आनंदाचा उत्सव.. आत्मबल महोत्सव(The festival of Happiness Aatmabal Mahotsav)

ll हरि ॐ ll

आत्मबल महोत्सव

आत्मबल महोत्सवाच्या सरावादरम्यान नंदाई सर्व सख्यांबरोबर

 
 
रोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा... म्हणजेच २ दिवस चालणार्‍या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत.  
 
स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू करण्यात आला. अतिशय आगळ्या वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होण्यासाठी स्त्रियांच्या रांगा लागल्या . पण आपल्याला प्रश्‍न पडेल की हा उपक्रम  बापू  आणि नंदाई ह्यांनी का सुरू केला असेल?
नक्कीच हा उपक्रम कोणत्याही प्रकारची स्त्रियांची चळवळ उभी करण्याच्या ध्येयाने सुरू झाला नाही. तर कुठल्याही प्रसंगाला धैर्याने आणि आत्मविश्वासाने समोरी जाणारी सक्षम, स्वावलंबी कुटूंब वत्सल अशी खंबीर स्त्री घडविणे हा ह्या मागचा हेतू होता व आहे.
 
"पावित्र्य हेच प्रमाण" ह्या बापूंच्या मूळ सिद्धांतावरच आत्मबलचा हा वृक्ष आज दिमाखात उभा आहे. पहिला आत्मबलचा वर्ग सुरू झाला तो अवघ्या २८ स्त्रियांच्या सहभागाने, पण नंदाईने रूजवलेल्या ह्या छोट्याशा बीजाचे रूपांतर तिच्या प्रेमाने, कारूण्याने आणि अपार श्रमाने सुंदर रोपट्यात झाले व बघता बघता, त्याचा वृक्ष आज १३ वर्षानंतर १३०० स्त्रियांना बरोबर घेऊन गगनाला भिडायला निघाला आहे. लवकरच हा वृक्ष अधिकाधिक फोफावत जाऊन त्याचा वट वृक्ष होईल ह्यात शंका नाही. आता केवळ मुंबईतच नाही तर पुण्यातदेखील आत्मबलचा उपक्रम सुरू झाला आहे.
 
आत्मबल विकास वर्गात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला विकासाची दिशा मिळते ती नंदाईच्या बोलांमधूनच. नंदाई प्रत्येक स्त्रीशी, तिच्या प्रत्येक लेकीशी हितगुज करते. जणू तीच्या मनातले ओळखून तिला आत्मविश्‍वास देते. घराचा उंबरठाही कधीही न ओलांडलेली स्त्री असो वा कॉर्पोरेट सेक्टरमधील मोठ्या हुद्यावरील एखादी स्त्री असो, प्रत्येकीची जडण-घडण वेगळी. म्हणूनच प्रत्येक लेकीच्या विकासासाठी नंदाईची शिदोरीही वेगळीच असते.
 
येथे शिकविले जाणारे क्राफ्ट, व्यक्तिमत्त्व विकास, इंग्लिश आणि त्याच बरोबर केले जाणारे विविध विषयातील प्रोजेक्ट्स आणि इतर भरपूर काही हेच प्रत्येक स्त्रीला भौतिक आणि त्याचबरोबर पारमार्थिक प्रगती पथावर नेणारे असते.
 
आत्मबलमध्ये शिकविलेल्या इंग्लिशमुळे काही स्त्रिया परदेशातही आत्मविश्‍वासाने इंग्लिश बोलू शकल्या. तसेच अनेक स्त्रियांनी आपले अनुभव, आत्मबल महोत्सवातील, आत्मबल ते आत्मबदल, ह्या सदरामध्ये व्यक्त केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या जिवनात आत्मबलमधील आईच्या बोलांमुळे अमूलाग्र फरक पडून जीवनाला नवीन दिशाच मिळाली.
 
 
इथे शिकविलेल्या क्राफ्टवर अजून परिश्रम घेऊन काही स्त्रियांनी आपला व्यवसाय सुरू केला व त्या त्यांच्या व्यवसायात यशस्वीही झाल्या. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी स्त्री कुटुंबवत्सल असूनही वेळेअभावी घराकडे लक्ष देऊ शकत नसे. परंतु, आत्मबलमध्ये शिकवलेल्या टाईम मॅनेजमेंटमुळे ती स्त्री आज तिचे घर व करियर अशा दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळू शकते. अशी एक ना अनेक भरपूर उदाहरणे सापडतील.
 
