Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#8719

Suneeta Karande
Participant

हरि ओम.
सदगुरुदर्शन माहात्म्य खरेच अगाध असते. दादा तुम्ही हेमाडपंताच्या साईनाथांच्या प्रथम भेटीचा एक वेगळा पैलू आम्हांला उलगडून दाखविलात.बापूही आपल्याला नेहमी सांगतात की सर्वात मोठा चमत्कार कुठला – तर मनाची वृत्ती पालटणं, मनाचं नम: होणं (संदर्भ : श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज, सत्यप्रवेश, चरण ५, पान क्र. २५), आणि हाच सर्वात मोठा चमत्कार होय; जो हेमाडपंतांनी फक्त साईनाथांच्या (सद्-गुरुंच्या) दर्शनाने अनुभवला. हेच ते दर्शन महात्म्य जे कशाचीही अपेक्षा न ठेवता साईनाथांकडे गेलेल्या हेमाडपंतांनी अनुभवलं.
श्रीसाईसच्चरितात भक्तांच्या साईनाथांशी पहिल्या भेटीचा ,दर्शन माहात्म्याचा आढावा घेतल्यास हेच जाणवते की जे कोणत्याही अपेक्षा न ठेवता गेले त्यांना खरोखरीच हेमाडपंतानी श्रीसाईमुखीचे बोल लिहिताना वर्णिलेली ओवीच अनुभवायला मिळाली –
देणें एक माझ्या सरकारचें । तयासी तुळे काय तें इतरांचें । अमर्यादास मर्यादेचें । भूषण कैंचे असावें ।। (अध्याय ३२ ओवी १६०)

११व्या अध्यायांत Doctor पंडिताची पहिली भेट असूनही बाबांनी त्यांच्या कडून त्रिपुंड्र काढून घेतेले आणि बाबा स्वत: म्हणतात की
तेथें माझे उपाय हरलें । नको म्हणणे जागीच राहिलें । आधीन केलें मज तेणें ।।
जे बाबा कधीही त्या आधी म्हाळसापतीशिवाय कोणाकडूनही गंध तर सोडाच गंधाचा उलासा टिळाही काढून देत नव्हते तोच गौळीबुवांचा (सजीव बनला पंढरीचा पुतळा हे साईनाथांच्या भेटीनंतरचे गौळीबुवांचे निजानुभवाचे बोल होते) पंढरीचा पळपुट्या विठ्ठल पाटील म्हणजेच साईनाथ येथे हारी विठ्ठल होतो भक्ताच्या भोळ्या भावापोटी !!!
बाबांनी पंडितांना निजगुरुदर्शनाचा (बाबांकडे येण्याआधीच पंडित हे काका पुराणिक ऊर्फ़ धोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध ह्यांना आपले गुरु मानीत होते) अनुभवही दिला.

५१व्या अध्यायांत आपण वाचतो की सजीव बनला पंढरीचा पुतळा हेच बोल बाळाराम धुरंधर ह्या भक्तश्रेष्ठाने अनुभवला होता साईनाथांच्या प्रथम भेटीत आणि एवढेच नव्हे तर कोणतीही अपेक्षा न ठेवता साईंना भेटणार्‍या बाळारामांना स्वहस्ते चिलीम ओढावयास देऊन साईंनी स्वत: होवूनच बाळारामांना सहा वर्षांपासून जडलेल्या दम्याच्या व्याधीचे समूळ उच्चाटनही केले होते.
श्रीसाईंचे दर्शन होतां । बाळारामादि सर्वांचे चित्ता । सोल्लास अनिवार प्रेमावस्था । आल्याची सार्थकता वाटली ।।२०८ ।।
अश्रूपूर्ण झाले नयन । कंठ रोधिला बाष्पेंकरून । रोमांच उठले सर्वांगावरून । आले दाटून अष्ट्भाव ।। २०९ ।।
येथे सदगुरुंच्या दर्शनाची मला किती ओढ लागली, माझी किती व्याकुळता दाटली , माझ्या मनाची काय अवस्था आहे ह्यावर मला मिळणारा आनंदाचा ठेवा असतो अवलंबून असे मला वाटते कारण ह्याच कथेत हेमाडपंत पुढे वर्णतात की
पाहोनि बाळारामाची अवस्था । उल्लास साईनाथांचे चित्ता ।।
म्हणजेच भक्ताला भेटण्या हा सदगुरु त्याच्याहीपेक्षा कैक अधिक पटीने उतावळा झालेला असतो, अधीर झालेला असतो.
बाबांना बाळारामांची अधीरता, तळमळ पाहून आनंद दाटून येतो, हर्ष वाटतो म्हणूनच साईनाथ स्वमुखे वचन देतात की
शुक्लपक्षाचिया चढत्या कला । तेणेंपरी भजे जो मजला । धन्य जेणें मनोधर्म आपुला । नि:शेष विकला मदर्थ ।। २११ ।।
दृढ विश्वास धरोनि मनीं । प्रवर्तें जो निजगुरु-भजनीं । तयाचा ईश्र्वर सर्वस्वें ऋणी । पाही न कोणी वक्र तया ।। २१२ ।।
वायां न दवडितां अर्धघडी । जयासी हरिगुरुभजनीं आवडी । तया ते देतील सुख निरवडी । भवपैलथडीं उतरतील ।। २१३ ।।

