साई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey

नेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात.

हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला आहे. तसेच संदीपसिंह महाजन, अंजनावीरा महाजन, सचिनसिंह वराडे ह्यांच्याबरोबर इतर सर्व जणांनी वेगवेगळी उदाहरणं देत, सद्गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या “मीपणाचा” त्याग करणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सद्गुरुंचे गुणसंकीर्तन ऐकणे आणि स्वत: करणे हे किती आवश्यक आहे ह्याबद्दल खूप छान विवेचन केले आहे.

आपण मागच्या वेळेला सपटणेकरांची गोष्ट बघितली. हेमाडपंतांच्या कथेपासून सपटणेकरांच्या कथेपर्यंत येऊन आपण पोहोचलो. या गोष्टीचं सार हेमाडपंत आपल्याला २ ओव्यांमधून सांगतात,

म्हणूनि केला निज निर्धार| अनुग्रह बाबांचा होयतोंवर|
तेथेंच वृत्ती ठेवूनि स्थिर| रहावें सुस्थिर मानसें |
त्रिविधतापें तापलेला | वरी साईंच्या दर्शना भुकेला |
ऐसा कोण विन्मुख गेला | जो न निवाला अंतरीं |

– (श्रीसाईसच्चरित अ.४८, ओ.१२५, १२६)

माझी वृत्ती कशी असायला हवी हे वरील पहिली ओवी दाखवते आणि अशी वृत्ती असेल तर साईनाथ कसा प्रतिसाद देतात हे दुसरी ओवी सांगते. त्याचप्रमाणे हा साईनाथ कुठल्या हाकेला साद देतो आणि कोणाला साद देतो हे खालील ओवी सांगते,

मी माझिया भक्तांचा अंकिला| आहें पासींच उभा ठाकला|
प्रेमाचा मी सदा भुकेला| हांक हांकेला देतसें|

– (श्रीसाईसच्चरित अ.११, ओ.७६)

सपटणेकरांच्या कथेमध्ये आपण पाहतो की त्यांच्या मुलाचा मृत्यु झाल्यानंतर, साईनाथ त्यांना न मागताही मुलगा परत देतात.

मी लोकांची पोरें मारितों| हा कां मशिदीस येऊनि रडतो |
बरें मी आतां ऐसें करितों| पोटासी आणितों पुत्र त्याचा|
जैसा मेलेला रामदास | दिला माघारा त्या बाईस |
तैसाच पुनश्च त्याचिये मुलास | आणितों मी पोटास त्याचिया |

-(श्रीसाईसच्चरित अ.४८, ओ.१४४, १४५)

त्यानंतर बाबांच्या शब्दानुसार पुत्रप्राप्ती झाल्यावर ८ महिन्यांच्या मुलाला घेऊन सपटणेकर साईनाथांच्या दर्शनाला येतात. (संदर्भ : अ.४८, ओ.१६७, १६८).

ह्या गोष्टीशी संबंधित श्रीसाईसच्चरितातील १४व्या अध्यायात एक थोडीशी वेगळी गोष्ट येते. शेठ रतनजी (Ratanji) (रतनजी शापूरजी वाडिया मिलकॉन्ट्रॅक्टर) हे पुत्रप्राप्तीच्या इच्छेने साईनाथांकडे येतात. “मनाची मुराद पुरवील अल्ला” असा त्यांना साईनाथांकडून आशीर्वादही मिळतो आणि रतनजींना पुढे पुत्रप्राप्ती होते. ही वंशवेल वाढत जाते पण परिस्थिती अशी होते की त्यांच्या १२ मुलांमधील ४ मुलच हयात राहतात. हेमाडपंत इथे स्पष्टपणे सांगतात,

यदृच्छेनें जें जें घडावें| त्यांतचि ज्याचें चित्त सुखावें|
ऐसे रतनजी गोड स्वभावें| खेद न पावले तिळभर|

– (श्रीसाईसच्चरित अ.१४, ओ.२००)

म्हणजेच रतनजींच्या बाबतीत सुखाबरोबर दु:खही आले. ह्या कथेवरून आपल्याला कळते की श्रद्धावानांना सद्-गुरुंच्या चरणी कशाची मागणी करावी आणि कशी करावी हे ठरवावं लागतं. “माझी तर इच्छा अशी आहे, पण तुझी इच्छा असेल तेच दे” हा भाव असावा लागतो कारण माझ्यासाठी काय उचित आहे हे सद्-गुरुंशिवाय कधीच कोणीही सांगू शकत नाही. आद्यपिपादादाही हेच सांगतात,

प्रारब्ध आणील पुढे काय काळ
आम्ही जरी नेणू करी प्रतिपाळ

आम्ही श्रीअनिरुद्ध महिमामध्ये हेच मागणे मागतो.

जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित|
हे मात्र मी नक्की जाणीत| नाही तक्रार राघवा|

त्याचप्रमाणे बापू आपल्या दिग्दर्शक गुरुंच्या गुणसंकीर्तनामध्ये (श्रीसाईमहिमामध्ये) म्हणतात,
मजला आवडो अथवा नावडो| तू जे इच्छिसी तेचि घडो|
हेचि मागता न अवघडो| जीभ माझी|

…आणि म्हणून हेमाडपंत आपल्या साईनाथांबरोबरच्या पहिल्या धूळभेटीनंतर आपल्याला सांगतात,

साईदर्शनलाभ घडला| माझिया मनींचा विकल्प झडला|
वरी साईसमागम घडला| परम प्रकटला आनंद|
साईदर्शनीं हीच नवाई|दर्शनें वृत्तीसी पालट होई|
पूर्वकर्माची मावळे सई| वीट विषयीं हळूहळू|

– (श्रीसाईसच्चरित अ.२, ओ.१४४, १४५)

म्हणजेच फक्त साईनाथांच्या, सद्-गुरुंच्या दर्शनाने काय झालं :
१) माझिया मनाचा विकल्प झडला – मनातील संकल्प विकल्प नष्ट होतात
२) परम प्रकटला आनंद – जीवनातील सर्वोच्च (परम) आनंद अनुभवता येतो.
३) पूर्वकर्माची मावळे सई – गतकर्माचा “अनिष्ट प्रभाव” लय पावू लागतो
४) वीट विषयीं हळूहळू – षड्-रिपूंपासून भक्त / श्रद्धावान लांब जातात म्हणजेच त्यात ते
सहजतेने अडकत नाहीत.

…आणि हेच “सद्-गुरुंना का शरण जावं” ह्याचं साधं आणि सोपं explanation हेमाडपंत आपल्याला देतात. बापूही आपल्याला नेहमी सांगतात की सर्वात मोठा चमत्कार कुठला – तर मनाची वृत्ती पालटणं, मनाचं नम: होणं (संदर्भ : श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज, सत्यप्रवेश, चरण ५, पान क्र. २५), आणि हाच सर्वात मोठा चमत्कार होय; जो हेमाडपंतांनी फक्त साईनाथांच्या (सद्-गुरुंच्या) दर्शनाने अनुभवला. हेच ते दर्शन महात्म्य जे कशाचीही अपेक्षा न ठेवता साईनाथांकडे गेलेल्या हेमाडपंतांनी अनुभवलं.

सच्च्या श्रद्धावानाला सद्-गुरुकडे कधीही काहीही मागावं लागत नाही. त्याच्यासाठी उचित ते सद्-गुरु देतच असतो. धूळभेटीच्या प्रसंगातून हेमाडपंत आपल्याला हेच दाखवून देतात. 

(फोरममध्ये(Forum) भाग घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:- https://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/topic/साई-द-गाइडिंग-स्पिरिट-हेम/)

Related Post

3 Comments


 1. जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित|
  हे मात्र मी नक्की जाणीत| नाही तक्रार राघवा|

  Ambadnya


 2. हरि ओम्…

  मागणे, सांगणे आणि मिळणे. ह्यामधील मनाची द्वंद येथे अभ्यासता येतात. ह्याच अध्यायात ….कर्म मात्र मीच करणार| समर्थ हरीगुरू फल देणार| ऐसा ज्याचा दृढ निर्धार| बेडा पार तयाचा| ओवी..४४. सद्गुरुना मागणे हे देखील कर्माचाच भाग आहे. कर्माच्या आधी हरीगुरू चरण स्मरले तर, तेच निवारतात भक्तांची चिंता अशा वेळी कर्माचे भोग भोगावयास न लागता त्याच्या कर्माचे हरीगुरू समर्थ पणे उचित आहे तेच फल देतात. कुठलेही मागणे हे मागणे ह्या अविर्भावात नसावे तर ते सांगणे ह्या उद्देशाने असावे. सांगणे पण कसे असावे तर, मी हवे आहे म्हणून मागत नाही तर ह्याची आवश्यकता माझ्या अल्पमतीला वाटते म्हणून सांगत आहे. जे काही तुझ्या इच्छे प्रमाणे होणार असेल तेच दे.

