न्हाऊ तुझिया प्रेमे......Nahu Tuzhiya Preme

न्हाऊ तुझिया प्रेमे......

- डॉ. योगीन्द्रसिंह जोशी

न्हाऊ तुझिया प्रेमे..... दिनांक २६ मे २०१३. स्थळ - पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता.

सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची.

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे ‘माझ्या जीवनात माझा सद्गुरु सक्रिय आहे’ याबद्दलचा कृतज्ञताभाव आणि आनन्द साजरा करणे आहे.

हा प्रत्येकाचा आपल्या सद्गुरुशी सहज घडणारा अनिरुद्धसंवाद आहे. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही आम्हाला भक्ती शिखरी चढवण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे.

बापू आणि माई नंदा ‘माझे’ व्हावे, असे प्रत्येक श्रद्धावानाला वाटतच असते. पण हे मायबाप ‘माझे’ कधी होतील, कसे होतील? तर आद्यपिपादादांनी लिहून ठेवले आहे- "माझे बापू माई नंदा| मार्ग दाविती सुचितदादा॥"

परमपूज्य सुचितदादांनी दाखवलेल्या देवयानपथावरून चालण्यानेच बापू व माई नंदा ‘माझे’ होतात आणि ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या सोहळ्यात सहभागी होणे हे सुचितदादांचे मार्गदर्शन स्वीकारून देवयानपथावर समर्थपणे पुढे वाटचाल करणे आहे.

या कार्यक्रमाचे नावच सर्वकाही स्पष्ट करणारे आहे. आद्यपिपादादांच्या ‘न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा...’ या रचनेच्या ध्रुवपदाची ओळच या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. येथे आम्ही पाहतो की आद्यपिपांनी ‘न्हाऊ’ असे म्हटले आहे. ‘हे अनिरुद्ध प्रेमसागरा, आम्ही तुझ्या प्रेमात, तुझ्या प्रेमाने न्हाऊ’ असे ते म्हणतात. या रचनेत त्यांनी अन्य कोणतेही क्रियापद न वापरता ‘न्हाऊ’ असे म्हटले आहे.

अनिरुद्धप्रेमात मनाचे नाहणे यात अभिप्रेत आहे आणि ‘न्हाऊ’ या क्रियेत ‘आम्ही सर्व श्रद्धावान न्हाऊ’ असे बहुवचन वापरले आहे म्हणजेच ही सामूहिक उपासना आहे, सामूहिक भक्तिमय कृति आहे आणि यातच या सामूहिक सत्संगसोहळ्याचे मर्म आहे.

आंघोळ, स्नान करणे या क्रिया मानव नित्य करत असतो. पण आंघोळ करणे आणि नहाणे यात फरक आहे. लग्न होऊन सासरी गेलेली लेक जेव्हा माहेरपणाला माहेरी येते, तेव्हा तिची आई म्हणते की माझ्या लेकीला आता न्हाऊमाखू घालीन, तिचे कोडकौतुक करीन.

यातून आम्हाला कळते की आंघोळ ही क्रिया माणूस स्वत: करतो, तर त्याला न्हाऊ घातले जाते आणि न्हाऊ घालण्याची क्रिया पूर्ण प्रेमाने केली जाते. नहाणे म्हणजे काय? तर जिथे जलाचा प्रवाह, जलधारा सहज स्वाभाविकपणे वाहत असते, तिथे फक्त स्वत: प्रेमाने जाऊन स्वत:ला झोकून देणे, त्या जलधारा प्रेमाने स्वीकारणे. त्या वाहणार्‍या जलप्रवाहाची गतीच अशी असते की ती आपोआप आमच्या देहावरील सारा मळ धुऊन स्वच्छ करते, आम्हाला ताजेपणा, स्ङ्गूर्ती देते, आम्हाला शांति, तृप्ति आणि समाधान देते व मुख्य म्हणजे आनंद देते.

आमच्या मनालाही अनिरुद्धप्रेमात असेच नहायचे आहे, हेच आद्यपिपा आम्हाला ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ याद्वारे सांगतात. अनिरुद्धप्रेम हेच शाश्‍वत बरसणारे अमृत आहे आणि या प्रेमामृतातच आम्हाला न्हायचे आहे. ‘अनिरुद्धा, हे प्रेमसागरा आम्ही तुझ्या प्रेमातच न्हाऊ’ हाच यातील उत्तुंग भाव आहे. अनिरुद्धप्रेमात नाहण्याने आमचा प्रारब्धरूपी मळ अवघा वाहून जाणार आहे, कारण हे नाहणे शरीराचे नाहणे नाही तर हे मनाचे नाहणे आहे, हे सूक्ष्मदेहाचे नाहणे आहे.

