आश्‍वासक बापू (Bapu's reassurance and care) - Marathi

ll हरि ॐ ll

 कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे.

‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत या लोकशाही असलेल्या सार्वभौम भारतामध्ये स्त्रीची काय लाज निघते, स्त्रीची अब्रु काय रस्त्यावर खेळली जाते आणि तिची काय दयना उडते... आणि ती बातमी बघताना, तिच्याशी काही संबंध नसताना तुमच्या सगळ्या अनेकांचं पित्त कसं खवळलं... ते मी ऐकलं, ते मी बघितलंय, आणि मला अभिमान आहे त्याचा. तुमचं पित्त खवळलं, तुम्हाला राग आला, तुमच्या मुठी वळल्या गेल्या, ह्याचा मला आनंद आहे. पण ज्या सगळ्या स्त्रिया इथे बसल्या आहेत, त्यांना मी एक सांगतो की निसर्गाने स्त्री आणि पुरुष हा भेद केला असेल, त्यानुसार शरीर रचना वेगवेगळ्या असतील, परंतु त्यांच्या नशीबामध्ये भेद केलेला नसतो. आजच्या काळात काही विशिष्ट वृत्तींच्या माणसांमध्ये पुरुषांवरही बलात्कार होतात.

माझा ह्या की त्या गोष्टीशी काहीच संबंध नाही. अन्याय करणारा, शोषण करणारा आणि ज्याचं शोषण होतं तो, ज्याच्यावर अन्याय होतो तो, ह्या दोनच जाती मी मानतो. स्त्रियांवर बलात्कार करायला कोणी आल्यानंतर कायद्याच्या वाटेने जाऊन पुढे कम्प्लेंट करेपर्यंत तो मनुष्य बलात्कार करून गेलेला पण असतो. कम्प्लेंट करून त्याला शिक्षा होईल, पण आयुष्यभर त्या स्त्रिच्या मनावर कोरलं गेलं त्याचं काय ? तिची जी दयना झाली त्याचं काय ? जिला प्राण मुकवायला लागले तिचं काय ? आज इथे बसणारे अनेक पालक हाच प्रश्न घेऊन आलेत. ‘बापू आमच्या मुली एकेकट्या जातात, आम्हाला भिती वाटते.’ गेली दोन वर्ष ही पत्र मला वारंवार येत आहेत. ‘बापू आम्हाला भिती वाटते की सकाळी बाहेर पडलेली मुलगी रात्री परत येईल ना नीट ?’ प्रत्येक चांगल्या स्त्रिच्या मनातही ही आज भिती आहे की कोण कुठे काय करील सांगता येत नाही. ‘चालत्या बसमध्ये जर बलात्कार होऊ शकतो, तर आता काय सगळेच मार्ग मोकळे झाले. त्यासाठी आम्ही काय करायचं ?’

आजच्या काळात मी बातमी ऐकतो की तरुण मुलांवरही काही पुरुष बलात्कार करतात, स्त्रियांवरही करतात. त्यांच्यासाठी मी काही कलमं सांगणार आहे.

कलम १:     जो शोषित आहे, जी बलात्कारिक स्त्री आहे, किंवा जो बलात्कारिक तरुण मुलगा आहे, त्यांनी अनिरुद्ध चलिसा दररोज १०८ वेळा ११ दिवस म्हटली, तर ज्याने, ज्याने बलात्कार केलेला आहे तो ताबडतोब नपुंसक होऊन जाईल हे माझं वरदान आहे. नुसता नपुंसक होईल असं नाही, तर त्याची नपुंसकता जगाला कळेल आणि त्याची छी-थू होईल हेही लक्षात ठेवा.

कलम २:     जी स्त्री किंवा जो असहाय्य तरुण मुलगा गुरुक्षेत्रम् मंत्र दररोज कमीतकमी ५ वेळा म्हणतो त्याच्यावर कोणी बलात्कार करूच शकणार नाही. अगदी १०० लोकांची गॅन्ग आली आणि ती व्यक्ती एकटी आहे, तरी देखील हे शक्य होणार नाही हे माझं वचन आहे. अशावेळी मी स्वत: आडवा पडेन हे लक्षात ठेवा. ज्यांना संस्कृतचा उच्चार अजिबात जमत नसेल त्यांनी हा गुरुक्षेत्रम् मंत्र मोडक्या तोडक्या भाषेत जरी म्हटला, तरी देखील तो करेक्ट (दुरुस्त) मी केलेला असेल आणि फायदा तुमचाच असेल हे लक्षात ठेवा.