  मागणे माग्ण्याआधी मला काय सांगायचे आहे ह्या करता तुम्ही मला हवे आहत हे प्रेमाने बोलणे आवश्यक आहे त्यानंतर जरी चल हट.. असे असले तरीही अनुग्रह होई पर्यंत तिथेच स्थिर होणे भक्ताचा हा विश्वास पाहून मी तुमच्यापाशीच आहे हा प्रतिसाद येतो. परमात्मा कनवाळू आहेच, भरभरून देतो, पण मन मात्र सगळेच हवे असा मनाची मुराद घेऊन असते. मनाच्या मुरादातेत सगळे मिळते पण जेवढे आवश्यक आहे तेवढेच शिल्लक राहते. सुख आणि दुखः बरोबरीने येते. हेच जर तुला हवे तेवढेच दे असे म्हणतले तर कर्माच्या हव्यासापोटी येणारी दुख्खे मिळणार नाहीत.
  मागणे सांगणे आणि मिळणे म्हणजेच धूळ भेट होय. हेमाडपंत मनी साईंचा विचार करत होते. मोदभरीत मन कशाचीच अपेक्षा करत नव्हते फक्त दर्शन घेणे हेच मनी ठाम होते. त्यामुळे मागणे तर नव्हतेच, मनाचा आनंद मन मनाला सांगत होते त्यामुळे कुठलीही अपेक्षा नव्हती. दर्शनाने मिळाले ते मनाचे नमः होणे. सच्च्या श्रद्धावानाला सद्-गुरुकडे कधीही काहीही मागावं लागत नाही. त्याच्यासाठी उचित ते सद्-गुरु देतच असतात.
  धूळ भेटीने विकल्प गेला, आनंद प्रकटला. अनिष्ट प्रभाव कमी होत गेला आणि षडरिपू लांब गेले. एका निरपेक्ष भेटीने हे सर्व साध्य झाले. जे न मागताच मिळाले आणि जन्मोजन्मी शाश्वत राहिले. धूळ हे प्रतिक आहे सद्गुरूंच्या प्रेमाचे, लोटांगण आहे ते स्वःताच्या मी पणाला सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणे आणि भेट आहे ती स्वतःच्या शोधाच्या परिपूर्णतेची… एक ओळख नव्याने आपल्याच आपली मिळते. धूळ ही सद्गुरूंच्या प्रेमासारखी मोजता येत नाही, म्हणून ते सद्गुरूंच्या चरणांच्या आशीर्वादाचे प्रतिक आहे. षडरिपू दूर जातात ते लोटांगणमुळे आणि भेट होते ती आपल्या स्थिरतेची..शरणागत जावे ते असे. सर्वांगाने मन बुद्धी भाव एकत्रित आणून सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणे म्हणजेच..तुझिया चरणांची धूळ हेच आमचे गोत्रकुळ.

  परमपूज्य बापूंचे ८ मे चे हिंदी प्रवचन येथे आठवते, देवाजवळ तुमचा काय भक्तीभाव आहे ते महत्वाचे असते. जेथे भाव तेथे देव…प्रेमापाशी नांदे भक्ती| तेथेच अवघी शांती विरक्ती| तेथेच पाठी तिष्ठे मुक्ती| निजसंपत्ती समवेत| काम्य भक्ती ही असतेच पण ह्या भक्तीत जे जे मज साठी उचित ते तू देणार निश्चित्त हा भाव पाहिजे आणि तक्रार नको. मी माझे असणे ही निज संपत्ती ह्या निज संपत्तीला आपण सोडून जाणार असतो. आपल्याबरोबर असते ती कायम शांती, विरक्ती आणि त्याच बरोबर श्वासासंगे येणारी मुक्ती… प्रेम असेल तर ह्याच सगळ्या गोष्टींचा आनंद एकत्र घेता येतो.

  हे माय बाप गुरु सर्व काही तुझ्या इच्छेने……

  अंबज्ञ. अनुजावीरा पडसलगीकर.


 3. Hari Om Dada,

  I feel there is no problem in the world for which there is no solution in Saisatcharitra. In our daily life we face many problems but referring to similar situation in Saisatcharitra we can find the answer

  Ambadnya

Leave a Reply