हरि ॐ,
आज श्री रामनवमी असल्याच्या निमित्ताने अनेक श्रद्धावानांकडून, संस्थेतर्फे मागील काही वर्षांमध्ये साजर्या झालेल्या श्री रामनवमी उत्सवाची काही निवडक क्षणचित्रे पुन्हा पहावयास मिळतील का, अशी मागणी आली होती. यासाठी आज आपण सकाळी ११:१५ वाजल्यापासून या उत्सवाच्या काही व्हिडीओ क्लिपींग्स aniruddha.tv या वेबसाईट व अॅपच्या माध्यमातून दाखवणार आहोत. ह्या क्लिपींग्सचा कालावधी साधारण दीड तासाचा असेल.
त्याचप्रमाणे, दुपारी १:३० वाजल्यापासून ते संध्याकाळच्या नित्य उपासनेच्या वेळेपर्यंत, म्हणजेच ८:०० वाजेपर्यंत इंटरनेट रेडिओद्वारे आपण पुढील क्रमाने अध्याय, भजन व स्तोत्र अव्याहतपणे प्रसारित करणार आहोत.
१) श्रीसाईसत्चरित – अध्याय ११ वा
२) भक्तिभाव चैतन्य भजन
३) रामरक्षा
खाली दिलेली URL आपण वेब ब्राऊजर वर टाकल्यास आपल्याला इंटरनेट रेडिओ ऐकता येईल.
URL – radio.aniruddhabhajanmusic.com
पाळणा
बाळा जो जो रे कुलभूषणा । दशरथनंदना ।।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ।।धृ।। बाळा जो जो रे…..
पाळणा लांबविला, अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ।।१।। बाळा जो जो रे…..
रत्नजडित पालखी । झळके अलौकिक ।।
वरती पहुडले कुळदीपक । त्रिभुवननायक ।।२।। बाळा जो जो रे…..
हालवी कौसल्या सुंदरी । धरुनि ज्ञानदोरी ।।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकारी ।।३।। बाळा जो जो रे…..
विश्वव्यापकां रघुराया । निद्रा करी बा सखयां ।।
तुजवरी कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ।।४।। बाळा जो जो रे…..
येऊनि वसिष्ठ सत्वर । सांगे जन्मांतर ।।
राम परब्रह्म साचार । सातवा अवतार ।।५।। बाळा जो जो रे…..
याग रक्षुनिया अवधारा । मारूनि रजनीचरा ।।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरी गौतमदारा ।।६।। बाळा जो जो रे…..
परिणिल जानकी सुरूपा । भंगुनिया शिवचापा ।।
रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण हा सोपा ।।७।। बाळा जो जो रे…..
सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिला ।।
त्यांवरी उतरूनिया दयाळां । नेईल वानरमेळा ।।८।। बाळा जो जो रे…..
समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।।
देव सोडवील संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ।।९।। बाळा जो जो रे…..
राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।।
दास विठ्ठले ऐकिला । पाळणा गाईला ।।१०।। बाळा जो जो रे…..
।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।