म्हणजेंच मलाही माझ्या सदगुरुंच्या भेटीची ओढ लागायला हवीच, “त्या” च्या प्रत्येक दर्शनात नित्यनूतनता मनी दाटायला हवीच. केतकीवीरांनी लिहिलेली मनाची भावोत्कटता मला पूर्णपणे पटली की जसा मोर पावसाच्या आगमनाचे आतुरतेने वाट पाहतो, जशी चातक पक्ष्याची व्याकूळता असते तसे भाव आपल्याही मनीं दाटायला पाहिजेत. माझे मनही शुक्ल पक्षातल्या वाढत्या चंद्रकलेप्रमाणे सदगुरुंच्या प्रेमाने असेच दुथडी भरभरून वाहायला हवें खरें

तीच तर्‍हा आपण काका दीक्षितांच्या बाबांसोबतच्या भेटीत अनुभवतो की बाबा स्वत:ची ओढ कशी बोलून दाखवितात –
“मींही तुझी पाहूनि वाट । पुंढे शाम्यास पाठविला थेट । नगरास तुझी घ्यावया भेट । ” वदलें मग स्पष्ट साई तयां ।।
कारण काकांनाही तशीच तळमळ लागली होती जे त्या भेटींच्या वर्णनातून हेमाडपंत स्पष्ट्पणें प्रतिपादन करतात –
पुढें होतां साईंचे दर्शन । दीक्षितांचे द्रवलें मन । नयन झालें अश्रुपूर्ण । स्वानंदजीवन ओसंडले ।।
रोमहर्षित दीक्षितशरीर । कंठी दाटला बाष्पपूर । चित्त जाहलें हर्षनिर्भर । घर्म सर्वांगी दरदरला ।।
देह सूक्ष्म कंपायमान । चित्तवृती स्वानंद निमग्न । नेत्र पावलें अर्धोन्मीलन । आनंदघन दाटला ।।
आज माझी सफळ दृष्टी । म्हणोने चरणीं घातली मिठी । मना धन्यता वाटली मोठी । आनंद सृष्टीं न समाये ।।
म्हणजेच सदगुरु भक्तांवर कृपा करायला सदैव आतुरच असतात पण ही कृपादृष्टी स्विकारायला माझी मनोभूमी पण तशीच पाहिजे, तर दर्शनाची महती मला अधिक काही देऊनच जाते… “त्या”चे दर्शन परम पावनच आहे , माझ्या जन्मोजन्मींचा उध्दार करणारेच आहे हा दृढ विश्वास माझ्याही मनी ठाम असायलाच हवा.

नाना जेव्हा बिनीवाल्यांसमवेत बाबांच्या दर्शनाला येतात तेव्हा हीच मनाची परमोत्कटता त्यांच्या हातून घडलेल्या चुकीतून जाणवते , हेमाड्पंतही अगदी APT शब्दांनी सांगतात ३८ व्या अध्यायांत की –
त्यांतचि बाबांच्या बहुप्रीतीचे । होते भक्तवर चांदोरकर साचे । आले भुकेले दर्शनाचे । बिनीवाल्यांचे समवेत ।।
नानांना बाबांच्या दर्शनाचीच भूक लागली होती किती ही ओढ, तळमळ आहे ….मला अशी माझ्या बापूंच्या दर्शनाची आस लागते का हा प्रश्न असाच अंतर्मुख करतो…

आदयपिपा अभंगात सांगतात बापूला माझ्या प्रेमाची तहान । बापूला माझ्या भक्तीचीच भूक ।।
म्हणजेच माझ्या सदगुरुला जशी माझ्या प्रेमाची तहान लागते आणि भक्तीची भूक लागते तशीच माझ्यातल्या भक्ताला “त्या”च्या दर्शनाची भूकच लागायला हवी हे श्रीसाईसच्चरित शिकविते.

आदयपिपा त्यांच्याच एका अभंगात म्हणतात की माझ्या साईंचे दर्शन काय देते ते तरी बघा –
हरले सर्व भास भ्रम साई दिसला प्रत्यक्ष ।
ह्याच्या चरणावरला थेंब हाचि जाहला आरसा ।
पाहणारा ना दिसे हो , नख ना आकाश ।

