#539005

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
दिनाक ११-१२-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११८५ वाचताना एक महत्त्वाची बाब प्रकर्षाने जाणवली की वैश्विक अंकारा महासंघाच्या अत्यंत महत्त्वाच्या सभेत प्रमुख प्रतिनिधी वसुंधरेवरील घडामोडींविषयी चिंता व्यक्त करीत होते – कारण ती वसुंधराच सर्व विश्वाच्या सूत्रस्थानी होती. ह्यावरून आपल्या वसुंधरेचे महत्त्व अधोरेखित होते. पावित्र्याची ताकद किती प्रचंड असते, जबरदस्त असते आणि ती मी मी म्हणणार्‍या भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळवू शकण्यास समर्थ असते हेही सिध्द झाले. तेथे मग तो अनुनाकीय असो, दुराचारी असो वा वामाचारी पंथीय असो, सार्‍यांनाच वसुंधरेच्या महतीचा चांगलाच दरारा होता हे लक्षात येते आणि हे वाचताना नकळत (बापूकृपेनेच)आठवले मातृवात्सल्य उपनिषद !
उपनिषदातील पहिल्याच अध्यायात आपण वाचले होते की आदिमाता चण्डिकेने वसुंधरा पृथ्वीवर स्थापन केलेल्या त्रिविक्रम लिंगातून स्वत:च निर्माण केलेल्या श्रीत्रिविक्रमास आज्ञा केली होती की वसुंधरेच्या पावित्र्याचे केंद्रस्थान असलेल्या “श्रीगुरुक्षेत्रम्” पासून स्थूल प्रवास सुरु कर. म्हणजे युगानुयुगे आदिमाता आणि तिचा पुत्र श्रीत्रिविक्रम ह्या वसुंधरेचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि जपण्यासाठी सतत झटतच असतात असे मला वाटते.
पुलिका जरी सेमिरामिसची मनोनियंत्रित गुलाम म्हणून काही काळ अनुनाकीयांच्या ताब्यात होती तरी तिने तिच्या लेकीला आशियाला ती माता थियाकडे वाढत असताना नियमितपणे भेटून ’झिबाल्बन’ ही झिबाल्बामधील अर्थात दनुच्या साम्राज्याची भाषा शिकवलेली होती जी आता आशियाला सम्राट अ‍ॅपोरोजाटसच्या साम्राज्यात वावरताना किती उपयोगाची ठरते ह्यावरून दूरदर्शी स्वभावाचे महत्त्व समजते. आशिया किती सावध राहून चाणाक्षपणे पावले उचलत आहे ह्यावरून ह्या नाट्याची भीषणता , त्यातील थरारकता स्पष्ट जाणवते. सम्राट अ‍ॅपोरोजाटसने केलेल्या झिबाल्बन भाषेतील स्वागताला आशि-थाडा रूपातील आशिया झिबाल्बन भाषेतूनच मोठ्याने शुभेच्छा देऊन अत्यंत जोरात ’माता दनुचा जयजयकार असो’ अशी ललकारी देते ह्यावरून तिच्या हजरजबाबीपणाचे आणि प्रसंगावधानतेचे कौतुक करावे तितके थोडेच वाटते.
आपल्या इष्ट देवतेच्या महादुर्गेच्या आणि त्रिविक्रमाच्या विरोधी शत्रूपक्षात सामील होऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन कार्य करणे ही खरेच किती कठीण गोष्ट आहे तरी देखिल आशिया ज्या प्रकारे एकेक पावले उचलत आहे त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे, मुळात हे सर्व करताना किती प्रचंड भक्तीचे, श्रध्दा , सबूरीचे पाठबळ असायला हवे आणि आपल्या परमेश्वराच्या चरणांवर किती पराकोटीचा विश्वास असावा लागतो हे कळते आणि लक्षात येते का आपल्याला सदगुरु बापूंनी “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता सदगुरु ऐसा” हा संकल्प वर्षभर जपायला लावला होता.
येथे आशिया असो वा पुलिका वा अ‍ॅटलास ( वेशांतर करून वावरणारा टॉलॉस म्हणजेच आशियाचा पुत्र) वा हायपेरिऑन वा हेस्टिया वा अनंतव्रत -सर्वच जण आपल्याला त्यांच्या त्यांच्या आचरणातून दाखवतात की त्यांना जरी स्वत:ला सोयीस्कर असणार्‍या प्रांतातून (कम्फर्ट झोनमधून) बाहेर काढून जीवावर बेतणार्‍या संघर्षाच्या प्रांतात टाकले गेले तरीही ते त्रिविक्रमाला किंवा महादुर्गेला किंवा महामाता सोटेरियाला कधीच का म्हणून प्रतिप्रश्ण करीत नाहीत , कधीच नाही. एवढा अढळ विश्वास, अटळ श्रध्दा असल्याशिवाय आणी पराकोटीची सबूरी असल्याशिवाय हे शक्यच नाही. मला वाटते बापूंना आणि आदिमातेला हाच पराकोटीचा विश्वास , अनन्य शारण्य आणि धैर्य आणि सबूरी आपल्या कडून अपेक्षित आहे , येणार्‍या काळात आपल्या सदगुरुंसोबत चालण्यासाठी असेच हे अग्रलेख शिकवत आहेत जणू!
आतापर्यंत प्रेमप्रवास मध्ये बापूंनी सांगितलेली आचमन ७१ मधील तितिक्षा नीट समजत नव्हती पण ह्या डिसेंबर महिन्याच्या कृपासिंधुत महाधर्मवर्मन डॉक्टर योगिंद्रसिंह जोशी ह्यांनी लिहिलेला “उपासनेला दृढ चालवावे – भाग ५ ) हा वाचून आणि सदगुरु बापूंच्या तुलसीपत्र ११८५ ह्या अग्रलेखाला वाचून थोडे थोडे समजायला लागले आहे असे जाणवते.
बापूंनी लिहिले होते की बाहेरील सुख-दु:ख, अडचणी, लोभ, मोह, त्रास, निंदा ह्या सर्वांना प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देण्यास शिकणे म्हणजेच ’तितिक्षा’
अ‍ॅटलांटिसा प्रांताकडे निघून तीन दिवसाच्या प्रवास करूनही आपल्या बाजूला कोण यानचालक बसला आहे हे जाणून न घेता शांत बसणारी संयमी आशिया, मानवांना ज्या अ‍ॅटलांटिसा नगरीचे नावच फक्त माहीत आहे अशा अगम्य प्रांतात पाऊल टाकाय़ला न डगमगणारी आशिया, तिचा स्वत:चा पुत्र अ‍ॅटलास तेथे काही महिने वास्तव्य करत असून त्याच्याकडून आलेली कुठलीही माहिती तिला देण्यात आलेली नसतानाही त्याचा अर्थ तिला अ‍ॅटलांटिसावर कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय उतरणे आवश्यक आहे असे नीट समजावून घेणारी आशिया , पाषाणयंत्रे पाहताच प्रथमशुक्राचार्यांनी अल्बिऑन ( Britain) प्रांतात स्थापन केलेल्या पाषाणयंत्राचे स्मरण करून निर्णय घेणारी आशिया, आणि महादुर्गेची भक्त असूनही कार्याच्या पूर्ततेसाठी दनुच्या नावाचा जयजयकार अत्यंत जोरात ललकारी देऊन करण्यास न कचरणारी आशिया —- सारे काही अगम्यच वाटते … तितिक्षेचा खरा अर्थ बापूराया आज तुझ्या कृपेने तुझ्याच शब्दांतून थोडा तरी समजायला लागला ह्याचा आनंद होत आहे.