त्यासाठीच या अनिरुद्धप्रेमसागराच्या कुशीत फक्त मला शिरायचं आहे, मग ते अनिरुद्धप्रेम मला न्हाऊ घालणारच आहे, माझा मळ, मरगळ, सर्व प्रकारची मलीनता दूर करणारच आहे. तो अनिरुद्ध प्रेमसागर तर मला कवेत घेण्यासाठी हात पसरून तत्पर उभाच आहे, मलाच त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायचा आहे आणि त्यासाठीच मला सहभागी व्हयचंय्- ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ मध्ये! या सोहळ्यात आद्यपिपादादा, श्रीकृष्णशास्त्री, सुशीलाताई, लीलाताई, मीनावैनी, साधनाताई या अंबज्ञ श्रद्धावानांच्या एकूण ४९ भक्तिरचना प्रस्तुत केल्या जाणार आहेत. या भक्तिरचनांद्वारे आपण सर्व श्रद्धावान सद्गुरुगुणसंकीर्तन आणि श्रवण दोन्ही करणार आहोत आणि कलियुगात हाच भवतापापासून मुक्त होण्याचा म्हणजेच दुष्प्रारब्धभोगरूपी काहिलीपासून मुक्त होण्याचा सरळ सोपा उपाय आहे.

प्रत्येक श्रद्धावानाला गुणसंकीर्तन करण्याची इच्छा असते. पण मी एक सामान्य श्रद्धावान असतो, मला माझे प्रेम, माझी कृतज्ञता, माझा भाव अभिव्यक्त करणारे शब्द सापडत नसतात. अशा वेळी या अंबज्ञ श्रद्धावानांच्या भक्तिरचनांमध्ये मी माझ्या भावाचे प्राकट्य अनुभवतो आणि आपसूकपणे त्या शब्दांमधून माझे प्रेम अभिव्यक्त होते, माझा अनिरुद्धसंवाद घडतो.

या अंबज्ञ श्रद्धावानांच्या प्रत्येक भक्तिरचनेचा गाभा स्वानुभव आहे, अनिरुद्धप्रेमात न्हाऊनच ती भक्तिरचना प्रकटलेली आहे. अंबज्ञ श्रद्धावानांच्या सर्वच भक्तिरचना मन्त्रमय आहेत आणि प्रत्यक्ष सद्गुरुंच्या उपस्थितीत त्यांचे श्रवण-कीर्तन करण्याने मला कित्येक पटीने पवित्र मन्त्रमय ऊर्जा नक्कीच मिळणार आहे. शेवटी, ‘मंत्रसुद्धा भावानेच सुफल देतात’ आणि अनिरुद्धप्रेमभावच सर्व मन्त्रांची ऊर्जा उचितपणे प्रवाहित करणारा आहे.

अनिरुद्धप्रेमात नाहण्याने नव-अंकुर-ऐश्‍वर्यांची प्राप्ती तर होणारच आहे, पण त्याचबरोबर प्रेमाचे कवचही लाभणार आहे. येणार्‍या काळात आकाशातून कधी काय बरसेल किंवा खरं तर कुठून कधी काय बरसेल, कोणती आपत्ती बरसेल हे सांगता येणार नाही अशी जागतिक परिस्थिति आहे. कलियुगात माणसाच्या मनाची स्थितिही काही वेगळी नाही. अनेक प्रलोभने, कुप्रवृत्ती, संशय किंवा अन्य आपत्ती मनावर कधीही बरसू शकतात. मानवाच्या जीवनात प्रारब्धभोगांचा पूर येतो, त्याला भवतापाचे चटके सहन करावे लागतात.

अशा परिस्थितीमुळे बाह्य आणि आन्तरिक दोन्ही स्तरांवर त्याच्या जिवाची काहिलीच होत असते. अशा प्रसंगी प्रेमाचे कवचच त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरते. मी सामान्य माणूस आहे, माझी भक्ती-सेवा थोडी आहे. हरकत नाही. मी श्रद्धावान आहे, मी जीवनात अंबज्ञत्व बाणत आहे, मी बापूंवर प्रेम करतो, मी सुचितदादांचे मार्गदर्शन स्वीकारतो, मी मर्यादाशील भक्तिपथावरून, देवयानपथावरून चालू इच्छितो, मग मला त्या प्रेमसागरात नाहण्यास मिळणारच आहे.

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ यात सामील होण्यासाठी प्रेमभाव हृदयात असणे आवश्यक आहे. मग मला अनिरुद्धप्रेमसागराचा एक थेंब जरी मिळाला, तरी तो थेंब माझ्यासाठी पुरेसा आहे, कायमसाठी आणि अवघेपणे. आम्हाला आद्यपिपांनी सांगितलेच आहे- ‘थेंब एक हा पुरा अवघे नाहण्या.’