Demeter in disguise of Thada roaming in Cetu colonies

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Demeter in disguise of Thada roaming in Cetu colonies

#123664

Suneeta Karande
Participant

हरि ॐ दादा.
दिनांक ८ फेब्रुवारीच्या अग्रलेखात डेमेटर (Demeter)थाडा (Thada) रुपात वावरताना किती सतर्क आणि सावध असते हे पदोपदी जाणवते. तिने सेटू(Cetu) लोकांच्या स्वभावाचे बारीक बारीक तपशील नुसतेच अभ्यासले नाही तर ती अत्यंत सफाईने सेटूंच्या वस्तीत वावरताना त्यांचा अवलंब करून स्वत:चे हर्मिस (Hermis), अ‍ॅपोलो(Apollo) आणि सॉरेथसचे(Sauretheus) संरक्षण करताना आढळते. “सेटूंच्या डोळ्यांनाही कान असतात , एकाच वेळी दोन थाडा दिसल्याने गोंधळ होऊ शकतो, कुठेही आणि काहीही पाहिले तरीही जराही प्रतिक्रिया दाखवू नका अशा सतत दिल्या जाणार्‍या सूचनांमधून डेमेटरच्या अत्यंत चाणाक्ष, चतुर आणि मुत्सद्दी स्वभावाची दिसणारी झलक विस्मीत करून जाते. येथे आठवले की आपले बापू आपल्याला प्रवचनातून वारंवार प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ह्या बाबतीत का जागृत राहायला शिकवितात. कोणत्याही गोष्टीचे नीट बारकाईने निरीक्षण केल्या विना, सत्य व परखड वास्तव ह्याची नीट जाणीव न करून घेता, घाईघाईने , भावनेच्या आहारी जाऊन तात्काळ आपले मत मांडणे म्हणजे प्रतिक्रिया आणि सर्व सारासार विचार करून विवेक बुध्दीच्या आधारे घेतला जाणारा निर्णय म्हणजे प्रतिसाद असे मला वाटते. डेमेटरच्या कुठेही आणि काहीही पाहिले तरीही जराही प्रतिक्रिया दाखवू नका ह्या सूचनेचे हर्मिसने केलेले पालन किती मोठा अनर्थ टाळते हे पुढे लेख वाचताना कळते.
येथे आठवते ते सुंदरकांडातीलच बापूंनी आधीच्या अग्रलेखातून समजाविलेल्या साक्षात जानकी मातेच्या आणि महाप्रभू हनुमंताच्या आचरणाची. बापूंनी स्पष्टपणे उलगडून दाखविले होते की साक्षात् महाप्रज्ञा असणारी जानकी म्हणजेच सीता(Sita) माता श्रीरामांच्या(Ram) असह्य विरहाने आणि रावणाच्या(Ravan) शूलासम वाक् ताडनाने व्यथित झालेली असून देखिल हनुमंत रामप्रभूंची मुद्रिका असणारी अंगठी टाकतात आणि श्रीरामांचे अत्यंत रसाळ, सुमधुर वाणीने गुणगान गातात तरी प्रथम दर्शनी सीतामाई आपली सभानता, सतर्कता जागृत ठेवून वापरतात. वानरांची आणि श्रीरामांची भेट कधी व कोठे झाली हे नीट जाणून घेऊन नंतरच हनुमंताच्या कथनावर विश्वास ठेवतात. तसेच हनुमंत सीता मातेचा शोध घेत लंकेत वावरत असताना श्रीरामांची आयुधे चिन्हांकित केलेले लंकेतील एकमेव घर आणि दारातील ताजे तुलसी वृंदावन पाहूनही बिभीषणावर सज्जन म्हणून प्रथम विश्वास ठेवत नाही. बिभीषणाने झोपेतून उठताक्षणी रामनाम घेतल्यावरच हा सज्ज्न रामभक्त असावा असे विश्वासपात्र मत बनवितात. म्हणजे व्यवहारात चौकस वृत्तीने “पहिले आधी ते सावधपण ” का महत्त्वाचे असते आणि ते पाळणे किती हितावह असते असे वारंवार का बजावले जाते ते ध्यानात सहजपणे येते.
उपवनात सॅथाडॉरिनाच्या दोन बाजूंना चालणार्‍या प्रॉमेथस आणि झिरॉनला पाहून कपाळात तिडीक गेलेल्या सॉरेथस आणि अ‍ॅपोलोला खांद्यावर हात दाबून शांत बसविणारा पण स्वत: मात्र अस्फुट स्मितहास्य करीत प्रसन्नता दर्शविणारा हर्मिस, निरनिराळे हातवारे करून उत्तानपिष्टीमकडे जवळ जाण्याचा आटोकाट प्रयत्न करणार्‍या माता र्‍हिया सॅथाडॉरिना (Sathodorina)रथात येताच कशी मागे सरकते हे पाहणारा आणि इतर तिघांना हे दृश्य दिसू न देण्याची काळजी घेणारा हर्मिस अशा विवीध प्रसंगी स्वत:च्या आचरणातून प्रतिक्रिया न देण्याचे कसे टाळायचे हे निदर्शनास आणतो.
त्याच्या धूर्त, चाणाक्ष, कावेबाजांना हेरणार्‍या बुध्दीचातुर्याला खरेच मनापासून दाद द्यावीशी वाटते आणि जाणवते सज्ज्न म्हनून समाजात साळसूदपणे वावरणार्‍या आणि श्रध्दावानांची फसगत करणार्‍यां विचीत्र श्रध्दाहीनांच्या कारवाय़ांपासून कसे आपले संरक्षण करावयाचे असते.
वयाने ज्येष्ठ आणि अधिकाराने श्रेष्ठ असणारी डेमेटर सम्राट झियसचा पुत्र सॉरेथस, हर्मिस आणि अ‍ॅपोलो ह्या आपल्या आप्तांच्या धर्म, नीती ह्यांचाही अत्यंत बिकट प्रसंगी सुध्दा कसा सांभाळ करून व्रती घराण्यांच्या नियमांचा सन्मान करते हे पाहून जाणवले की “पावित्र्य हेच प्रमाण ” हा देवयान पंथीयाचा मर्यादापालनाचा आदर्श हे व्रती घराणे सुध्दा मानत होते आणि प्राणपणाने त्याचे पालन ही करतच होते. सेटू, चेटूच्या अशुद्ध अन्नात मानवी बलिदानाचे रक्त मिसळलेले असे हे ध्यानात ठेवूनच वेळप्रसंगी मिळेल ते सेटू , चेटू लोकांचे अशुध्द अन्न खाऊन उदरनिर्वाह करण्याची डेमेटरची मनोवृत्ती नाही. यावरून असे वाटते की “प्रज्ञापराधात् रोग:” ह्या आरोग्यविषयक ध्येयाचा ते आपल्या रोजच्या जीवनात, व्यवहारात किती काटेकोरपणाने अवलंब करीत असले पाहिजेत कारण डेमेटर जातीने स्वत: व्रती घराण्याच्या रीती-रिवाजा नुसार शुध्द अन्न बेमालूमपणे खाता यावे ह्याकडे कटाक्षाने लक्ष पुरविते. मानवी मांस , मानवी रक्त हे किती घातक असते ते बापूंनी सध्याच्या प्रवचनांतूनही समजावले आहेच, त्याचा पाठपुरावा करून स्वत:ची नीतीमूल्ये सदैव जपणारी ही डेमेटर, हर्मिस ही खरोखरी आदर्श प्रतिके वाटतात. हर्मिसची मनोवृत्ती बारकाईने न्याहाळून अभ्यासणार्‍या सॉरेथस आणि अ‍ॅपोलोच्या निरीक्षण वृत्तीचे कौतुक करावेसे वाटते.
समोरची आप्त म्हणवून घेणारी प्रॉमेथस आणि झिरॉनसारखी विश्वासू माणसे विश्वासघात करताना पाहूनही “महादुर्गा आपल्या पाठीशी नक्कीच आहे ” हे ठणकावून स्वत:ला आणि इतरांना सांगून धीर देणारा आणि स्वत:चा संयम न सुटू देणारा हर्मिस- श्रध्दा आणि सबूरीचे समर्पक जिवंत उदाहरणच वाटते. कोणत्याही प्रसंगी डगमगून न जाता धैर्याने लढणार्‍या सम्राट झियस(Zeus) आणि सम्राज्ञी बिजॉयमलानाच्या (Bijoymalana)तर असीम शोर्याची दाद द्यायला शब्दच अपुरे पडतात.

