सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

हिंदी

दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्याद्वारे लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्या ‘श्रीरामचरितमानस’मधील सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र’ या अग्रलेखमालेतील 1000वा लेख दि. 05-08-2014 रोजी प्रकाशित झाला. या अग्रलेखमालिकेतून श्रद्धावानांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यासंबंधी मार्गदर्शन बापु करत आहेत, दुष्प्रारब्धाशी लढण्याचे कलाकौशल्य शिकवत आहेत आणि त्याचबरोबर संकटांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची कलाही.
‘तुलसीपत्र’ अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांचे 1000 लेख पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्यातील मासिक ‘कृपासिंधु’चा अंक हा ‘सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात येईल, हे आपणा सर्वांना कळविण्यास आम्हाला अत्यंत आनन्द होत आहे.
या अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांनी चण्डिकाकुलाची ओळख, स्कन्दचिह्नाची माहिती, वेदांतील विद्या, गुरु-शिष्याचे नाते, भगवान किरातरुद्र आणि माता शिवगंगागौरी यांचे सात अवतार, हळद, आवळा, जव, मोगरा यांसारख्या वनस्पतींच्या उत्पत्तीची कथा, शिव-पार्वती विवाह, स्कन्द-कार्तिकेय आणि ब्रह्मणस्पति-गणपति यांची जन्मकथा, गणपतिवाहन मूषकराज कथा यांसारख्या अनेकविध महत्त्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले.
परमपूज्य बापुंच्या द्वारे लिहिल्या गेलेल्या या सहस्र तुलसीपत्रांचे संपूर्णपणे विवरण करणे अशक्य आहे, परंतु सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांकात डॉ. योगीन्द्रसिंह जोशी यांतील काही सारभूत मुद्यांबद्दल विवेचन करतील.
या निमित्ताने बापुंनी अग्रलेखमालिकेतून केलेल्या अनमोल मार्गदर्शनाची पुन्हा एकदा उजळणी होईल. सद्गुरु श्री अनिरुद्ध त्यांच्या श्रद्धावान मित्रांसाठी जे अथक परिश्रम करत आहेत, त्यांच्या प्रेमाला दिलेला हा प्रतिसाद असेल, त्यांच्या परिश्रमांना केलेले अभिवन्दन असेल.
ऑक्टोबर 2014 मध्ये ‘कृपासिंधु’चा हा विशेषांक मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकाचवेळी प्रकाशित होईल, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये हा विशेषांक गुजराती भाषेमध्येही प्रकाशित होईल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

