबरोबर सतत पुस्तकावर हात फिरवून त्यांची बोटेही दुखतात. करुणाहृदयी अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली या बांधवांसाठी श्राव्य माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य ‘अनिरुद्धज् बँक फॉर द ब्लाइंड’ या संस्थेद्वारे केले जाते.

ह्या उपक्रमा अंतर्गत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित ऑडिओ कॅसेट्स आणि सीडीज बनवून त्या विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. ह्यात शालेय अभ्यासक्रमाच्या विषयांबरोबरच मोटर कॉइल वाइंडिग, लेथ ट्रेनिंग आदि टेक्निकल विषयांचे अभ्यासक्रम, ऍक्युप्रेशरसारख्या अपारंपारिक उपचारपद्धतींचे अभ्यासक्रम , एम.ए., बँकिंगच्या परीक्षांचा अभ्यासक्रम अशा अनेक विषयांचा समावेश आहे. हे रेकॉर्डिंग कोणतीही इच्छुक व्यक्ती घरी बसूनही करू शकते. शाळांच्या मागणीनुसार बडबडगीते, गोष्टी, सामान्य ज्ञान इत्यादिंवर आधारित कॅसेट्स आणि सीडीजही बनवून देण्यात येतात. आजपर्यंत भारतातील एकूण ३२ राज्यांमध्ये ११ भारतीय भाषा (यांत संस्कृत आणि उर्दूचाही समावेश आहे) व इंग्लिश भाषा यांमध्ये १५,३९३ सीडीजचे (पूर्वी कॅसेट्स प्रचलित होत्या तेव्हा ३०,७२१ कॅसेट्स) वाटप नि:शुल्क करण्यात आले आहे. सर्व राज्यांमधील सर्व परीक्षापद्धतींच्या पहिली ते दहावीच्या इयत्तेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे रेकॉर्डिंग या उपक्रमा अंतर्गत केले जाते. अभ्यासक्रमात बदल झाल्यावर बदललेल्या पाठ्यपुस्तकांचे पुन्हा रेकॉर्डिंग करून दिले जाते. ही प्रक्रिया आजतागायत सुरू आहे व हे या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

दृष्टिहीन बांधवांना दैनंदिन आयुष्य जगण्यासाठीही जी विशेष आंतरिक शक्ती लागते ती परमेश्‍वर त्यांना नक्कीच पुरवत असतो, परंतु त्यांचे जीवन सुलभ करणे किंवा त्यांना शक्य तेवढी मदत करणे ही आपली जबाबदारी आहे, या कर्तव्याची जाणीव बापुंनी आम्हाला करून दिली. बापुंच्या प्रेरणेमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेसाठी लेखनिकाचे कार्यही श्रद्धावान स्वत:हून करतात.

डोळे असूनही आम्ही वास्तवाला सोडून असणार्‍या आमच्या चुकीच्या कल्पनांमुळे अंधारातच चाचपडत असतो. आम्हाला सर्वार्थाने डोळस बनवण्याचे कार्य करण्यासाठी अनिरुद्धांनी ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज’ (एकूण तीन खंड) आमच्या हाती दिला. ग्रन्थ म्हटले की आम्हाला बोजड शब्द, तात्विक चर्चा यांनी भरलेलं, आम्हाला न कळणारं असं काही असतं असा आमचा ग्रह असतो. पण ग्रन्थराज हा श्रद्धावानांना जीवनात पावलोपावली उचित मार्गदर्शन करणारा, आधार देणारा मित्रच आहे आणि हा मैत्रीचा हात आपल्या श्रद्धावान मित्रांच्या हाती देण्याचे विलक्षण कार्य बापुंनी केले आहे.

परमेश्‍वरी मार्गावर चालून स्वत:चा समग्र विकास साधण्यासाठी भक्ती आणि मर्यादा पुरुषार्थाची कास कशी धरायची हे बापुंनी सहजसोपेपणे ग्रन्थराजाद्वारे सांगितले आहे. प्रपंच असो की परमार्थ, मानवी जीवनातील सर्व पैलूंचा परामर्श ग्रन्थराजात घेतला गेला आहे. ज्याने ग्रन्थराजाचा हात श्रद्धेने धरला आहे तो कधीच एकाकी, असहाय आणि दुबळा असूच शकत नाही; उलट तो श्रद्धावान अधिकाधिक समर्थ, संपन्न आणि समृद्धच बनतो.

अशा या विशेष विलक्षण भक्तिसेवेच्या कार्यात सहभागी होणे हाच श्रद्धावानांचा मानवधर्म; तर असे हे विशेष विलक्षण भक्तिसेवेचे कार्य आपल्या श्रद्धावान मित्रांना बरोबर घेऊन घडवून आणणे हा बापुंचा मानवधर्म!

अशा या विशेष विलक्षण भक्तिसेवेच्या कार्यात सहभागी होऊन आमचे जीवन कृतार्थ झाले हीच प्रत्येक श्रद्धावानाची भावना आहे आणि अशा या विशेष विलक्षण भक्तिसेवेच्या कार्याचे आम्ही आज साक्षी आहोत याचा आम्हां सर्व श्रद्धावानांना सार्थ अभिमान आहे आणि असेल.