Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit-Hemadpant’s journey)

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ (Sai the guiding spirit-Hemadpant’s journey)

#7715

Suneeta Karande
Participant

Sai the guiding spirit-Hemadpant’s journey

हरि ओम. अंजनावीरांनी आतापर्य़ंत फोरममध्ये (Forum) भाग घेतलेल्या सर्व श्रद्धावानांच्या अभिप्रायाबद्दल खूपच सुंदर रीत्या विश्लेषण केले आणि त्यामधील गर्भितार्थ अगदी सुस्पष्टपणे मांडला आहे.अंबज्ञ.

पूज्य समीर दादांनी ह्या फोरमद्वारे आम्हां सर्व श्रद्धावानांना आपल्या लाडक्या सदगुरुला बापूला, साईंना जवळून न्याहाळायचे कसे आणि त्यासाठी संत-मंडळीनी, आदर्श व्यक्तीमत्त्वांनी दाविलेली पायवाट कशी चोखाळायची ह्याची अत्यंत सोपी दिशाच जणू निदर्शित केली आहे.श्रीराम आणि शतवार अंबज्ञ समीरदादा.
श्रीसाईसच्चरित आणि हेमाडपंत ह्यांना न्याहाळतानाच मीनावैनींनी गवसलेला माझा बापू ही मला भेटू लागतो ” साई (Sai) असे माझी आई । बाप माझा अनिरुद्ध । परी जीवाचा मैतर । हा सावळा सुंदर।। आणि मनात उमटतात ते स्पंद राम कृष्ण साई तिघां माजी अंतर नाही असे हेमाडपंत का वदले असावे?
आद्यपिपा (Adyapipa) एका अभंगात सांगतात की “पिपा म्हणे माझी कोरी ढोर वाट । तू माझा गुराखी मी ढोर रे। संताची पाऊले ना उमटती कधी । वाट ही राहिली सारी कोरी रे ।।” त्याचाच प्रत्यय येथे येतो. खरोखरीच हेमाडपंतासारख्या महान भक्ताचा जीवनप्रवास अभ्यासताना हीच खूणगाठ मनाशी घट्ट बांधली जाते की जे ते वदले तेच ते आजीवन जगले. सदगुरु साईनाथांना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांनी एकच मागितले की आजन्म तुझी सेवा घडू दे, मला फक्त आणि फक्त, केवळ तुझ्या चरणांचा दास ह्याच भूमिकेत जगायचे आहे आणि जोवरी माझ्या ह्या देहात श्वास आहे तोवरी हे तुझे तूच करवून घे आणि मला उदास करू नकोस. तू मला दिलेले तुझे निजकार्य तूच माझ्याकडून करवून घे, साधून घे !! केवढी ही पराकोटीची लीनता !!! म्हणजेच माझा सर्व अंहकार, मीपणा लयाला जाऊ दे, जर मी तुझ्या चरणांचा दास स्वत:ला म्हणवितो तर तुझे कार्य पण मी करेन एवढाही अंहकाराचा लवलेश माझ्या जीवनात राहता कामा नये. किती ही आटाटी!!! आठव येतो तो आद्यपिपांच्या एका अभंगाच्या ओळींचा — माझे तरी काय असे । सर्व तुझेचि रे देवा । तुझे असो तुझ्यापाशी । मीच होय तुझा । पुष्प उमलले जे माझे । वाहिले तुलाचि । तुला तुझे देताना ही । भरूनि मीच राही ।।…हेमाडपंत अगदी पूर्णपणे ह्या “दासा”च्या भूमिकेत स्थिरावलेले दिसतात. त्यांनी बाबांनी दिलेले नामच अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने शेवटच्या श्वासापर्य़ंत मिरवले. कुठेही मान, सन्मान ,प्रसिद्धीची हाव उरी न बाळगतां ज्या क्षणी श्रीसाईसच्चरिताची शेवटची ओवी लिहिली गेली त्याच क्षणी आपली लेखणी आणि मस्तक म्हणजेच बुद्धीस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य दोन्ही श्रीसाईंच्या चरणी समर्पिते झाले. परम पूज्य बापू नेहमी प्रवचनांतून सांगतात की ही “त्या”च्या प्रेमाची वाट म्हणजे फक्त एकालाच वाव आहे , जागा आहे….संत तुलसीदासांच्या शब्दांत सांगायचे तर ” प्रेम गली अति सांकरी , तेमा दुजा न समाय , तू है तो मैं नाही ” आणि अगदी हेच आचरण हेमाडपंतानी अवलंबिले होते जणू काही, कोठेही अल्पशी ही जागा त्यांनी स्वत: करिता राखून ठेवलीच नव्हती,फक्त माझ्या साईंचाच मी होऊन राहणे म्हणजे काय हे शिकायला मिळते ते येथे श्रीसाईसच्चरितात… अगदी पत्येक शब्द अन शब्द साईंवरच्या प्रेमाने ओथंबून भरभरून वाहतो. हेमाडपंताच्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि क्षण साईमय झालेला आढळतो. ३२व्या अध्याय़ातील एका ओवीत ते म्हणतात ” हेमाड साईंसी शरण । अपूर्व हें कथानिरुपण । साईच स्वयें करी जैं आपण । माझें मीपण फिकें तैं ।। तोच या कथेचा निवेदिता । तोच वाचिता तोच परिसता । तोच लिहिता आणि लिहविता । अर्थबोधकताही तोच ।। साईच स्वये नटे ही कथा । तोच इये कथेची रुचिरता । तोच होई श्रोता वक्ता । स्वांनदभोक्ताही तोच ।। कुठेही एवढ्या महान अपौरुषेय ग्रंथाचे कर्तृत्व हेमाडपंत स्वत:कडे घेत नाही.. सर्व काही माझे बाबा आणि फक्त बाबाच!!! एके ठिकाणी हेमाडपंत म्हणतात ” मी तो बाहुले साईखड्याचे ।
सुरुवातीला पेन्शन मिळाल्यावर अण्णा चिंचणीकरांनी हेमाडपंताना नोकरी मिळावी म्हणून अजीजी केली पण नोकरी काही कालापुरतीच लागली आणि गेली तदनंतर मात्र हेमाडपंतानी बाबांचे बोल = करावी आतां माझी चाकरीं । सुख संसारी लाधेल । हेच बोल उर्वरीत आयुष्यात उरी ठामपणे कवटाळलेले दिसतात.