हेमाडपंत वर्णतात
१) माझिया मनाचा विकल्प झडला – मनातील संकल्प विकल्प नष्ट होतात
२) परम प्रकटला आनंद – जीवनातील सर्वोच्च (परम) आनंद अनुभवता येतो.
३) पूर्वकर्माची मावळे सई – गतकर्माचा “अनिष्ट प्रभाव” लय पावू लागतो
४) वीट विषयीं हळूहळू – षड्-रिपूंपासून भक्त / श्रद्धावान लांब जातात म्हणजेच त्यात ते सहजतेने अडकत नाहीत.
मला वाटते ह्याच त्या अवस्था पिपादादाही आपल्याला समजावित आहेत मनातील सर्व भास भ्रम हरतात म्हणजेच मनाचा विकल्प झडतो. पाहणारा ना दिसे हो म्हणजेच माझ्या पूर्वकर्माचीं आठवण मावळते

आद्यपिपा अजून एका त्यांच्याच अभंगातून सदगुरुंच्या दर्शनाचा महिमा सोप्या शब्दांतून समजावितात –
रुप पाहता सावळे │डोळस होई मन आंधळे │
मन धावे मग सत्वरे │ पडण्याचे भय ना उरे ││ १ ││
जेथूनी पतनाचे भय नसे │ ऐसे शिखर आम्हां गवसे
पुरुषार्थ पर्वतशिखरे │ आम्हां नेई धरूनी करे │ │ २ ││
धावे संगे पळे पूढे │ आम्ही थकता घेई कडे │
घसरते पाऊल जरी वाकुडे │ दरीत ह्याचा कुणी न पडे ││ ३││
फळ हे केवळ दर्शनाचे │ तर काय वर्णू ध्यानाचे │पिपा मूक होऊनी नाचे │ डोळे झाले अनिरुद्धाचे ││ ४ ││
आणि असा हा सद्गुरु माझा बापू -साई अनिरुद्ध आहे कसा हे ही पिपादादा सांगतात =
माझा अनिरुद्ध भोळा │ हाचि सिद्धांत एकला ││
मी अडाण्याचा गोळा │ तरी सांभाळी तो मजला ││
मायबापा अनिरुद्धा │ न सोडीन मी तुजला ││

परंतु समजा अशी जरी भक्ताची अवस्था नसली तरी सदगुरु त्या त्या भक्ताच्या वा अभक्ताच्या मनाप्रमाणे त्याला दर्शन देतो आणि चुकीच्या गोष्टी काढून टाकतो किंवा तर्क-कुतर्कातून त्याला मुक्त करतोच करतो आपल्या अपार प्रेमापोटी, दयेपोटी, क्षमाशील गुणामुळे….
नाना चांदोरकरासोबत आलेल्या योगाभ्यासीच्या मनात विकल्प येतो की भाकरीसमवेत कांदा खाणारे साईनाथ माझ्या शंका कशा काय निरसन करतील, तर साई स्वत:च त्यांच्या मनातल्या विकल्पाला उत्तर देऊन तो दूर करतात. हाड्याव्रण झालेल्या मुलाचे Doctor काका साईंना भेटायला जात नाहीत तेव्हा साई स्वत: “अजूनी मजवरी अविश्वास ना ” अशी एकदाच नव्हे तर हारोहारी (लागोपाठ) तीन रात्री अशरीर वाणी करून त्यांना बोलावून घेतातच आणि नुसते दर्शनच देत नाही तर अंतरीचे अनुभव पटवितात आणि १५ दिवसांच्या आत तेच Doctor विजापूरला बढतीवरही जातात. महाजनी काकांच्या धरमसी जेठाभाई शेटजींना बाबा चमत्कार करणारे वाटतात म्हणून ते त्या भावाने भेटतात तर साईनाथ त्यांना सबीज द्राक्षे निर्बीज करून चमत्कार दावतात.

हेमाड्पंत अत्यंत खुबीने साईमाऊलीचा कनवाळूपणा मांडतात –
जाहली संशयनिवृत्ती │ साई साधूही अभिव्यक्ती│ जया मनी जैसी वृती │ तैसीच अनुभूती दाविली ││
ज्या ज्या मार्गे जाऊं इच्छिती │ तो तोच मार्ग तया लाविती │ साई जाणती अधिकासंपत्ती │परमार्थप्राप्तीहीं त्या मानें ││
भक्त भावार्थी अथवा टवाळू │साई समत्वें दोघांसी कृपाळू │ एकास टाळूं दुजिया कवटाळूं │ नेणे ही कनवाळू माउली ││

म्हणजेच काय आपल्या हातात आहे आपण “त्या”च्या दर्शनाला कसे जायचे भावार्थी बनून का टवाळू बनून …

एका श्रद्धावान भक्ताने सांगितले तशी ही सदगुरुंच्या दर्शनाची ओढ लागायला हवी –
बापू भेटीची ओढ मला लागली माझ्या मनाची तळमळ वाढली
एकच मागणे मागू या सद्गुरुराया , माझ्या बापूराया तूच माझा त्रिविक्रम आहेस ….
हे त्रिविकमा! तू प्रेमळ आहेस आणि तुझ्या कृपादृष्टीने मी अम्बज्ञ आहे आणि सदैव तुझ्या चरणी अम्बज्ञ राहो.
अंबज्ञ !!!
सुनीतावीरा करंडे