बापूराया अजब तुझी लीला ! आता शेवटची खूण पुलिकाने महामाता सोटेरियाला कळवली आहे आणि त्यातही आरकॉन व पुलिकाला झिबाल्बामध्ये जायला हरकत नाही असा संदेशही दिला जातो म्हणजेच पुलिका हे पात्र दोन भूमिकांमध्ये खेळवले जात आहेत. आता महामाता सोटेरियाची पुढची आक्रमक खेळी काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच एकीकडे पुलिका सॉलोमन झेलहुआने दिलेल्या सांकेतिक नावानुसार डेल्टा आहे तर स्वत: पुलिका महामातेला सांगते तिलाच दोन्ही ठिकाणी ’ओमेगा’ म्हणत आहेत – त्या वैश्वैक अंकारा महासंघाच्या सभेमध्ये आणि झिबाल्बामध्येही … काय भयानक गुंतागुत चालली आहे … बापूच आता काय सत्य त्यावर प्रकाश पाडतील ….

आदिमाता चण्डिकेचा जयजयकार ! जय जगदंब जय दुर्गे !
मोठ्या आई आम्ही खूप खूप खूप अंबज्ञ आहोत की तू आम्हाला साक्षात तुझ्या पुत्राच्या त्रिविक्रमाच्या हाती सोपवलेस, वसुंधरा पॄथ्वीवर जन्माला घातलेस आणि वसुंधरेच्या पावित्र्याचे केंद्रस्थान असलेल्या “श्रीगुरुक्षेत्रम्” चे दर्शन घडविलेस आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या बापूंच्या कृपेनेच त्यांच्या चरणीची आणि तुझ्या चरणीची अंबज्ञता शिकवलीस. आदिमाते सर्व काही सुटले तरी चालेल पण ही तुझ्या आणि त्रिविक्रम बापूंच्या चरणीची अंबज्ञता कधीही सुटू देऊ नकोस !

जय जगदंब जय दुर्गे !

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे