श्रीगुरुचरणमास - श्री हनुमान चलीसा पठण

श्रीगुरुचरणमास - श्री हनुमान चलीसा पठण

श्रीगुरुचरणमास (श्री हनुमान चलीसा पठण) आणि त्याचे महत्त्व यांबद्दल सदगुरु श्रीअनिरुद्धांनी १६ जून २०११ रोजीच्या त्यांच्या प्रवचनात सांगितले होते आणि श्रीगुरुचरणमासाची कथादेखील सांगितली होती. 

ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या कालावधीस श्रीगुरुचरणमास असे म्हणतात आणि सदगुरु श्रीअनिरुद्धांनी म्हणजेच बापूंनी सांगितल्याप्रमाणे दर वर्षी श्रीगुरुचरणमासात श्रद्धावान कमीत कमी एक दिवस श्रद्धावान 108 वेळा श्री हनुमान चलीसाचे पठण करतात आणि रक्षण करण्याची प्रार्थना रक्षकगुरु श्रीहनुमन्तास करतात.   

वटपौर्णिमा हा सण म्हटला की साहजिकच वटवृक्षाचे स्मरण होते. कथामंजिरी 2 ह्या अग्रलेखमालिकेत बापूंनी वटवृक्षाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. ‘वटवृक्षाची निर्मिती ही साकेतमधील कल्पवृक्षाच्या छायेतून घडलेली आहे आणि म्हणूनच स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाचे स्पंद वटवृक्षामध्ये असतातच’ असे कथामंजिरी 2-22 मध्ये बापू म्हणतात. 

कथामंजिरी 2-28 मध्ये स्वयंभगवानाच्या वटपत्रशयनी रूपाचा उल्लेख आला आहे. श्रीमद्‍भागवत पुराणात ऋषि मार्कंडेय यांना भगवन्ताच्या वटपत्रशयनी रूपाचे दर्शन झाल्याचा उल्लेख आहे, तसेच श्रीगुरुचरित्र अध्याय दोन मध्येही ‘अव्यक्तमूर्ति नारायण। होते वटपत्री शयन।’ असे म्हटले आहे. 

कथांजिरी 2-56 मध्ये बापू लिहितात - ‘वटवृक्ष हा एक आगळावेगळा वृक्ष आहे. प्रत्येक वटवृक्षाला अक्षयवटच मानले जाते कारण पारंबीरचनेनुसार कुठलाही वटवृक्ष कधीच मृत्यू पावू शकत नाही. हा प्रत्येक अक्षयवटवृक्ष ह्या आपल्या विश्वाचेच रूपक आहे. स्वयंभगवानाशी असणारे आपले नाते आपल्याला समजावून सांगण्यासाठीच ठिकठिकाणी वटवृक्ष तयार होत असतात.’ 

स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाशी असणार्‍या ह्या नात्याचे विस्मरण दूर होऊन त्याचे स्मरण रहावे यासाठी मनावर पडलेली धूळ स्वच्छ होणे आवश्यक आहे. श्री हनुमान चलीसाची सुरुवातच महान सन्त श्रीतुलसीदासजी करतात - ‘श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ...’ - श्रीगुरुचरणांची धूळ मानवी मनाचा आरसा स्वच्छ करते. 

माझ्या मनावर सद्गुरुंच्या चरणांची धूळ पडावी आणि माझ्या मनास निर्मलता लाभावी यासाठी श्रीगुरुचरण मला मिळावेत या भावाने या मासात म्हणजेच वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या कालावधीत श्रद्धावान हनुमान चलीसाचे जास्तीत जास्त वेळा पठण करतात, म्हणून या मासास ‘श्रीगुरुचरणमास' असे म्हणतात. 

श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 21 मे ते 27 मे 2023 ह्या सप्ताहात दररोज 108 पेक्षा अधिक श्रद्धावानांनी 108 पेक्षा अधिक वेळा श्रीहनुमान चलीसा स्तोताचे सामूहिक पठण अत्यंत भक्तिभावाने केले. आता दि. 3 जून 2023 वटपौर्णिमेपासून श्रीगुरुचरणमासास प्रारंभ होत आहे, ज्यामध्ये किमान एक दिवस श्रद्धावान श्रीहनुमान चलीसाचे 108 वेळा पठण करतात.   

वटवृक्षाशी नाते असणारी वटपौर्णिमा आणि सद्‍गुरुतत्त्वाशी नाते असणारी गुरुपौर्णिमा अशा श्रद्धावानांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या दोन पौर्णिमांमधील पावन पर्वाचा जणू सेतुच असणारा श्रीगुरुचरणमास श्रद्धावानांचे बोट धरून त्यांना भक्तिपथावरून पुढे नेणार्‍या रक्षकगुरु श्रीहनुमन्ताशी प्रेमाचे नाते जोडणारा आणि त्याचबरोबर श्रद्धावानांना श्रीगुरुचरणांशी जुळण्याची म्हणजेच भक्तिभावचैतन्यात राहण्याची संधी देणारा आहे.

Download Hanuman Chalisa here