अशा सर्व स्त्रियांना भेटण्याची नंदाईची आस, तिची ती ओढ...
"कशा असतील माझ्या लेकी?"
"कुठे असतील त्या आज?"
ह्या भावनेने नंदार्ईचे व्याकूळ झालेले मन आणि "आई, तू आम्हाला कधी भेटणार?", "पुन्हा कधी भेटणार?" अशी लेकींकडून सातत्याने घातली गेलेली साद ह्यातून साकार झालेल स्वप्‍न म्हणजेच उत्सवाचा आनंद आणि आनंदाचा उत्सव... '

आत्मबल महोत्सव!

आणि अशा पद्धतीने आत्मबल महोत्सवाचा घाट घातला. सर्वच्या सर्व आत्मबल बॅचच्या स्त्रियांना बोलावणं धाडलं गेलं. एवढ्या स्त्रिया एकत्र येणं... हीच खूप कठीण आणि अशक्यप्राय गोष्ट आहे असे अनेकांना वाटत होते, पण आईसाठी तीच्या लेकी आणि लेकींसाठी त्यांची आई बस्स!!! आई बरोबर पुन्हा एकदा यायला मिळणार ह्या एका गोष्टीने.... स्त्रिया पुन्हा एकत्र आल्या, आणि त्यांनी ४-५ महिने फक्त निख्खळ आनंद आणि तोही अतिशय सहज सोप्या मार्गाने उपभोगला नंदाईच्या सानिध्यात.
संपूर्ण आत्मबल महोत्सवाची रायटर, डायरेक्टर, कोरिओग्राफर फक्त नंदाईच होती. विविध नाटकं, डान्सेस्‌, चुटकुले ह्यांनी कार्यक्रम सजला होता. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी आईच्याच मार्गदर्शनाखाली होत होती.
 
एक स्त्री जेव्हा आनंदी आणि समाधानी होते तेव्हा ती हेच आनंद आणि समाधान तिच्या कुटुंबाला द्विगुणित करून देते आणि ह्याचाच प्रत्यय आला तो प्रत्येकीला तिच्या परिवाराकडून मिळणार्‍या उदंड प्रतिसादाने.
 
आणि मग बघता बघता आत्मबल महोत्सव येऊन ठेपला. महोत्सवाचा पहिला दिवस ५ नोव्हेंबर २०११. दोन दिवस उत्साहात सहभागी झालेली प्रत्येक स्त्री स्टेजवर येऊन आपली भूमिका सादर करत होती. अगदी सहजपणे, एखाद्या सराईतालाही लाजवेल अशा पद्धतीने आणि त्यांना पावती मिळत होती ती बापू, नंदाई, सुचितदादा ह्यांच्या कौतुकभरल्या नजरेतून आणि प्रेक्षक कुटुंबींयांच्या टाळ्यांच्या कडकडाटातून.
 
पाच महिने नंदाईची चाललेली अविरत मेहनत आज प्रत्यक्षात येत होती, जणू नंदाई तिच्या लेकींना सांगत होती...
या बाळांनो या रे या !
लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा!
 
ह्या शाळेत शिकलेल्या कवितेच्या ओळी माझ्या मनात रेंगाळत राहिल्या.
 
Aatmabal_Mahotsav_with_Bapu_And_Aai
 
आज खरच वाटत नाही की हा महोत्सव संपून एक वर्ष पूर्ण झाले. ह्या आठवणी प्रत्येकाला कायम जपता याव्या म्हणून त्याच्या डी.व्ही डी. ही काढल्या गेल्या. आज ही डी.व्ही डी. त्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला अनमोल ठेवा बनली आहे. माझी खात्री आहे असा हा भव्य व तेवढाच दिव्य कार्यक्रम क्वचितच कुठे झाला असेल. बापू व नंदाईच्या ह्याच आत्मबलमुळे सर्व सामन्य आयुष्य जगणारी स्त्री ही आज ताठ मानेने एखाद्या राजहंसाप्रमाणे आकाशात भरारी घेती झाली आहे. 
 
ll हरि ॐ ll