Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#7593

Suneeta Karande
Participant

हरि ॐ. रेशमावीरा तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांमुळे हेमाडपंताच्या भक्तीप्रवासातील नानाविध पैलू अगदी सहजपणे उलगडले गेले आणि ह्या भक्तीमार्गाचे आकलन करुन घेण्यासाठी एक नवीनच दिशा जणू गवसली. अजितसिंह तुम्ही समीरदादांनी मांडलेल्या हेमाडपंताच्या आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुमचे जे विचार प्रस्तुत केले आहे तेही मनाला पूर्णपणे पटले.उच्च्पदस्थ आणि उच्चशिक्षीत असूनही हेमाडपंत आपल्या एका मित्राचे म्हणजेच काकासाहेब दिक्षीत ह्यांच्या गुरुंना भेटण्याचे मान्य करतात. परंतु दुसर्‍या मित्राच्या पुत्राच्या निधनाने मनात उद्भवलेला सदगुरुतत्त्वाच्या आवश्यकतेबद्दल विकल्पही तिसर्‍या मित्राच्या म्हणजेच नानांच्याच कळकळीच्या उदबोधानंतर प्रांजळपणे कबूल करतात आणि नंतर नानांच्याच विनंतीला स्विकारून शिरडीला साईंच्या दर्शनाला जाण्याचे मान्य करतात. येथे “मी पाहिलेला बापू” ह्या प्रत्यक्षच्या नवीन वर्षाच्या अंकातील जितेंद्रासिंह ह्यांनी निवेदीत केलेल्या बापूंच्या बोलाचे स्मरण झाले.
बापू जितेंद्रसिंहाना छ्त्र आणि छत्री ह्याबद्दल गप्पा मारताना म्हणाले होते की ‘‘मस्करीत बोललो पण मोठं तत्त्व आहे त्यामागे. पावसाच्या दिवसात कधीही छत्री विसरायची नाही. याचा अर्थ, कायम सावध रहायचं. हे होणार नाहीच किंवा असं होईलच, या भ्रमात वावरायचं नाही. मला वाटलं म्हणून… याने सुरूवात होणारी वाक्य निरर्थक असतात. तशी उत्तरं कधीच द्यायची नाही. हे जे ‘वाटणं’ असतं ना, त्याला निरीक्षणाचा, अनुभवांचा काहीतरी आधार असायला हवा. नाहीतर आपलं हे ‘वाटणं’ आपल्या त्या क्षणाच्या सोयीनुसार बदलतं. घरून निघताना तुला छत्री नकोशी वाटत होती, आता हवीशी वाटते. कशावर ठरलं हे? पावसावर ना! पाऊस पडणार हे कशावर ठरतं? तुझ्या ‘वाटण्यावर’? लक्षात घे. आयुष्याला दिशा द्यायची असेल, तर विचारांना शिस्त हवी. शिस्तबद्ध विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची. त्याने आपलं आयुष्य बदलतं. बरेचजण आयुष्यात आपल्याला हे करायचं होतं, ते करायचं राहिलं, असं कायम म्हणत असतात. नाहीतर आपल्या नाकर्तेपणाचं खापर दुसर्‍यावर फोडतात. त्या रडण्याकडण्याला काडीचाही अर्थ नसतो. काहीतरी करायचं असेल, तर स्वतःला शिस्त लावली पाहिजे. शिस्तीने आयुष्य घडतं, समाज उभा राहतो, देश घडतो… …आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर छत्रीची दुकानं शोधणारी मंडळी भरपूर आहेत. त्यासाठी भिजावं लागतं, हे त्याच्या लक्षात येत नाही. छत्रीची किंवा छत्राची छाया ऐनवेळी मिळत नाही, त्यासाठी सोय आधीच करावी लागते. पावसाने झोडपल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही, नंतर कळूनही काही उपयोग नसतो. असं झोडपून घ्यायचीही खूप मोठी परंपरा चालत आली आहे आपल्या देशात. त्या परंपरेचा भाग बनू नकोस… ’’
जरी हेमाडपंताच्या मनात पहिल्यांदा विकल्प आला तरी देखिल बापूंनी सांगितल्याप्रमाणेच कायम सावध राहणार्‍या हेमाडपंताना त्याची निरर्थकता जाणवली नानांच्या आग्रहामुळे आणि त्यांनी साईंना भेटायला जायचे निश्चीत करताच, स्वत: साईनाथांनीच त्यांना उर्वरीत आयुष्यात अखंडपणे पाठीशी उभ्या राहणार्‍या छत्राची-सदगुरुची छाया मिळवून दिली.