– श्री. समीरसिंह दत्तोपाध्ये,
प्रकाशक, कृपासिंधु

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

1 Comment


 1. हरि ओम.
  अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ
  सहस्त्र तुलसीपत्र अर्चन विशेषांकाचे प्रकाशन-
  आपण सगळेच आतुरतेने वाट पहात असलेल्या कृपासिंधू मासिकाचा “सहस्त्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक” मराठी भाषेत प्रकाशित आला आहे. खरोखरीच आम्हाला मुळीच माहीत नसलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्या लाडक्या सदगुरु बापूंनी संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासांच्या “श्रीरामचरितमानस”मधील सुंदरकांडावर आधारीत “तुलसीपत्र” ह्या अग्रलेखमालिकेत लिहिलेल्या १००० च्या वर अग्रलेखांतून आम्हांला माहीत करून दिल्या आहेत. मोठी आई , हे लाडके आदिमाते आम्ही तुझ्या लाडक्या तृतीय पुत्राच्या परमात्म्याच्या म्हणजेच आमच्या बापूंच्याच कृपादृष्टीनेच तुझ्या चरणी अनंत वेळा अंबज्ञ आहे की हे जे अमूल्य भांडार आमच्यासाठी आमच्या बापूंनी मुक्त हस्ताने उधळले आहे.
  खरेतर आम्ही बापूंच्याच भाषेत सांगायचे तर नर्मदेतले गोटेच आहोत, ना आम्हांला वाचनाची सवय़ ना नवीन माहिती जाणून घ्यायची जिज्ञआसू वृती , तरीही आमच्या बापूंच्याच अकारण कारूण्याने , त्यांच्या आमच्यावरील लाभेवीण प्रेमानेच बापूरायाने हे अमृत आम्हांला पाजले आहे. जसे श्रीसाईसच्चरितात हेमाडपंत उल्लेख करतात की बाळाला कडू आवडत नाही तरी मातेला त्या बाळकडूची महती माहीत असते म्हणूनच ती आई आपल्या बाळाला आवडो अथवा ना आवडो, ते भोकाड पसरून रडू वा न पिण्याचा हट्ट करो तरी पाजतेच. तसेच आमची गुरुमाय, आमची बापूमाउली आमच्या गळी हे सारे अमृत उतरवितेच आणि तेही मोठ्या कौशल्याने अगदी छान छान गोष्टी सांगून.
  आता ह्या अंकात आपले महाधर्मवर्मन Doctor योगींद्रसिंह जोशी ह्यांनी एवढे सुंदर विवेचन करून पुन्हा एकवार त्या सर्व मौल्यवान खजिन्याची उजळणीच करवून दिली आहे. किती किती म्हणून गोष्टी बापूंमुळेच आम्हांला कळल्या आहेत जसे
  १. सुंदरकांडाचे माणसाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व – खरे सुख काय आणि कोणते आणि ते कसे मिळवायचे हे सहज , सोप्या भाषेत सांगणारी एक गुरुकिल्ली (MASTER KEY)
  २. भगवंताचे स्मरण – श्रद्धावानाच्या जीवनात जाबुवंत म्हणजे काय ?
  ३. रामनाम स्मरणाची माहात्म्य – भगवंताचा आश्रय घेणे म्हणजेच मोहावर मात करणे होय आणि म्हणूनच बापू कसे शिकवतात की प्रत्येक माता-पित्याचे हे आद्यकर्तव्यच की आपली संतती (मुले) बलसंपन्न व सुखी बनण्यासाठी लहान वयातच त्यांना परमात्म्याचे नामस्मरण व भक्ती यांचे वळण लावले पाहिजे.
  ४. हनुमंत लघुरुप धारण करतो महणजे काय? जीवनात प्रत्येक मनुष्यच सुखासाठी धडपडत असतो आणि राम-लक्ष्मण- जानकी समोर सर्व मान-सन्मान, कीर्ती, वैभव अर्थात अंहकार सोडून कसे शरण जायचे ? लंकिनी म्हणजे नक्की काय आणि तिचा सापळा कसा असतो आणि त्यातून सुटका कशी करून घ्यायची असते?
  ५. हृदय राखि कोसलपूर राजा ह्यात हा कोसलपूरचा राजा कोण? अरे हा तर आपला राम , माझा अनिरुध्दराम !!!
  ६. रससाधना कशी करायची आणि का?
  ७. तुम्ह ते प्रेमु राम के दूना – माझ्यापेक्षा माझ्यावर अनंत पटींनी हा माझा बापूरायाच कसा प्रेम करतो – बापू म्हणतात ” तुम्ह ते प्रेमु राम के दूना” हा अकच सिध्दांत ज्याला समजला त्याला चारही वेद कळले असे का?
  ८. ” पडत्या फळाची आ ” ही म्हण मराठीत का आली?
  ९. संकट आणि संकटावरील उपाय
  १०. प्रदक्षिणेचे महत्त्व
  ११. खारीकडून शिकण्याचा संदेश
  १२. सच्या श्रध्दावानाला मायावी तंत्राचे का भय नाही?
  १३. सीतेचा – जानकीमातेचा चूडामणी कोणता? मत्सरी लोकांची प्रार्थना भगवंतापर्यंत का पोहचत नाही?
  १४. सर्वश्रेष्ठ प्रार्थना कोणती?
  १५. रक्षक गुरु हनुमंत कसा कार्य करतो माझ्या जीवनात?
  १६. रामबाणाचे विवीध कार्य
  १७. भगवंत आणी भक्तातील तेल्याची भिंत कोणती आणि ती कशी पाडावयाची हे साईबाबांनी कसे शिकविले?
  १८.असुरवध कधी होतो?
  १९. चण्डिकाकुलातील बालत्रिविक्रम हा आईच्या मांडीवर बसण्या ऐवजी चरणांशी का बसला?
  २०. श्रीश्वास रूपी मूळ स्कंधचिन्ह कोठे असते?
  २१. “पावित्र्य हेच प्रमाण” का मानले जाते?
  २२. वालुकेश्वर शिवलिंग म्हणजे नक्की काय?
  २३. यव , मोगरा, हरिद्रा, रुद्राक्ष, वरूण, दुर्वा, सुपारींचा फुलोरा ह्यांच्या उत्त्पती कथा

  बापूराया आम्ही अम्बज्ञ अम्बज्ञ अम्बज्ञ आहोत तुझ्या चरणी !!! तुझ्या चरणी तूच आम्हांला दावीत असलेल्या भक्तीचा हात धरून देवयान पंथावरून चालत राहून तुला आवडत असलेल्या “चण्डिका स्पिरिच्युअल करन्सी” मधील तुलसीपत्रे वाहून अर्चन करू या हीच खरी अम्बज्ञता आम्हाला लाभो हीच प्रार्थना !!!!
  अम्बज्ञ अम्बज्ञ अम्बज्ञ !!!
  हरि ओम.

Leave a Reply