Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

Forums Sai – The Guiding Spirit साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२ Reply To: साई-द गाइडिंग स्पिरिट – हेमाडपंत-२

#7549

Ajitsinh Padhye
Participant

हरि ॐ रेशमावीरा. तुम्ही खूप सुंदररित्या तुमचे विचार मांडले आहेत. हेमाडपंत ४० वर्षे गुरुचरित्राचे पारायण करत होते हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजेच त्यांचा भक्तिमार्गावर प्रवास खूप आधीपासून सुरूच होता. अशा भक्ताला, जरी त्याच्या मनात पहिली संधी चालून आली असताना विकल्प आला, तरी दुसरी संधी देऊन साईनाथांनी स्वत:जवळ खेचून घेतलं आणि कृतार्थ केलं ह्यात नवल ते काय ?
आता समीरदादांनी दिलेल्या दुस-या मुद्यावर मला थोडं बोलावसं वाटतं.
(२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर यांना देतात.
ह्या संदर्भात श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी ह्या फोरममधील त्यांच्या पोस्टमध्ये श्रीसाईसच्चरितातील ओव्याही लिहील्या आहेत. त्यातील वरील मुद्याला धरून असणा-या ३ ओव्या मला पुन्हा नमूद कराव्याशा वाटतात:
ज्यांचेनि लाधलों हा सत्संग I सुखावलों मी अंग-प्रत्यंग I
तयांचे ते उपकार अव्यंग I राहोत अभंग मजवरी I
ज्यांचेनि पावलों परमार्थातें I तेचि कीं खरे आप्त भ्राते I
सोयरे नाहींत तयांपरते I ऐसें निजचित्तें मानीं मी I
केवढा तयांचा उपकार I करूं नेणें मी प्रत्युपकार I
म्हणोनि केवळ जोडूनि कर I चरणीं हें शिर ठेवितों I (अध्याय २, ओवी १४१ ते १४३)
हेमाडपंतांच्या ह्या ओव्यांमध्ये “कृतज्ञता” किती भरभरून वाहते आहे ! आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो की हेमाडपंतांना साईंचे दर्शन झाल्याझाल्या ते धूळीत लोटांगण घालतात (ओवी १३७) आणि त्या धूळभेटीचे वर्णन ते पुढील ३ ओव्यांमध्ये करतात (ओव्या १३८ ते १४०). हे वर्णन संपते ना संपते तोच हेमाडपंत आपल्या स्नेह्यांप्रति (काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर) कृतज्ञता व्यक्त करतात (ओव्या १४१ ते १४३). म्हणजेच हेमाडपंतांची विचारसरणी इथे स्पष्टपणे जाणवते. विचार करा, एका भक्ताची त्याच्या सद्गुरुंना भेटण्याची पहिलीच वेळ आहे, सद्गुरु भेटताच तो भक्त धुळीत लोटांगण घालीत आहे, “आनंद न माई मनांत” अशी त्याची परिस्थिती आहे, आणि अशा भारावलेल्या स्थितीचे वर्णन करताना जिथे शब्दही हरवून जातात, अशावेळी हेमाडपंतांना लगेच त्यांच्या स्नेह्यांचे स्मरण होते आणि ते त्यांच्या प्रति भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतात. ही नक्कीच खायची गोष्ट नाही. भक्तीत भान हरपले असतानाही सभान असणं हे हेमाडपंत आपल्याला त्यांच्या आचरणातून दाखवून देतात. एवढंच कशाला, श्रीसाईसच्चरितातील प्रत्येक अध्यायाची सांगता करताना हेमाडपंत “श्रीसंतसज्जनप्रेरिते” असे म्हणतात. म्हणजे एवढा श्रेष्ठ ग्रंथ लिहीणा-या श्रेष्ठ भक्ताची इथे भावना काय आहे, तर संत आणि सज्जनांच्या प्रेरणेनेच हा ग्रंथ मी लिहीत आहे. हा “कृतज्ञतेचा” कळस आहे असं मला वाटतं.
मग खरंच असं वाटतं की आम्ही कधी हा विचार करतो का की मी बापूंकडे कसा आलो ? ज्या कोणा व्यक्तीकडून आम्हाला बापूंची माहिती मिळाली, त्या व्यक्तीप्रति आणि महत्वाचे म्हणजे बापूंच्या प्रतिमेसमोर आम्ही कधी असं म्हणतो का की “बापू, खरंच ह्या अमुक व्यक्तीमुळे मला तुमची माहिती आणि महती कळली. त्याबद्दल मी शतश: अंबज्ञ आहे !” सद्गुरुंच्या इच्छेशिवाय कोणी त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही हेही सत्यच आहे. पण मानवी पातळीवर, ज्या व्यक्तीमुळे / व्यक्तींमुळे मी बापूंकडे आलो, किंवा बापूंकडे येण्यासाठी ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात निमित्त ठरल्या, त्यांच्याप्रति मी सदैव कृतज्ञ राहिलोच पाहिजे, हे हेमाडपंतांकडून शिकण्यासारखे आहे. अशी कृतज्ञता आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला, प्रत्येक चांगली गोष्ट घडल्यावर जागृत व्हावी म्हणूनच बापूंनी आपल्याला “अंबज्ञ” ह्या शब्दाची ओळख करून दिली आहे असं मला वाटतं. अंबज्ञ बापू !