Reply To: Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

#795

Ashaveera Kulkarni
Participant

Megha a sincere devotee and his journey on the path of Bhakti-devotion

हरि ओम. दादा.
रावबहादूर हरि विनायक साठे हे गुजरातमधील खेडा जिल्ह्याचे प्रांताधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांच्याकडे मेघा नावाचा एक गुजराती ब्राह्मण चाकरीला होता. साठेंनी त्याला शिवमंदिराच्या नित्य्पूजेसाठी नोकरीस ठेवले होते. पुढे हे साठे शिरडीला आले आणि त्यांचे भाग्य उदयाला आले. साईमहाराजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचे मन साईचरणी जडले. शिरडीत त्यांनी बाबांच्या दर्शनाला येणार्या यात्रेकरुंसाठी वाडा बांधला, जेणेकरुन यात्रेकरुंच्या राहाण्याची सोय व्हावी.
मेघाचे पूर्वसंचित खरोखरच खूप मोठे होते म्हणून त्याला रावबहादूर साठे भेटले. त्यांच्याच प्रयत्नाने तो परमार्थाच्या मार्गाला लागला. साठ्यांनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. मेघा साठ्यांच्या घरी चाकरीला लागला आणि त्यांचे परस्परांतील एकमेकांचे प्रेम वाढले. मेघा साठ्यांना गुरु मानू लागला आणि साठ्यांचाही मेघावर लोभ जडला. असा हा मेघा एकटाच होता. त्याला कुणी नातेवाईक मंडळी नव्हती.
एकदा साईनाथांच्या गोष्टी करत असतांना साठ्यांच्या हृदयात बाबांविषयी प्रेम दाटून आले व ते मेघाला म्हणाले की बाबांना गंगेच्या (गोदावरीच्या) पाण्याने स्नान घालावे अशी माझी मनापासुन इच्छा झाले आहे. याच मुख्य कारणासाठी मी तुला शिरडीला पाठवीत आहे. तुझी अनन्य सेवा बघून मला मनापासून वाटते की तू सदगुरुंच्या पायी लागावे,त्याने तुझ्या देहाचे सार्थक होईल आणि या जन्माचे कल्याणही होईल. तेव्हा मेघाने साठेंना साईबाबांची जात विचारली. साठ्यांनी साईबाबा मशिदीत राहतात व त्यांना कोणी अविंधही (मुसलमान) म्हणतात असे सांगितले. अविंध शब्द ऐकताच मेघाचे मन डळमळीत झाले. यवनाचे ते गुरुत्व कसले? ’नाही’ म्हणावे तर साठेंना राग येईल , होय म्हणटले तर आपली दुर्गती निश्चित, मेघाला काय करावे कळेना. मेघा हा शंकराचा कट्टर भक्त होता. साठ्यांचा फार आग्रह झाल्याने मेघाने बाबांचे दर्शन घ्यायचे ठरविले आणि मेघा शिरडीला आला. तो जसा मशिदीची पायरी चढू लागला, तसे बाबांनी उग्र स्वरुप धारण केले व दगड हातात घेऊन म्हणाले,खबरदार पायरीवर पाय ठेवलास तर !
मी यवन आणि तू उच्च कोटीचा ब्राम्हण , मी नीचाचा नीच , तुला माझा विटाळ होईल. तू येथून निघून जा. मेघा ते बाबांचे उग्र स्वरूप पाहून चळचळ कापू लागला. मेघा आश्चर्याने थक्क झाला की माझ्या मनातले बाबांना कसे काय कळले? बाबा त्याला मारायला धावत होते, तसतसे मेघाचे धैर्य खचत होते.त्याचे एकेक पाऊल मागे पडत होते. असेच काही दिवस मेघा शिरडीत राहिला, शक्य ती सेवा करीत राहिला. पंरतु दृढ विश्वास काही बसेना.पुढे तो घरी परतला आणि तेथे तो तापाने अंथरुणाला खिळला. बाबांचा ध्यास लागल्याने तो परत शिरडीला आला.