कलम ३:     मातृवात्सल्यविंदानमला एक पारायण पद्धती आहे आणि आपण रेग्युलर पण वाचू शकतो. मातृवात्सल्य उपनिषद मी पूर्ण मोकळं ठवलंय. तुम्हाला पाहिजे तो अध्याय पाहिजे तितक्या वेळा वाचा. कुठल्याही क्रमाने वाचा. कसाही वाचा. ज्या स्त्रिला किंवा पुरुषाला अशी भिती वाटत असेल की आपल्यावर दुसरा पुरुष किंवा आपल्यापेक्षा बलवान व्यक्ती बलात्कार करू शकते, त्यांनी मातृवात्सल्य उपनिषद मधले शिवगंगागौरीचे २ अध्याय जे आहेत, त्यांचं एकदा जरी पठण केलं आणि त्यानंतर माता शिवगंगागौरीला सांगितलं की मला अशा, अशा व्यक्तीकडून भिती वाटते, तर त्याचं हे भय ताबडतोब नाहीसं झालेलं असेल कारण भयाचं कारणच नाहीसं झालेलं असेल, भितीचं कारणच उरणार नाही.

कलम ४:     आम्हाला मंत्र म्हणता येत नाही, तर काय करायचं ? ज्यांचं शिक्षण झालेलं नसेल, ज्यांना लिहीता वाचता येत नसेल, किंवा जीभ बोबडी असल्यामुळे नीट बोलता येत नसेल, किंवा आम्ही मुके आहोत, तर मनातल्या मनात फक्त ‘अनिरुद्ध, अनिरुद्ध, अनिरुद्ध’ एवढं म्हटलत तरी ही सगळी कामं, म्हणजे हे वाचन, पठण मी एकटा तुमच्यासाठी करीन आणि त्याचं फळंही तुमच्यापर्यंत आणून पोहोचवीन हे माझं प्रॉमिस आहे.

कलम ५:     अहिल्या संघ, बल ग्रुप आणि चण्डिका आर्मी जी आपण स्थापन केलेली आहे, त्यातील सर्व स्त्रियांना मी सांगतो की अहिल्या संघामध्ये मी तुम्हाला असं टेक्नीक देईन, की कोणी तुम्हाला हात लावायला आला, तर तुम्ही अवघ्या ५ सेकंदात जागच्या जागी त्याला कायमचा नपुंसक बनवलेला असेल. तुमचं वजन ३० किलो असलं, तुम्ही नुकत्या तापातून उठलेल्या असाल, तुमच्यात दोन कदम चालायची पण ताकद नसेल, तरी सुद्धा तुम्ही हे करू शकाल ही गॅरंटी मी तुम्हाला देतो.

स्वत:च्या भितीचा आता बाऊ करू नका. सुखाने, मोकळेपणाने श्वास घ्या. सुखाने आणि मोकळेपणाने जगा... कारण ह्या गुरुक्षेत्रम् मंत्रामध्ये दुसरं पद काय येतं ? ‘ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम:’. राम म्हणजे काय ? मर्यादा पुरुषोत्तम. सर्व मर्यादा घालून देणारा, सर्व मर्यादांचं पालन स्वत: करणारा, आणि सर्व मर्यादांचं पालन करून घेणारा. अशा ह्या रामाचा प्राण हनुमंत कसा असला पाहिजे ? प्राण म्हणजे त्यातील एनर्जी, त्यातली ताकद, ते घडवून आणणारी शक्ती. म्हणजेच हनुमंत म्हणजे मर्यादा पाळण्याची ताकद देणारा आहे... आणि ‘पावित्र्य हेच प्रमाण आहे’, त्यामुळे आमच्या पावित्र्यावर कोणी हल्ला करत असेल तर त्याच्या विरुद्ध जे काही करायचं असेल, त्याची ताकद आम्हाला कोण देणार आहे ? तो हनुमंत देणारच आहे. म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध तुम्हाला लढण्याची ताकद ह्या मंत्राच्या दुसर्‍या पदातून हनुमंत पुरवतो.’’

ll हरि ॐ ll