गुरुपौर्णिमा उत्सव (Gurupournima Utsav)

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

श्रीगुरुगीतेमध्ये या श्लोकाद्वारे गुरुमहिमा वर्णिला आहे. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या महिन्याभराच्या काळास ‘श्रीगुरुचरणमास’ म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून सद्गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरुंना गुरुदक्षिणा देण्याची पद्धतही आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्ध तर कुणाकडूनच कधीही कुठल्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अगदी गुरुपौर्णिमेलाही ते साधी फुलाची पाकळीही स्वीकारत नाहीत. सद्गुरु बापू म्हणतात- “मला जर काही द्यायचं असेल तर मला तुमची पापं द्या, माझ्या मित्रांना पापमुक्त होऊन देवयानपंथावर समर्थपणे चालताना मी पाहू इच्छितो. रामरक्षा, हनुमानचलिसा यांसारख्या पवित्र स्तोत्रांची पारायणे मला द्या, ती मी माझ्या माय चण्डिका आदिमातेच्या चरणी अर्पण करीन आणि ती प्रत्येक श्रध्दावानाला निरंतर, निरतिशय प्रेमाची स्‍त्रोत असणारी आदिमाता नक्कीच त्याचे कोटीगुणे फळ देईल.”

सन १९९६ सालपासून श्रद्धावान अत्यंत आनंदात व उत्साहात गुरुपौर्णिमेचा हा भक्तिमय उत्सव साजरा करत आहेत. या उत्सवातील ठळक भक्तिमय सोहळे पुढीलप्रमाणे -

१. परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांचे आगमन:- साधारण १०:०० ते १०:१५ च्या सुमारास परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांचे उत्सवस्थळी आगमन होते. सर्वप्रथम औक्षण सद्‌गुरुंचे होते आणि त्यानंतर परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादा परम पूज्य श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादूकांचे पूजन करतात व त्यावर अभिषेकही करतात.

२. श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पूजन:- परम पूज्य श्रीनृसिंह सरस्वतींच्या या पादूका बापूंच्या देवघरात असतात. दत्तयागाच्या वेळेस याच पादूकांवर अभिषेक होतो. पूजन-अभिषेक झाल्यावर  सर्व श्रद्धावान ह्या श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. तसेच श्रद्धावानांना अभिषेक जल तीर्थ म्हणून दिले जाते.

३. श्री साईराम जप:- परमपूज्य बापूंच्या नित्यगुरुंच्या पादुका, तसेच श्री पूर्वावधूत आणि श्री अपूर्वावधूत कुंभ यांची जपस्तंभावर स्थापना केली जाते. परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादा तिघेही ‘रामनामवही’ पासून बनविलेल्या ‘इष्टिका’ मस्तकावर धारण करून या जपस्तंभा भोवती ‘श्रीसाईराम जप’ म्हणत प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर सर्व श्रद्धावान देखील ह्या ‘इष्टिका’ मस्तकावर धारण करून जपस्तंभाभोवती ‘श्रीसाईराम जप’ म्हणत प्रदक्षिणा घालू शकतात.

४. श्रीत्रिविक्रमपूजन व महापूजन:- सकाळी साधारण ९:०० वाजल्यापासून ‘त्रिविक्रमपूजन’ व ‘महापूजन’ यांची सुरुवात होते. इथे सर्व श्रद्धावान सद्गुरुतत्त्वाचे प्रतीक असणार्‍या श्री त्रिविक्रमाच्या तीन पावलांचे पूजन करू शकतात. त्रिविक्रमपूजन केल्याने माझ्या जीवनात हा सद्गुरुतत्वाची कृपा पावित्र्य, मन:सामर्थ्य आणि उद्धार ह्या तीन पावलांद्वारे येते व त्रिविक्रमाची मायेची पाखर धरली जाते. गुरुपौर्णिमेस सद्गुरुपूजन करण्याची श्रद्धावानांची इच्छा असते आणि सद्गुरुतत्त्वाचे प्रतीक असणार्‍या त्रिविक्रमपूजनाद्वारे त्यांची ही इच्छा फलद्रूप होते.

५. श्री अनिरुद्ध चलिसा:- उत्सवादरम्यान दर एक तासाने ‘श्रीअनिरुद्ध चलिसा’चा पाठ श्रद्धावान करतात व त्यानंतर परमपूज्य बापूंच्या हस्तस्पर्शासाठी श्रद्धावान उदी घेऊन जातात. ही सद्गुरुंचा हस्तस्पर्श झालेली उदी सर्व श्रद्धावान प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकतात.

६. पालखी:- सकाळी साधारण ९:०० वाजल्यापासून परमपूज्य सद्गुरुंच्या चरणमुद्रांचा पालखी सोहळा सुरु होतो. संपूर्ण दिवस ही पालखी उत्सवस्थळी फिरवली जाते जेणे करुन सर्व श्रद्धावान ह्या चरणमुद्रांचे दर्शन घेऊ शकतात.

७. श्रीअनिरुद्ध अग्निहोत्र:- परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादा ‘श्रीअनिरुद्ध अग्निहोत्रात’ ऊद अर्पण करतात. प्रत्येक श्रद्धावान येथे ऊद अर्पण करू शकतो.

८. सद्गुरु दर्शन:- सर्व श्रद्धावान स्टेजवर श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे, श्रीगुरु दतात्रेयांच्या मूर्तीचे, तसेच सद्गुरु-त्रयीचे दर्शन घेऊ शकतात. काही निवडक श्रद्धावान ‘ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:’ हा मंत्र म्हणत दिवसभर श्रीगुरु दत्तात्रेयांच्या तसबीरीचेच्या चरणी तुलसीपत्रे अर्पण करतात.

९. महाआरती :- रात्रौ साधारण ०९:३० वाजता महाआरती होते. परमपूज्य बापू स्वतः श्रीगुरु दत्तात्रेयांची आरती करतात व त्यानंतर निवडक श्रद्धावान सद्गुरुंची आरती करतात. आरतीनंतर श्रीअनिरुद्ध पाठ आणि गजर होतो. सर्व श्रद्धावान ह्या महाआरतीत व गजरात प्रेमाने सहभागी होऊ शकतात.

।। हरि ॐ ।।