असा मेघा जो परत आला तो तेथेच (शिरडीला) कायमचा रमला, आणि साईंचा अनन्य भक्त झाला. मेघा आधीच शंकर भक्त आणि पुढे साईभक्तीत , तो साईंनाच शंकर मानू लागला. साईनाथच त्याचे उमाशंकर झाले. मेघा रात्रंदिवस “साईशंकर” नावाचा मोठ्याने जप करीत असे, दुसरे कोणतेही दैवत तो मानीत नसे.साईंची पूजा हीच त्याच्यासाठी इतर सर्व देवदेवतांची पूजा होती.त्याच्यासाठी साईच त्याचे गिरिजारमण होते. शंकराला बेल प्रिय आणि शिरडीत तर बेलाचे झाड नव्हटे. म्हणुन मेघा बेलाची पाने आणन्यासाठी रोज दीड दीड कोस अंतर पार करुन जात असे, बेलासाठी तो डोंगरसुद्धा पार करुन जात असे. असे हे पूजेचे कौतुक करुन, मेघा स्वमनाची हौस पुरवित असे. मेघा गावातल्या सर्व ग्रामदेवतांची ठराविक क्रमाने पूजा करीत असे. मग त्याच पावलीं मशिदीत जाउन बाबांचे पाय चेपणे, पाय धुणे , त्यांच्या चरणांचे तीर्थ प्राशन करणे ही त्याची बाबांची नित्यसेवा चालायची, तो शिरडीत असेपर्यंत (म्हणजे इ.स.१९१२ त त्याच्या मृत्युपर्यंत ).
मेघा दररोज साईनाथांची दुपारची आरती करीत असे, पण त्याआधी समस्त ग्रामदेवतांची पूजा करुन, नंतर तो मशिदीत जात असे. असेच एके दिवशी त्याचा क्रम चुकला, प्रयत्न करुनही खंडोबाची पूजा राहून गेली. तेव्हा बाबा मेघाला म्हणाले आज तू पूजेत खंड पाडलास.सर्व देवांना पूजा पोहचल्या, पण एक देव पूजेशिवाय राहिला.मेघा म्हणाला दार बंद होते, म्हणुन पूजा केली नाही. बाबा म्हणाले आता जा, दार उघडे आहे. बाबांचा शब्द ऐकताच एक क्षण ही न दवडता मेघाने खंडोबाची पूजा केली. इथे बाबांनी त्याच्या इष्ट-देवतेच्या पूजेत खंड पडू दिला नाही, आणि त्याच्या नित्यनेमात ही खंड पडू दिला नाही. जरी तो बाबांना साईशंकर मानत असला तरी बाबांनी त्याच्या खंडोबाच्या सेवेत खंड पडू दिला नाही. खंडोबाची पूजा झाल्यावरच बाबांनी त्याची पूजा-आरती स्विकारली.
असेच एकदा मेघाला मकरसंक्रातीच्या दिवशी बाबांना गोदावरीच्या जलाने अभ्यंग स्नान घालण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्याने बाबांच्या पाठी तगादा लावला. शेवटी बाबांनी त्याला ” जा इच्छेस येईल ते कर” असे सांगितले. असे म्हणटल्या बरोबर मेघा सूर्योदय होण्यापूर्वीच घागर घेउन अनवाणी गोदावरी नदीकडे निघाला. जाउन येउन ८ कोस अंतर होते(२५ किलोमीटर) ,परंतु हा रस्ता कसा चालावा लागेल ह्याची चिंता त्याला मुळीच नव्हती. बाबांची आञा मिळताच उल्हासाने त्याने पाणी आणले, स्नानाची सगळी तयारी केली. बाबांना तो शंकर मान होता, गंगास्नानाने शंकराला आनंद होतो हे एकच त्याला ठाउक होते. बाबांना तो म्हणाला, आजचा मकरसंक्रातीचा सण आहे, शंकराला गंगेच्या पाण्याने स्नान घातले म्हणजे तो प्रसन्न होतो. मग त्याचे प्रेम पाहून , शुद्ध मन पाहून बाबा म्हणाले,” तुझी इच्छा पुरी होऊ दे, व मेघापुढे मस्तक करुन म्हणाले यावर किंचीत पाणी घाल. सगळ्या अवयवांत मस्तक मुख्य असते, त्यावर थोडे जल शिंपड म्हणजे पूर्ण स्नान केल्यासारखे होईल. मेघाने बरे म्हणून पूर्ण घडा ओततांना त्याला इतके प्रेम दाटून आले की ’हर हर गंगे’ म्हणत त्याने तो अख्खा घडा बाबांच्या अंगावर संबंध रिकामा केला. मेघाला अत्यंत आनंद झाला की माझ्या शंकराला मी सचैल स्नान घातले, तोच त्याला चमत्कार दिसला. त्याने जरी बाबांच्या सएव अंगावर पाणी ओतले होते, तरी बाबांचे फक्त मस्तकच तेवढे ओले होते आणि इतर अवयव कोरडे होते. कपड्यावर सुद्धा पाण्याचा एक थेंब नव्हता. मेघाचा अभिमान गळुन पडला. मेघाला अभिमान वाटत होता की बाबा नको म्हणत असतांना ही आपण त्यांना संबंध अंगावरुन आंघोळ घातली. परंतु बाबांनी त्याला चमत्कार दाविला आपले मस्तक तेवढेच ओले केले आणि जणु काय त्याला पटविले की बाबांच्या इच्छेविरुद्ध कोणी काहें करु शकत नाही.तसेच मेघाने ओतलेले घडाभर पाणी डोक्यातच थांबवुन ठेवुन, बाबांनी मेघाला जणू काय प्रचिती दिली की ते स्वत: स्वर्गातून खाली येणार्या गंगेला आपल्या जटेत सामावून घेणारे साक्षात शंकरच आहेत.
अशी आणीक मेघाची कथा – नानासाहेब चांदोरकरांनी मेघाला बाबांचे एक मोठी छ्बी दिली होती. साठे वाड्यात आपल्या खोलीत ठेवुन तिचीदेखिल तो भक्तीभावाने पूजा करीत असे. मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती आणि वाड्यात अगदी हुबेहुब छबी. दोन्ही ठिकाणी पूजा-आरती अहोरात्र चालत असे. अशी सेवा होतां होतां एक वर्ष लोटले आणि एकदा मेघा पहाटे जागा असतांना त्याला एक दृष्टांत झाला. बिछान्यात मेघा जरी डोळे झाकुन पडला होता तरी तो मनाने संपूर्णपणे जागा होता.अशावेळी त्याला बाबांचे स्पष्ट रुप दिसले. बाबांनी देखिल तो जागा आहे हे पाहून त्याच्या बिछान्यावर अक्षता टाकून “मेघा भिंतीवर त्रिशुळाचे चित्र काढ रे” असे सांगुन ते गुप्त झाले. हे बाबांचे शब्द कानी पडतांच मेघाने अतिआनंदाने डोळे उघडले. परंतु बाबा अदृश्य झालेले पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. बिछान्यावर चोहीकडे अक्षता पडल्या होत्या. वाड्याची दारेही बंद होती. मेघाला मोठे कोडे पडले. लगेच सकाळी बाबांचे दर्शन घेत असतांना दृष्टांताविषयी बाबांना विचारले , तेव्हा बाबा म्हणाले,”दृष्टांत कसला? माझा शब्द नाही कां ऐकलास? माझा शब्द फार खोलवर असतो, त्यातील एक अक्षरही व्यर्थ नसते. माझ्या प्रवेशाला दार लागत नसते.मी सदा सर्वदा सर्व ठिकाणी राहत असतो. माझ्यावर भार टाकून जो खरोखर माझ्याशी एकरुप झाला असेल, सतत माझे चिंतन करत असेल, त्याचा सर्व शरीरव्यापार मी चालवीत असतो. पुउढे त्रिशुळ काढण्यास सांगतात. बाबांचा हेतू किती कौशल्यपूर्ण आणि आश्चर्यकारक होता हे दिसून येतं.
मेघाने बाबांच्या छबीशेजारीच लाल रंगाचा त्रिशूळ काढला. दुसर्या दिवशी पुण्याहुन एक रामदासी भक्त आला, त्याने बाबांना शंकराचे लिंग अर्पण केले, इतक्यात मेघा तेथे आला. बाबांनी लगेच त्याला सांगितले “हा शंकर आला, त्याला आता तू सांभाळ. ” अशाप्रकारे त्रिशूळाच्या दृष्टांतापाठी एकाएकी लिंग प्राप्त झाल्यावर मेघा आश्चर्यचकीत ,थक्क झाला.
मेघाने हे लिंग वाड्यात काकासाहेब दिक्षीतांना दाखविले, जेव्हा काकासाहेब नित्याप्रमाणे स्नान आटोपून साईबाबांचे स्मरण करीत होते. नाम्स्मरण करीत असतांना त्यांना लिंगदर्शन झाले आणि आज लिंगदर्शन का व्हांवे ह्याचा विचार करत असतांनाच त्यांना मेघाने बाबांनी दिलेले लिंग दाखविले. एका क्षणापूर्वी ध्यानात जे रुप पाहिले, तेच प्रत्यक्ष पाहून त्यांना आनंद झाला. साईबाबांचे नामस्मरण करत असतांना शिवलिंगाचे दर्शन , म्हणजे आपण शंकरच आहोत याची प्रचिती जशी मेघाला दिली , तशीच पुन्हा काकासाहेबांनाही दिली. मेघाला शंकराच्या पूजेची आवड होती म्हणुन त्याला शंकराचे लिंग देऊन त्याची शिवभक्ती बाबांनी पक्की केली.
खरोखरच मेघाची तपश्चर्या अलौकिक होती. तो बाबांची आरतीही एका पायावर उभा राहून करत असे. खरोखरच बाबांशी त्याचा काही ऋणानुबंध असला पाहिजे, नाहीतर कर्मभ्रंश झालेल्या त्याला साठ्यांकरवी शिरडीला खेचून आणून येनकेन प्रकारे आपणच त्याचे एकमेव दैवत साक्षात शंकरच आहोत हे बाबांनी त्याला का पटवून दिले असते. त्याच्या भक्तीवर आणि त्याच्या तपश्र्चर्येवर प्रसन्न होऊन बाबांनी शिरडीतच आपल्याजवळ त्याचे निधन करवून घेतले इ.स. १९-०१-१९१२ रोजी त्याचे निधन झाले असतां बाबांनी स्वत: स्मशानयात्रेला हजर राहून, त्याच्या देहावर फुले वाहून, दारुण शोक केला. बाबांच्याही डोळ्यांत पाणी आले. त्यांनी आपल्या हातांनी मेघाचे प्रेत फुलांनी आच्छादिले व करुण स्वराने शोक करीत ते परत फिरले. नंतर मेघाच्या १३व्या दिवशी दादा केळकरांकडून बाबांनी शास्त्रोक्त श्राध्दविधी करवून घेतला, आणि त्यानिमीत्त जेवणाचा खर्चही बाबांनी स्वत: केला.मेघाला जेव्हा मृत्यु आला ( १९-०१-१९१२ रोजी), त्याच्या आधी बरोबर एक महीना आधी बाबांनी मेघाकडून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करवून घेतले होते. त्यानिमित्त मेघाने ०३-०१-१९१२ रोजी दिलेल्या ब्राम्हण भोजनाचा उल्लेख खापर्डे डायरींत आहे. खरोखर ज्याचा कोणी नाही त्याचा एकमेव रखवाला तो साई परमात्माच आहे हे बाबांनी दाखवून दिले. आपल्या भक्ताची उत्तरोत्तर प्रगती करवून घेण्यात तसेच त्याला सदगती देण्यात सदगुरुतत्व किती तत्पर असतें हे मेघाच्या कथेवरून दिसून येते.
श्रीराम…