#544836

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
तुलसीपत्र ११८७ हा दिनांक १५-१२-२०१५ चा अग्रलेख वाचताना बापूंनी लिहिलेले मातृवात्सल्यविन्दानम् आठवले.
मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद: ह्या ग्रंथात आपण ११व्या अध्यायात वाचले होते की आदिमाता महिषासुरमर्दिनीने महिषासुराचे खड्गाने मस्तक छेदिले व परशुने त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले. पुढे २० व्या अध्यायात वाचतो की महासरस्वतीने अतिशय क्रोधाने शुंभाचे अक्षरश: शेकडो तुकडे केले होते. ते वाचताना आजपर्यंत वाटत होते की ह्या असुरांना आदिमातेने मारले म्हणजे असुरांचा समूळ नाशच झाला पण आज कळते की ह्या कपटी पाताळयंत्री प्रथमशुक्राचार्याने फोमॅलहुतान ग्रहावर दनुच्या सहाययाने महिषासुर , शुंभ व जंभासुराचे दहन न होऊ देता त्यांचे मृत अवशेष दफन करून ठेवलेले होते. आदिमातेने एवढ्या वेळेला ह्याच्या प्रत्येक धूर्त योजनेला पाने पुसली असूनही हा जरासुध्दा बधत तर नाहीच उलट दरवेळेला नवीन नवीन युध्दाच्या क्लृप्त्या शोढून काढायला थकत नाही. अशा ह्या नीचाला सुध्दा आदिमाता क्षमा करायला तयार असते ह्यावरून आदिमाता ही खरोखरीच किती क्षमाक्षील आहे, तिचे क्षमा हे नावच किती यथार्थ आहे हेच दिसून येते.
निक्सचे विचार पाहून तर खरेच हसावे का रडाव का तिच्या सुमार बुध्दीची कीव करावी हेच समजत नाही. त्या चार पुतळ्यांच्या तिला भासणार्‍या दयनीय अवस्थेवरून तिला वाटते की श्रध्दावानांनी धडा घ्यावा व दुराचार्‍यांच्या मार्गाने जावे म्हणजे त्यांचे भले होईल.
सेमिरामिसने मनोनियंत्रित केलेली पुलिका त्यांच्या जाळ्यातून सुटून जाते आणि तिचा थांगपत्ताही लावता येत नाही व हॉरेवॉनस जो जन्मजात दुराचारी श्रध्दाहीन असतो तोपण शेवटच्या अंतिम क्षणी आदिमातेच्या स्मरणाने ह्याच श्रध्दाहीनांच्या मृत्युच्या कचाट्यातून सहीसलामत वाचतो (तुलसीपत्र दिनांक ०३.१२.२०१५) व ह्यावरून अक्कल न आलेली ही निक्स समजते की कुविद्यांची चटक लागल्यावर त्रिविक्रमाची भक्ती कोण करणार ? हॉरेवॉनसच तर मुळापासून कुविद्याधारकांच्या घोळक्यातच वाढला होता तरी एका क्षणात तो आदिमातेला शरण गेला होता

ह्या उलट अंकाराच्या काटेकोर नियमानुसार जाहबुलॉन त्याच्या जन्मानंतर त्याच्या जन्मदात्रीलाच खाणार होता. किती नीचता अगदी ठासून ठासून भरली आहे ह्या दुराचारी, श्रध्दाहीनांमध्ये. वाचताना सुध्दा मन शहारते नुसते.
परंतु तेच दुसर्‍या टोकाला मन भारावून जाते तो सावर्णि घराण्याचा त्याग पाहून….
माता पुलिकाचा निं:स्सीम त्याग, हायपेरिऑन, अनंतव्रत आणि हेस्टिया ह्या सर्वांचीच त्यागवृत्ती पाहताना संत तुलसीदास विरचित सुंदरकांडातील साक्षात महाप्राण हनुमंतानी लंकेत जाऊन स्विकारलेला अपमान आणि रामप्रभूंच्या कार्यपुर्तीसाठी कोणत्याही थरावर जाऊन अपमान स्विकारण्याची तयारी ह्याचे स्मरण झाले. रावणाच्या दरबारात त्याच्या पुत्राने इंद्रजिताने हनुमंतावर ब्रम्हास्त्राचा प्रयोग करून बांधून आणले होते अर्थातच फक्त ब्रम्हास्त्राचा मान ठेवण्याच्या पवित्र उदात्त हेतूने स्वत: हनुमंतानेच त्या ब्रम्हास्त्रात स्वत:ला बांधून घेतले होते. त्यानंतर रावण जेव्हा हनुमंताच्या शेपटीला वस्त्र गुंडाळून त्यावर तेल , तूप टाकून ती जाळण्याचे फर्मान सोडतो. ह्या वेळेला हनुमंताच्या पराक्रमापुढे य:कश्चित लायकी नसलेले नगरीतले लोक, असुर, राक्षस येऊन त्याला लाथा मारतात व त्याची थट्टा मस्करी करतात. पण मारूतीने प्रभुकार्यासाठी हे सर्व आनंदाने सहन केले कारण व्यक्तिगत मानापमानाची तमा न बाळगता त्याला सदैव रामकार्याचेच भान आहे.
रहा न नगर बसन घृत तेला | बाढी पूंछ कीन्ह कपि खेला ||
कौतुक कह आए पुरबासी | मारहिं चरन करहिं बहु हासी || १४५ ||
(सुंदरकांड)

