गणेशोत्सव २०१५

या वर्षीदेखील आपल्या लाडक्या बापूंच्या घरचा गणेशोत्सव एका आगळ्यावेगळ्या आनंदात व उत्साहात पार पडल्याचे आपण सर्वांनीच अनुभवले. या गणेशोत्सवात बापूंनी, येणाऱ्या काळासाठी उचित ठरतील असे काही बदल केले होते. ह्यांतील सर्वांत लक्षणीय बदल म्हणजे दर वर्षी आपल्या भव्यतेमुळे, तरीही शिस्तबद्धतेमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत असलेली गणपतीची आगमनाची व पुनर्मिलापाची (विसर्जन) मिरवणूक ह्या वर्षीपासून न काढण्याचा बापूंनी घेतलेला निर्णय! एकंदरीत मुंबईभर नियमीत वाहतुकीची कोंडी होते व पोलिसांवर अतिरिक्त ताण पडतो. हा ताण कमी करण्याच्या उद्देशाने बापूंनी घरच्या गणपतीची मिरवणूक या वर्षीपासून न काढण्याचा निर्णय स्वत:हून घेतला. सर्व श्रद्धावानांकरिता हा मोठाच धक्का होता. याबद्दल अनेक श्रद्धावान मित्रांनी माझ्याकडे अगदी प्रेमाने खंतही व्यक्त केली होती. पण सदगुरु बापूंनी घेतलेला कुठलाही निर्णय हा कोणाला वरकरणी नकोसा वाटला, तरी तो अंतिमत: सर्वांच्या हिताचाच असतो, हे श्रद्धावान आता अनुभवाने जाणतातच व त्यामुळे श्रद्धावानांनी हाही निर्णय प्रेमाने स्वीकारलाच

.गणेशोत्सव २०१५

त्याचबरोबर दरवर्षी सर्व श्रद्धावानांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली, गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी रात्री होणारी महाआरतीदेखील या वर्षीपासून होणार नसल्याचे बापूंनी जाहीर केले. आरतीच्या वेळेस अर्थातच दर्शन थांबत असल्याने, त्या सुमारास दर्शनाकरिता आलेल्या श्रद्धावानांना दोन-अडीच तास रांगेत थांबावे लागे. शिवाय या काळादरम्यान गर्दी अजून वाढतच जात असे. हा वेळ कमी झाल्याने प्रत्येक श्रद्धावान मित्राला अत्यंत शांतपणे व मनसोक्त दर्शन घेता आले.
तसेच कार्यकर्त्यांनाही ह्या उचित बदलांचा चांगला फायदा झाला. आरतीनंतर ह्या खोळंबलेल्या श्रद्धावानांचे दर्शन पुन्हा सुरू केले जात असे व ते संपल्यावर मगच कार्यकर्ते घरी जात असत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना घरी पोहोचेपर्यंत पहाट उजाडत असे. ह्या वर्षी महाआरती नसल्याने कार्यकर्ते रात्री वेळच्यावेळी घरी पोहोचू शकले. यामुळे कार्यकर्त्यांवर येणारा ताणदेखील कमी झाला व ते दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने सेवेला येऊ शकले. या निर्णयांमुळे या उत्सवादरम्यान सगळ्याच गोष्टींमध्ये आलेली सहजता आणि सुलभता सर्वांनाच भावली.

गणेशोत्सव २०१५

त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी संस्थेच्या एएडीएम (अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट) च्या डीएमव्हीजतर्फे अनंतचतुर्दशीच्या दिवशी सेवा करण्यात आली. मुंबईमध्ये गिरगांव, वर्सोवा, जुहू, दादर, मार्वे, गोराई इत्यादींसह ठाणे, नवीमुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील एकूण ५४ ठिकाणीही आपत्ती व्यवस्थापन व क्राऊडकंट्रोलची सेवा देण्यात आली. यामध्ये एकूण ४३२४ डीएमव्ही (डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटीयर्स) सहभागी झाले होते. यामध्ये २७ डॉक्टर्स व २९ पॅरामेडिक्स्‌चाही समावेश होता.
हे आपल्या संस्थेचे डीएमव्हीज्, प्रशासकीय यंत्रणांना सहाय्यभूत ठरेल असे काम गेली कित्येक वर्षे करत आलेले आहेत व त्याकरिता त्यांची प्रशासकीय यंत्रणांकडून प्रशंसाही केली जाते. मागील वर्षी गिरगांव चौपाटी परिसरात गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी लावण्यात येणार्‍या प्लेट्सचे खांब अचानक वाळूमधून बाहेर निघाले होते. गणपती विसर्जनाकरिता (पुनर्मिलाप) वाळूत रोवून घट्ट केलेले खांब, अनंतचतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सैल झाले व त्यामुळे प्लेट्स निखळल्या होत्या. बीएमसी कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करूनही विसर्जन सुरू होण्याच्या वेळपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नव्हते. काही वेळातच विसर्जनासाठी आलेल्या लोकांची वाढती गर्दी सुरू झाल्याने हे काम पूर्ण करणे खूपच अवघड झाले. त्यावेळेस आपल्या संस्थेचे डीएमव्ही या कामासाठी मदतीला धावले. क्राऊड कंट्रोलसाठी तैनात करण्यात आलेल्या जवळपास ५० हून अधिक डीएमव्हीज्‌नी दोरखंडाने साखळी धरून, येणारी प्रचंड गर्दी दुसऱ्या दिशेने वळविली. यानंतर अवघ्या एका तासामध्ये बीएमसी कर्मचारी दुरुस्तीचे काम पूर्ण करू शकले व पुढील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. खरोखरच ह्या सर्व बीएमसी कर्मचार्‍यांचे काम वाखाणण्या जोगे होते. या प्रसंगात ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’च्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर्स’कडून दाखविल्या गेलेल्या प्रसंगावधानाचे व जबाबदारीचे कौतुक संबंधित बीएमसी ऑफिसर्सनी केले. आपल्या सर्व संस्थांची भूमिका नेहमीच प्रशासनाला सहाय्यभुत ठरली आहे.

गणेशोत्सव २०१५

डिझास्टर मॅनेजमेंट, अध्यात्म व विज्ञान, तंत्रज्ञान, भक्ती, ग्रामविकास व प्राच्यविद्या, अशा अनेक क्षेत्रांमध्ये व विषयांमध्ये सद्‌गुरु बापूंचे असेच ‘वास्तवाचे भान’ वेळोवेळी आपल्याला काळाबरोबर रहायला शिकवत आहे व त्यामुळेच आपली संस्था उत्तरोत्तर प्रगतीच करत आलेली आहे. बापूंच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण व आपल्या सर्व संस्था पुढे देखील अशिच प्रगती करत राहू, याची मला खात्री व समाधान आहे. गणपतीच्या या उत्सवादरम्यान कार्यरत असणार्‍या संस्थेच्या सर्व डीएमव्हीज्‌ व श्रध्दावान कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.