हर्षसिंहानी मांडलेला मुद्दा खूप विचार करायला लावतो. अवघ्या ८ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हेमाडपंतानी जो हा देवयान पंथावरचा अफाट पल्ला पार पाडला तो केवळ साईंना अनन्यभावाने शरण जाऊनच !!! संत तुकारामाचें “हेचि दान दे गा देवा । तुझा विसर न व्हावा । विसर न व्हावा तुझा । न लगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ” हे ब्रीद आचरतच जणू हेमाडपंत जगले असे मला वाटते ज्यांमुळे कोठेही आपली पाऊलेच उमटू देखिल दिली नाही … देहची जेथे नाही आपुला । तो तयाच्या पायां वाहिला । मग काय अधिकार । तयाचिया चलनवलनाला आपुला ।। ह्या उक्तीची सत्यता दाविणार्‍या हेमाडपंताचा भाव अंशत:तरी मला धारण करता यावा अशी पिपासा मनी बळावते. मी माझ्या बापूंकडे जाऊन किती वर्षे झाली आणि मी बापूंच्या पाय़ी अशा प्रकारे स्व:तला वाहिण्याचा अल्प तरी प्रयास केला का ह्याचे सिंहावलोकन नकळत मनात सुरु होते.मग जाणवते की मी तो केवळ पायांचा दास ह्या भूमिकेत स्थिर होण्यासाठीच “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू (गुरु) ऐसा ” ह्या ओवीला नित्य स्मरणात ठेवण्याचा संकल्प मला करायलाच हवा आणि मग अनन्यप्रेमस्वरूप माझा बापू, माझा “सत्यसंकल्पु बापूराया”च सार्‍या विकल्पांच्या अंधाराचेच स्वप्रकाशात रुपांतर करीलच आणि मला “त्या” च्याच वाटेवर ढोर बनविण्यासाठी माझा गुराखी ही १०८% होईलच!!!
श्रीराम.अंबज्ञ…