येथे अग्रलेखात आपण वाचतो दुसरा अनंतव्रताचा पुतळा हा पायांवर ओणवा बनून कुत्र्याच्या रूपात उभा होता आणि चौथा पुतळा हायपेरिऑनचा ह्याच्या तर मुकुटाला केरिडवेनच्या रूपातील निक्स चक्क लाथ मारते.
तरीही जिवंत अवस्थेतील पुतळ्याच्या रूपातले हे चौघेजण त्रिविक्रमाच्या कार्यपूर्तीसाठी हे सारे अपमान स्विकारतात.
निक्सच्या बोलण्याप्रमाणे दीड हजार वर्षे पुतळा बनलेल्या अवस्थेत हायपेरिऑन (चौथा पुतळा) आहे.
कुमार्गीयांना कधीच आदिमातेचे आणि तिच्या पुत्राचे त्रिविक्रमाचे सामर्थ्य कळूच शकत नाही. निक्सला वाटते की दनुच्या शापामुळे ते पुतळे बनले आहेत आणि नंतर जळून नष्ट होणार आहेत. पण बापूंनी सांगितलेले सत्य म्हणजे माता लोपामुद्रेने आधीच ते खोटे पुतळे संदुकीत लपवून ठेवले आणि हे प्रत्यक्षात चौघे तेथे वावरत होते पुतळे बनून!
परमपूज्य नंदाईने श्रध्दावानांना एका अधिवेशनात केलेल्या मार्गदर्शाची आठवण झाली त्यात आईने सुध्दा हेच सांगितले होते की येथे आपण सारे बापूंसाठी उपासना केंद्रावर जमतो, बापूंचे कार्य करताना बॅच मोठा की पद मोठे ह्या गोष्टी आड येताच कामा नये. जेव्हा आपण Expectations ठेवतो तेव्हा त्या मिळाल्या नाही की दु:खी होतो.अपेक्षा ह्या वाढतच जातात. Expectations हे आपण आपलेच थांबवायला लागतात. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्यांमुळे आपण आपली उपासना थांबवतो, भक्ती थांबवतो, chanting थांबवतो. वानरसैनिक म्हणून मला हे शोभणारे नाही आहे. मला स्वत:ला प्रश्न विचारता आला पाहिजे की मी बापूंसाठी काय केले, काय करते , मी बापूंच्या कार्यात काय काय केले आहे.हे प्रश्न आले ना की आपणच आपल्याला बापूंच्या कार्यात इतके झोकून देऊ की पोस्ट गेली खड्यात. बापूंचे कार्य महत्त्वाचे का पोस्ट महत्त्वाची? कार्य महत्त्वाचे ना मग पोस्ट गेली उडत. मला कार्य करत राहू दे बापूंचे , पोस्ट काय मिळत राहील नाही मिळणार. ह्यात मला अडकायचे नाही. बापूंचा शब्द , बापूंचे आज्ञापालन आणि बापूंचे कार्य ह्या तीनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जन्माला आल्यापासून मला कोणी विचारले का ?कोणी पोस्ट दिली होती का? मी काय तुम्हाला लाचलुचपत देऊन सांगितले का मी तुम्हाला हे बनवते म्हणून नाही ना का बापूंनी दिलय का दादांनी दिलय , नाही ना. जन्माला आल्यापासून आपल्याला कोणी विचारले होते का, आज मी कार्य करते म्हणून मला विचारतात , मग मला कार्य करत राहू दे. जन्मापासून मृत्यूपर्यंत मला फक्त कार्य करत राहू दे हेच माझे aim असू दे. बापूंच्या कार्याचा मला इतका ध्यास लागू दे की मग Politics, भांडणे उरतच नाही. आईने तिच्या सुमधुर आवाजातून हनुमंताला रामाचा वानरसैनिक बनण्यासाठी जे आवश्यक आहे, अपेक्षित आहे असे वाटते त्याची जाणीव करून दिली एवढेच नव्हे तर असे वाटते त्याचाच धडा तिच्या लेकरांकडून गिरवून घेतला होता जणू काही !