सॅथाडॉरिनाच्या रुपात असलेल्या सम्राज्ञी बिजॉयमलानावर र्‍हियाच्या रुपातील सॅथाडॉरिना जेव्हा चवताळलेल्या मांजरीप्रमाणे झेप घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा अत्यंत सावध असणारी सम्राज्ञी बिजॉयमलाना तिच्या हातातील साखळी खेचून तिला खाली पाडते व नीच सर्कीशी क्रौर्यानेच वागायला पाहिजे हे म्हणत स्वत: तिची जीभ कापल्याचे कबूल करते – हा प्रसंग पाहून बापूंनी आपल्याला “मातृवात्सल्य विंदानम्” ह्या ग्रंथातील् ४०व्या अध्यायात सांगितलेले सत्य आठवले – ज्याच्या शरीरामध्ये चालण्याचेही त्राण नाही , अशा दुराचार्‍याकडे सर्व प्रकारचे दुराचार करायची ताकद मात्र सदैव शिल्ल्क असते व तो ती वापरतोच. त्यामुळे कुणीही श्रध्दावानाने श्र्ध्दाहीन दुराचारी कितीही व्याधीग्रस्त , आपदाग्र्स्त व असहाय्य दिसला तरीही त्याच्यावर थोडाही विश्वास ठेवू नये ह्याची प्रचिती पटते ती जीभ कापलेल्या असहाय्य अवस्थेतही नीच सॅथाडॉरिना कसे उत्तानपिष्टीमला सत्य सांगण्यासाठी कशी शक्कल लढवते हे पाहून…

स्वत:चा लवमात्र अभिमान न बाळगता , केवळ आपल्या पतीचे विचार, दृढनिश्चय आणि क्षणात उचित निर्णय घेण्याची क्षमता ह्यांमुळेच
सर्व राज्य हरूनही आपणच जिंकले आहोत ही आदरवृत्ती बाळगणारी सम्राज्ञी बिजॉयमलाना पतीव्रतेचा आदर्श , अत्युत्त्म आविष्कार घडविते.

महामाता सोटेरियाचे पापुद्र्यांचे मुखवटे बनविंण्याचे कौशल्य तिचे गुप्तचरविद्येतील सर्वश्रेष्ठत्त्व सिध्द करते. सावर्णी वंशातील अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय असे व्यक्तीमत्त्व . सर्वांचे आदराचे , मानाचे स्थान असणारी ही महामाता सोटेरिया(Soretiya) अक्कड पर्वताच्या पायथ्याशी असणार्‍या लिलीथभक्तांच्या(Lilith) वस्तीत ह्या वयातही लिलीथच्या खास सल्लागार दासीच्या रुपात बनून राहते… हे वाचताना आठवले श्रीराम प्रभूंच्या सीता माईच्या शोधाच्या कार्याच्या पूर्तीसाठी लंकेत आलेल्या हनुमंताला रावणाच्या दरबारात शेपटी पेटविण्या आधी राक्षस लाथेने मारतात आणि वाईट अर्वाच्य शिव्या ही देतात. खरे तर प्रतिकार करण्याचे अचाट सामर्थ्य असताना ही हनुमंत रामाच्या कार्याच्या सफलतेसाठी अपमान व मार सहन करतो आणि त्यात कोणताही अपमान वा हीनपणा मानीत नाही. हनुमंत हे सारे सहन करतो.
तसेच सम्राट झियसच्या विजय़ासाठी ही सोटेरिया सुध्दा मान-अपमान ह्याची जराही तमा न बाळगता लिलीथ सारख्या य:कश्चित शत्रूची दासी बनण्याचे नाटक खंबीरपणे पार पाडताना दिसते. अंतिम ध्येयाच्या सफलतेसाठी, कोणत्याही थराला जाऊन कष्ट घेण्याची पराक्रमी वृत्ती म्हणजेच खरा पुरुषार्थ असावा जो परमेश्वराला आणि आदिमातेला प्रेरित असावा जो हिच्या आचरणातून शिकावयास मिळतो.
डेमेटरला श्येन तर ग्रीक व संस्कृत ह्या दोन्ही भाषा ही महामाता सोटेरियास अवगत होत्या. ह्यावरून विवीध भाषा शिकणे किती उपयोगी असते आणि कठीण प्रसंगी हे कसे सहाय्यकारी ठरू शकते हे जाणवते. बापूंनी आपल्याला १३ कलमी मध्ये विवीध भाषांचा आणि आंतरराष्ट्रीय – आंतरखंडीय परिस्थिती, घटनांचा अभ्यास का करावयास सांगितला ह्याचे स्मरण झाले.
खरेच बापूंनी आपले जीवन सोपे करण्यासाठी सदैव किती शब्दातीत परिश्रम घेतले आहेत, किती अटाटी केली आहे हे आठवून कंठ दाटून येतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामाता सोटेरिया, सम्राट झियस, सम्राज्ञी बिजॉयमलाना , लेटो, डेमेटर, हर्मिस हे सारेच आदिमातेशी म्हणजेच महादुर्गेशी सदैव कृतज्ञ राहतात, तिच्या ऋणांचे सतत स्मरण करीत राहतात, तिच्या अपार सामर्थ्यावर अतूट विश्वास ठेवतात आणि हीच अंबज्ञता त्यांच्या अत्यंत कठीण प्रसंगी ही कामास येते आणि त्यांचे संरक्षण होतेच होते.
त्रिविक्रमाची ग्वाहीच आहे “मातृवात्सल्य -उपनिषदात ” दिलेली तशी –
” तुम्ही कितीही विद्वान, विद्यापारंगत व मंत्रपाठक आहात, त्याने काहीच फरक पडत नाही ,
सर्वकाही एकाच गोष्टीवर ठरते , तुमचा माझ्या आदिमातेवर किती शुध्द विश्वास आहे.”
बापूराया “वैश्विक इतिहास ” वाचता वाचता आम्हा सर्व तुझ्या लेकरांचा असाच तुमच्या आणि तुमच्या आईच्या – आदिमातेच्या चरणांवरचा विश्वास सदैव वाढता राहो आणि अंबज्ञता कायमच वाढती राहो ही तुझ्या चरणी प्रार्थना !!!

श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे