देव माझा विठू सावळा (Dev Majha Vithu Sawala)

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत सांगितले.

‘देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा॥’ हा अभंग आम्ही लाख वेळा ऐकला असेल, पण आमच्या डोक्यात कधी हा प्रकाश पडला नाही. ‘देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा॥’ विठ्ठलाची माळ कधीच विठ्ठलाच्या गळ्यात राहिली नाही राजांनो. ती भक्तांच्या गळ्यासाठीच आसुसलेली असते. परंतु आम्ही कधीतरी, ही माळ तेवढ्या मनाने, प्रेमाने विठ्ठलाच्या गळ्यात घालायला हवी. गळ्यात फेकलीत, तर तो तर तुमच्याहून जास्त हुशार आहे. तो पण ती माळ, बरोबर फेकेल आणि तुम्हाला बरोबर बांधेल, जिकडे बांधायचंय तिकडे. कारण फासे टाकण्यामध्ये त्याच्या एवढा पटाईत कोणी नाही, हे त्याने पटवून दिलेलं आहे.

विठू सावळा
देव माझा विठू सावळा - Sadguru Shree Aniruddha Pravachan 13 Nov 2003

 

‘गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा। हार मिरविती गळा। टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव।’ टाळ-मृदुंगाची घाई झालेली आहे, म्हणजे कसं की टाळ आणि मृदुंग एका तालावर वाजावे लागतात; म्हणजे टाळाला घाई झाली की त्याच्याबरोबर धावण्यासाठी मृदुंगाला घाई होते. मग मृदुंग अधिक प्रेमाने धावायला लागतो, त्याच्याबरोबर टाळाला धावावं लागतं. टाळ आणि मृदुंग ह्या दोन गोष्टी अशा आहेत, ज्या एकमेकांबरोबर स्पर्धा करत एकमेकांना पुढे नेतात आणि मग गजर वाढत जातो, नामस्मरण वाढत जातं. ‘टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव।’ पुष्पवर्षाव म्हणजे ती फूल फेकत नाहीये कोणी तिकडे बसून, तर टाळ-मृदुंगामधूनच पुष्पांचा वर्षाव होतो. ह्या टाळ-मृदुंगाच्या गतीबरोबर, वाढत्या गतीबरोबर त्यांच्या एकमेकांमधल्या स्पर्धेमुळे ही पुष्पं फेकली जाताहेत? नाही. उधळली जाताहेत? नाही. ह्यांचा वर्षाव केला जातोय.

‘पुष्प उमलले जे माझे, वाहिले तुलाचि।’ - ही जी भावना आहे नं - ‘पुष्प उमलले जे माझे, वाहिले तुलाचि।’ ते पुष्प वाहण्यासाठी टाळ-मृदुंगाची घाई व्हावी लागते. टाळ आणि मृदुंगाची जेव्हा घाई होते तेव्हाच पुष्प वर्षाव होतो. हे पुष्प, माझ्या जीवनाची पुष्पं फुलतात. एकाची नाही, असंख्यांची फुलतात. माझ्या एकट्या मनाची नाही तर, माझ्या देहातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे एकशे आठच्या एकशे आठ, सगळ्या शक्तिकेंद्रांची फुलं होतात आणि मग माझी ती सगळीच्या सगळी फुलं, त्यांचा वर्षाव होतो आणि हा वर्षाव कोण, कोणावर करतं? ही फुलं देतं कोण? तो पांडुरंग! ही फुलं फुलवतं कोण? तो विठ्ठल! आणि मग ही फुललेली फुलं भक्त देतो कोणाला? पांडुरंगाला! मग वर्षाव कोण, कोणावर करतंय? देव भक्तांवर करतोय आणि भक्त देवावर करतोय. पांडुरंग भक्तांवर करतोय आणि भक्त पांडुरंगावर करतोय.

‘टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव।’ ज्याप्रमाणे टाळ आणि मृदुंगामध्ये स्पर्धा लागलीय, तशी स्पर्धा लागलीय देवामध्ये आणि भक्तामध्ये, कोण कोणावर फुलं उडवतो. ज्याप्रमाणे टाळ आणि मृदुंगाची घाई चालली आहे नं, टाळ आणि मृदुंगाची स्पर्धा चालली आहे की मी जास्त जोरात की तू जास्त जोरात. मग टाळ जोरात वाजवलेत की मृदुंग जोरात वाजतो. मृदुंग जोरात वाजला की अधिक स्पीडने टाळ वाजतात. त्याचप्रमाणे भक्ताने शंभर फुलं फेकलीत की देव दोनशे फेकतोय. देवाने दोनशे फेकलीत की भक्त तीनशे फेकतोय. भक्ताने तीनशे फेकली की देव चारशे फेकतोय. तुम्ही म्हणाल बापु, देवाने दोनशे फेकल्यावर, भक्त तीनशे कुठून फेकतो? ही एक्स्ट्रा आली कुठून? ही तो फुलवतो, त्या वाळवंटामध्ये आणि तो वर्षाव पण हा देवच करतो.

‘टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव।’ ही ‘घाई’ हा शब्द खूप आवश्यक आहे. घाई दोघांनाही झालेली आहे म्हणजे आम्हाला कळेल की आम्हालाच फक्त घाई नसते देवाला भेटायची, हा एकमेव सावळा विठ्ठल असा आहे की ज्याला आपल्या भक्ताला भेटण्याची आत्यंतिक घाई असते. त्याला जराही वेळ मध्ये गेलेला चालत नाही. तो एवढा आतुर असतो की आता एक मिनिटाने नाही, आत्ताच. आत्ताच ह्याच क्षणाला मला भेटायचयं. ‘उठाउठी भेटी आलिंगी वैष्णवा।’ हीच फक्त त्याची ओढ असते. पण त्यासाठी आम्हाला कुठेतरी उठायला हवं, हे मात्र विसरून चालणार नाही.

‘गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा। हार मिरविती गळा। टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव। अनुपम्य सुखसोहळा रेऽऽऽ।’ आणि असा हा खेळ वाळवंटी मांडलेला आहे की देव भक्तांची पूजा करतोय आणि भक्त देवाची पूजा करतोय, असा हा ‘अनुपम्य खेळ’, हा जो खेळ मांडलेला आहे, तो कुठला खेळ आहे? तर भक्तांनी देवाची पूजा करण्याचा आणि देवाने भक्तांची पूजा करण्याचा हा खेळ ह्या वाळवंटामध्ये मांडलेला आहे. असा खेळ दुसरीकडे कुठेही आम्ही बघू शकत नाही, आम्ही कधी बघितलेला नाही. हा फक्त ह्या वाळवंटातच खेळला जातो. ह्या चंद्रभागेच्या कुशीत, ह्या पंढरपुरामध्ये, ह्या भूवैकुंठावर म्हणजे पांडुरंगाच्या पायाशीच. ह्या विठ्ठलाच्या चरणांशीच फक्त हा खेळ खेळला जातो आणि हा खेळ कसा आहे, तर मांडलेलाच आहे म्हणजे हा चालूच आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

 

|| हरि: ॐ || ||श्रीराम || || अंबज्ञ ||

॥ नाथसंविध् ॥