येथे हेमाडपंतांची बाबांशी प्रथमच भेट- धूळभेट झाल्यावरही ही सभानता म्हणजेच कायम सावध राहायचा गुण प्रकर्षाने जाणवून दिला अजितसिंहाच्या विचारांतून… आनंदाच्या परमोच्च अवस्थेतही हेमाडपंत आपल्या मित्रांची (काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर) आठवण काढतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. बापूंनी शिकवेलीली हीच ती अंबज्ञता असावी, असे वाटते. आपल्या आयुष्यात फक्त सदगुरु साईनाथांच्या कृपेनेच आणि मित्रांच्या आग्रहामुळे आपल्याला सदगुरुप्राप्ती झाली ह्याचे सदैव स्मरणही ठेवतात आणि संकल्प-विकल्पात्मक मनाच्या आहारी जाऊन सर्वसामान्य माणसाने चुकू नये ह्यासाठी श्रीसाईसच्चरित ग्रंथात वारंवार आठवही देतात – २६व्या अध्यायांत हेमाडपंत कळवळून सांगतात – म्हणवूनि प्रार्थूं कीं बाबांप्रत । करावी बुद्धी अंतरासक्त । नित्यानित्यविवेकयुक्त । वैराग्य्ररत मज करीं ।। मी तो सदा अविवेकी मूढ । आहें अविद्याव्यवधाननिगूढ । बुद्धि सर्वदा कुतर्कारूढ । तेणेंचि हें गूढ पडलें मज ।। गुरुवेदान्तवचनीं भरंवसा ।ठेवीन मी अढळ ऐसा । करीं मन जैसा आरसा । निजबोध ठसा प्रगटेल ।। वरी सदगुरो साईसमर्था । करवीं या ञानाची अन्वर्थता। विनाअनुभव वाचाविग्लापनता । काय परमार्था साधील ।। म्हणोनि बाबा आपुल्या प्रभावें । हें ञान अंगें अनुभवावें। सहज सायुज्य पद पावावें । दान हें द्यावें कृपेनें ।। तदर्थ देवा सदगुरुसाई । देहाहंता वाहतों पायीं । आतां येथून तुझें तूं पाहीं । मीपण नाहींच मजमाजीं ।। घेंई माझा देहाभिमान । नलगे सुखदु:खाची जाण । इच्छेनुसार निजसूत्रा चालन । देऊनि मन्मन आवरीं।। अथवा माझें जें मीपण। तेंचि स्वयें तूं होऊनि आपण । घेईं सुखदु:खाचें भोक्तेपण । नको मज विवंचन त्याचें ।। जय जयाजी पूर्णकामा। जडो तुझियाठायीं प्रेमा। मन हें चंचल मंगलधामा । पावो उपरमा तव पायीं ।। तुजवांचूनि दुजा कोण । सांगेल आम्हांस हितवचन । करील आमुचें दु:खनिरसन। समाधान मनाचें ।।
बापू म्हणतात आयुष्याला दिशा द्यायची असेल, तर विचारांना शिस्त हवी. शिस्तबद्ध विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची. त्याने आपलं आयुष्य बदलतं. हेमाडपंताच्यामध्ये ही विचारांची सुसूत्रता अथवा शिस्तबद्ध विचार करण्याची सवय होती म्हणूनच गहू दळण्याची कथा फक्त आश्चर्याने चमत्कार म्हणून न पाहता वा दुर्लक्ष करता त्यांनी त्यामागील बाबांचा मूळ उद्देश , हेतू , कारण जाणून घेतले आणि श्रीसाईसच्चरिताचा उगम झाला. बाबांच्या अगाध लीलांना पाहता माझ्या मनाला जणू काही ह्या बाबांच्या लीली, गोष्टी गोळा कराव्या आणि ज्या कोणाला माझ्या बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होणार नाही, त्यांना नयनसुखाची तृप्ती लाधून ते निवणार नाहीत, त्यांना कमीत कमी बाबांच्या कथा श्रवण करून , वाचून त्यांचे माहात्म्य कळेल आणि पुण्य़ही पदरी पडेल ह्या महान उदात्त हेतुने त्यांनी हे महत्कार्य करण्याची इच्छा मनीं धरली आणि बाबांच्याच कृपेने ती फलद्रूपही झाली. तरी देखिल ह्याही गोष्टीची सावधनता सदैव बाळगली आणि सदैव प्रत्येक अध्यायांत ह्या महान ग्रंथाचा फक्त आणि फक्त माझा सदगुरु साईनाथच कर्ता असल्याचे आणि संतसज्जनांच्या प्रेरणेनेच हा ग्रंथ लिहिला गेल्याचे नमूद केले.
स्वत:च्या अंहकारापोटी सदगुरुंना शरण न जाण्याची मोठी चूक बरेचजण करतात आणि सदगुरुंच्या सहवासाच्या महत्भाग्यापासून वंचित होतात , हेमाडपंत आपल्याला ह्या धोक्यांपासून सावध करण्यासाठीच “श्रीसाईसच्चरित” ह्या महान अपौरुषेय ग्रंथाची विरचना करतात आणि गुरुनाम, गुरुमंत्र, गुरुगृहवास, गुरुकृपा, गुरुचरण पायस, गुरुसहवास ह्या महत्प्रयासांनी प्राप्य गोष्टींना करतलकआमलकासमान (तळहातातील आवळ्यासमान सोपे करुन) सुपुर्द करतात.म्हणजेच मानवी रुपातील साकार सगुण सदगुरुंना नाकारण्याच्या चुकीच्या परंपरेच्या भाग बनण्याच्या आपल्या देशाच्या अनर्थापासूनही सावध करतात.
एवढेच नव्हे तर ग्रंथाची अवतरणिका लिहिण्याचे तर दूरच पण ग्रंथ पूर्णतेनंतरही ते क्षणभरही विभक्त न राहता साईंचरणी लीन झाले. किती ही पराकोटीची शारण्यता की जे बोलले तेच सत्यातही प्रकटले – मी तो केवळ पायांचा दास । नका करू मजला उदास । जोवरी ह्या देहीं श्वास । निजकार्यासी साधूनि घ्या ।।
…अशीच अंबज्ञता माझ्याही जीवनीं तुझ्याच कृपेने प्रकटो …जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा । जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा।. नको मजला कुठेही जाणे । नको मजला दुसरे येणे । तुझीच पिपासा जीवनी असणें । असे घर तू बांधशील ना ? घर बांधाया येत राहा ।।जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा । जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा ।
अंबज्ञ बापूराया!!!