पूज्य समीरदादा पण नेहमी हेच सांगतात आवर्जून की जो निर्णय़ वा विचार माझ्या बापूंच्या कार्याला पुढे नेतो तोच खरा , जो माझ्या बापूंच्या कार्याला मागे खेचतो, मागे नेतो तो विचार , तो निर्णय बरोबर असूच शकत नाही.
आई, दादा हे सारेच जण आपल्याला आपल्या बापूंच्या कार्यासाठी आपले मान-अपमान सोडायला सांगतात आवर्जून , ह्याचाच अर्थ आम्ही कळत-नकळत कुठेतरी चुकतो हे “त्या” अनंत करूणामयी सदगुरुतत्त्वाच्या कार्याला अवरोध करणारे ठरू शकते हे जाणूनच आई , दादा कळकळीने आम्हाला न रागावता , अतिशय प्रेमाने सांगतात . मला असे वाटते की आम्ही “आता तरी ” हे शिकायलाच हवे.
हे अग्रलेख सावर्णि घराण्याचे आचरण दाखवतात की त्यांनी त्यांच्या आचरणातून , आचार- विचारांतून त्रिविक्रमाशी , आदिमातेशी म्हणजेच रणदुर्गेशी -महादुर्गेशी क्से घट्ट नाते स्थापले होते. हे अग्रलेख म्हणूनच आमचे बापू आम्हाला दाखवत आहेत की आम्ही देखिल शिकावे त्यातून की आम्हाला आमच्या बापूंशी, आमच्या त्रिविक्रमाशी आणि आमच्या आदिमातेशी किती घट्ट आपले नाते जोडायचे , आपली नाळ कशी जोडायची आहे.
खरेतर तसे बघायला गेले तर त्रिविक्रम हा त्या सावर्णि घराण्याला क्वचितच कधीतरी दिसत होता आणि आपले अहोभाग्य म्हणजे “तो” त्रिविक्रम आज आपल्याला सगुण साकार सावयव रुपातील सदगुरु म्हणून लाभला आहे जो सतत आपल्या सोबत असतो, आपल्याला दर्शन देतो, आपल्या सवे हसतो, गातो, नाचतो. म्हणजे आपल्यावर किती मोठी कृपा ह्या आदिमातेची आहे मग तर आपली जबाबदारी पण तेवढीच वाढते की आपल्या लाडक्या बापूंसाठी आपण आपल्या सर्व वैयक्तिक मानापमानांना तिलांजली द्यायला हवी आणि फक्त बापूंच्या कार्यासाठीच , आदिमातेच्या आनंदासाठीच झटायला हवे एकजूट होऊन, सांघिकपणे.
समीरदादा एकदा अधिवेशनात म्हणाले होते माझ्या बापूंच्या चेहर्‍यावरचा आनंद हीच माझी इच्छा ! किती सत्य आणि यथार्थ बोल आहेत आपल्या दादांचे.
आदिमाते आम्हाला अशीच सुबुध्दी दे जेणे करून आमच्या बापूंचे, त्रिविक्रमाचे कार्य पुढे नेण्यास आमचा अंशभर तरी हातभार लागेल , तरच हा मानवी जन्म खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल असे मला तरी वाटते.

जय जगदंब जय दुर्गे !

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे