Reply To: The Importance of Having Complete Faith in the Sadguru Shri Saisatcharit

#1486

Suneeta Karande
Participant
हरि ओम. सुनीलसिंह आणि मोहनसिंह अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे कि श्रीसाईसच्चरितातील  (Shri Saisatcharit) भक्तांचे आचरित हेच आपल्याला शिकविते की एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा.
हेमाडपंतांनी (Hemadpant) अनेक ओव्यांमधूनच नव्हे तर संपूर्ण श्रीसाईसच्चरितातूनच ही अंतरीची खूण पटविली आहे – गुरुचि सत्य माता-पिता| अनेकां जन्मींचा पाता त्राता | तोची हरिहर आणि विधाता | कर्ता- करविता तो एक || 
घडो तुझे नामस्मरण | व्हावी न इतर आठवण | यावे मनासी निश्चलपण | चंचलपण नातळो|| 
बरी वाईट क्रिया सारी |  ईश्वर तेथींचा सूत्रधारी|  तूचि तारी तोचि मारी |  कार्यकारी तो 
एक | | 
आपण भीमाजी पाटीलांच्या(Bhimaji Patil) कथेत पाहातो की नानासाहेब चांदोरकर(Nanasaheb Chandorkar) किती अनन्य भावाने भीमाजींना पत्राद्वारे कळवितात कि माझ्या साईनाथांचे पाय घट्ट धरा त्याशिवाय तरणोपाय नाही.
उत्तरी कळविती एकचि उपाय |  साईबाबांचे धरावे पाय |  हाचि केवळ तरणोपाय |  बाप माय तो एक | | तीच कनवाळू सर्वांची आई |  हांकेसरशी धावत येई |  कळवळूनि कडिये घेई |  जाणे सोई लेकरांची | |  क्षयरोगाची कथा काय |  महारोग दर्शनें जाय |  शंका ना धरी तिळप्राय |  घट्ट पाय धरीं जा | | जो जें मागे त्यास तें देई |  हें ब्रीद ज्याने बांधिले पायी |  म्हणोनि म्हणतों करीं गा घाई |  दर्शन घेई साईचें | | भयामाजीं मोठें भय |  मरणापरिस दुजें काय | घट्ट धरीं जा साईंचे पाय | करील निर्भय तो एक | |  
तुम्ही सर्व उपाय करुन थकला असाल पण हा एकमेव उपाय म्हणजेच सदगुरुंना शरण जाणे हे करुनच पहा. नाना ही ग्वाही सुद्धा देतात कि माझ्या गुरुंच्या नुसत्या दर्शनानेच महारोगही बरे होतात, तर ही व्याधी काय आहे? काय जबरदस्त आत्मविश्वास आहे नानांचा आपल्या साईंवर !!!!! म्हणजेच आपला आपल्या सदगुरुंवर एवढा अनन्य विश्वास असायला हवा की एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू (गुरु )ऐसा .
माझाही असाच दृढ विश्वास माझ्या बापूंवर असायला हवा की माझा कर्ता, करविता, हर्ता , सर्व काही हा एकच आहे, दुजा कोणीच ह्यासम नाही आणि एवढेच नव्हे तर हे माझ्या मनाला, बुद्धीला एकदा पटले की मला इतर लोकांना ते ठामपणे पटवुन देता आले पाहिजे, हेच तर त्याचे खरे गुणसंकिर्तन आहे. 
येथे समीरदादांनी सांगितलेली औरंगाबादची गोष्ट प्रकर्षाने आठवली की बापूंचे औरंगाबादला प्रवचन झाले आणि त्याला खूपच चांगल्या प्रमाणावर भक्तांचा प्रतिसाद मिळाला. दादांनी येथे एक गोष्ट नमूद केली होती की ह्या एवढ्या मोठ्या कार्याचा आढावा घेताना दादांच्या लक्षात आली कि ही अवाढव्य जागा प्रवचनासाठी मिळवण्यासाठी बापूंचे केले गेलेले गुणसंकिर्तन कामी आले आणि ते ही कसे तर त्या मैदानाच्या मालकांकडे न्हाव्याचे (केस कापणारा) काम करणार्‍या माणसाने त्यांना सांगितले बघा तर आमच्या बापूंना प्रवचनाला तुमची मैदानाची जागा देउन , तुमचे किती भले होईल? किती साधे शब्द , पण त्याचा बापूंच्या चरणी असलेला भोळा अनन्य भावच येथे काम करुन गेला.
म्हणूनच आद्यपिपाही आपल्याला त्यांच्या अनेक अभंगातून हेच सत्य प्रतिपादीत करतात –
नको येरझार्‍या बहू मुर्तीपाशी | अनिरुद्ध एकचि भार वाहे ||    
बांध माझ्या मना घट्ट तुझ्या पदा | सर्व ये त्यागतां ना तुला ना तुला |
धरलेले सोडु नको रे | जोडलेले तोडु नको रे | पकडलेले टाकु नको रे | तळमळ माझी जाणुन घे रे || 
सर्व जगी आम्हां बापुचा आधार | नाही मोडणार संकटात | प्रारब्ध आणेल जरी कळिकाळ | आम्ही जरी नेणु तरी प्रतिपाळ || पिपा म्हणे टाळण्या प्रारब्ध | बापू म्हणा || 
नानांच्याच मुलीच्या प्रसुतीसममयीची गोष्ट आपण ३३व्या अध्यायांत वाचतो, उदी संपली आहे , मुलगी प्रसुती वेदनेने विव्हळत आहे आणि घरात नवचंडीचे हवन ही मांडले आहे , पण नाना साईंचा धावा करतात आणि मग आपण वाचतो कि चमत्कार घडतो रामगीर बुवा गोसावी अचानक गावी जायला निघतात आणि साईनाथांच्या आज्ञेने ते नानांसाठी उदी व माधव अडकर लिखित आरती घेउन जातात. पण शेवटी ती अकारण कारुण्याने ओतप्रोत भ्ररलेली साई माउली, नटनाटकी साई माउली चक्क टांगेवाल्याच्या रुपात घोडागाडी घेउन धावत जाते. येथे नानांचा अनन्य भावच बाजी मारतो. दुसर्‍य़ा नानांच्याच कथेत आपण वाचतो कि पायाखालची रस्त्यावरची माती साईंचे स्मरण करुन एका तिसर्‍या अन्य व्यक्तीला लावुन देखिल उदीचेच महान कार्य करते , हाच तो नानांचा साईंवरचा अनन्य विश्वास की एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा. मग सांगा बरे अशा भक्तांसाठी कासवीच्या नजरेने प्रेम पान्हा पाजणारा साईमाउली का बरे धावत येणार नाही ?
बापू १७ मे २०१२ च्या त्यांच्या प्रवचनात म्हणाले होते कि जगातील सर्वात श्रेष्ठ मंत्र काय तर गुरु हा शब्द. गुरु व गुरुचे प्रेम हे तुमच्या कल्पनांमध्ये कधीच बसू शकणार नाही. गुरुची ताकद किती आहे हे तुम्ही कधीच जाणू शकणार नाही.
आम्ही दु:खी का असतो? तुमच्या मनात हे भय तुलनेतून निर्माण होत असते. मानवाचे मन हे चुंबक आहे. जसं आमचे मन असते ते तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित करून घेत असते.
जर मनात आनंद असेल तर ते बाहेरूनही आनंदच खेचून घेणार जर मनात दु;ख असेल तर ते दु:खच खेचून घेणार. पण आम्ही सामान्य माणसे आहोत. आमच्या जीवनात अनेक दु:खे असतात.दुसर्‍याला चांगले देण्याने माणसाचा अहंकार पण तो चांगला अहंकार, आत्मविश्वास खूप strong होतो.
भले तुम्हांला सांसारिक दु:ख असले तरी त्याही परिस्थितीत तुम्हांला जेवढे चांगले वागता येईल तेवढे वागा. त्यातून तुमच्या मनात जो आनंद निर्माण होईल तो मग ह्या विश्वातला आनंद तुमच्याकडे खेचून घेईल.
जर हे असे करणे जमत नसेल आपण सामान्य माणसे आहोत दु:खामध्येही सुखी राहणे कठीण वाटू शकते तर मग अशा वेळी तो जो एक आहे, जो आंम्हाला फक्त आनंद द्यायला बसला आहे, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या कार्यात, सेवेत सहभागी होण्याचा प्रयत्न करा.
सुंदरकांण्डात एक ऒवी आपण वाचतो…
प्रबिसि नगर कीजे सब काजा, ह्रुदय राखि कोसलपुर राजा
गरल सुधा रिपु करहिं मिताई, गोपद सिंधु अनल सितलाई,
लंकिनी महाबली हनुमंतास सांगते, तुझ्या अंत:करणात प्रभू रामचंद्रांना ठेवून काहीही काम कर मग विषच अमृताचे काम करेल.
सद्‌गुरुतत्त्व काय करते तर विषचाचेच अमृत बनवते. जो शत्रू असतो तोच मित्र बनतो. जे काही कोणी तुमच्यासाठी वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल तेच तुमच्या फायद्याचे ठरते. 
तो तुमच्यासाठी जे जे काही अहितकारक आहे ते ते हितकारक बनवतो. पण कधी? प्रबिसि नगर कीजे सब काजा… हा जो राम आहे त्याला हृदयात धारण केले तरच.
“एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऎसा…”
येथे पुन्हा श्रीसाईसच्चरितच दाखविते ती २३व्या अध्यायातील काका दीक्षितांची बोकड कापण्याची कथा आणि माधवरावांची सर्पदंश झाल्यावरची कथा !! काकांचा आध्यात्मिक मृत्यु असो वा शामाचा शारिरीक मृत्यु , हे दोघेही साईंचे परम भक्तही विचलित होत नाहीत कि डगमगत ही नाहीत.त्यांना पूर्ण विश्वास  असतोच कि माझा साई मला कधीच टाकणार नाही, तोच माझा तारणहार आहे. 
तसेच डोळे आलेल्या भक्ताला ही जेव्हा बाबा बिब्बा डोळ्यांत चिणून भरतात तेव्हांही तो भक्त असाच अढळ विश्वास ठेवतो साईंच्या चरणीं !! एकदा साईंना भेटून गेलेले नारायणराव जानी त्यांच्या मित्राला वृश्चिकदंश होतो (विंचू चावतो) तेव्हा ह्याच विश्वासापोटी साईंच्या तसबिरीसमोरील जळत्या उदबत्त्तीची कोजळी (राख), साईंचे नामस्मरण करुन, उदीच मानून लावतो आणि वेदनांचे शमन होते.
गुरु म्हणजे काय? तर ज्याला काही गरज नसताना, स्वत:चे सामर्थ्य न वापरता, जे त्याला जराही लागू होत नाहीत ते सर्व नियम तो स्वीकारतो… तोच एकच गुरु.
गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तर माझे माझ्या गुरुशी असणारे नाते. क्षेत्र म्हणजे शेत व शेत कोणाला पिकवावे लागते तर स्वत:लाच.
एवढा strong विश्वास आमचा असला पाहिजे. असे जेव्हा असेल तेव्हा आमच्या सर्व गरजा कुठेही भीक न मागावी लागता पूर्ण होतील.
खरेच माझ्या बापूंना आमचा किती किती कळवळा आहे म्हणुनच तर ते प्रत्येक प्रवचनातुंन ही अटाटी करतात कि आपला विश्वास कोठेही डळमळू नये, ढेपाळो नये. आपला सदगुरु जाणतो कि कलियुगाच्या ह्या तडाख्यांनी माझी लेकरे घाबरतील, त्यांचा विश्वास ढळू शकतो , ती लडखडू शकतात, म्हणुनच तर ते ही काळजी स्वत:च घेतात.
बापूराया तूच आम्हांला हा अनन्य भाव शिकव, हा अढळ विश्वास दे !!!!!
श्रीराम.