Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#7698

Ajitsinh Padhye
Participant

फोरममध्ये लिहीणा-या सर्व श्रद्धावानांना माझा हरि ॐ आणि मन:पूर्वक अंबज्ञ. खरंच सांगतो, मी पहिल्यांदाच ह्या फोरममध्ये भाग घेतला आणि त्यात मला जो आनंद मिळालाय तो शब्दांत वर्णन करणं कठीण आहे. सर्व श्रद्धावानांनी त्यांच्या साईंबद्दल्, त्यांच्या बापूंबद्दल एवढं भरभरून लिहीलं आहे की ते वाचताना भक्तीभावाने मन भरून येतं. पूज्य समीरदादांनी ही फोरमची संकल्पना सुरू करून आपल्या सगळ्यांना एका सुंदर प्रवासामध्ये एकत्र आणलंय, जेणेकरून भक्तीमार्गातील एका अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा, हेमाडपंतांचा आपण अभ्यास करू शकतो, आणि तो अभ्यास करता करता साईंच्या “अगाध शक्ती, अघटित लीलांबद्दल” जाणून घेऊ शकतो. श्रीराम समीरदादा.
अंजनावीरांनी नुकतेच त्यांच्या पोस्टमध्ये फोरममधील सर्व श्रद्धावानांनी लिहीलेल्या मतांचे सुंदररित्या विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी हेमाडपंतांच्या एका ओवीचा उल्लेख केलेला मला खूप आवडला:
मी तो केवळ पायांचा दास । नका करू मजला उदास ।
जोवरी या देही श्वास । निज कार्यास साधूनि घ्या ।

साईनाथांची भेट झाल्यावर हेमाडपंतांच्या जीवनात फक्त एकच ध्येय होतं. “जोवरी या देही श्वास । निज कार्यास साधूनि घ्या ।” किती ताकदीचं वाक्य आहे हे ! साईनाथांना ते हक्काने सांगत आहेत की “साईनाथा, माझ्या शेवटच्या श्र्वासापर्यंत तुम्ही मला तुमच्या कार्यात सामील करून घ्या, मला उदास करू नका.” म्हणजेच हेमाडपंतांचा प्रत्येक श्र्वास हा साईमय झालेला होता. हर्षसिंह पवारांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडल्याप्रमाणे हेमाडपंतांना साईनाथांचा प्रत्यक्ष सहवास अवघी ८ वर्ष लाभलेला आहे. त्यात त्यांनी भक्तीची अशी परमोच्च पायरी गाठणं ही नक्कीच असामान्य बाब आहे. ह्याच मुद्याचा आधार घेत, पुन्हा हेमाडपंतांच्या पहिल्या साईनाथ-भेटीची कथा बघितली की जाणवतं की हेमाडपंतांच्या मनात जो त्यावेळी विकल्प आला होता, त्या विकल्पाचे संकल्पामध्ये रुपांतर झाल्यावर, त्यांचा संकल्प शेवटपर्यंत कधीच ढळला नाही…आणि वरील ओवी हाच त्या संकल्पाचा गाभा आहे असं मला वाटतं.
आम्ही बापूंकडे आल्यावर असा संकल्प ठेवून जगलो, तर आमच्या आयुष्याचं सोनं होणारच. पण त्यासाठी “मी तो केवळ पायांचा दास” होणं आणि त्याची कायम जाणीव ठेवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.