Forums Sai – The Guiding Spirit हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman) Reply To: हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)

#345089

SwatiVeera Kudav
Participant

हरि ओम

हेमाडपंत लिहितात……

परि मी गाडीत जाउनि बसतां l वांद्रे स्टशनी गाडी असता l
यवन एक गाडी सुटता l अति चपळतां आंत ये ll 125 ll

तिकीट घेतले दादरपर्यंत l तोच आरंभी कार्यविघात l
” प्रथमग्रासी मक्षिका पात ” l तैसा डोकावत होता की ll 126ll

सवें पाहूनि सर्व सामान l यवन पुसे मज “कोठे गमन” l
तवं म्हणे मी दादरासी जाउन l मेल साधीन मनमाडची ll 127 ll

तव तो सुचवी वेळेवर l उतरुं नका दादरावर l
मेल न तेथें थांबणार l बोरीबंदर गाठावे ll 128 ll

होती न वेळी ही सुचना l मेल दादरवर मिळती ना l
नकळे मग या चंचल मना l काय कल्पना उठल्या ते ll 129 ll

परि ते दिवशी प्रयाण योग l साधावा ऐसाचि होता सुयोग l
म्हणोनि मध्यंतरी हा कथाभाग l घडला मनाजोग अवचिता ll 130 ll

श्री नानासाहेबानी बाबांविषयी सांगितल्यानंतर हेमाडपंत श्रीसाईनाथांच्या दर्शनास जाण्यास तयार झाले. परंतु मित्राच्या मुलाच्या मृत्युची घटनेने त्याना त्यांच्या निश्चयापासुन परावृत्त केले. आपण आपल्या जीवनात डोकावले तर आपलेही असे अनेक वेळा खुंटे ढिले झालेले आढळतात.

परंतु नानांनाही आपल्या व्याहीस साई दर्शनाचा लाभ व्हावा अशी मनोमन इच्छा होती. म्हणुन पुन्हा त्यानी हेमाडपंताना दर्शनास विलंब न करण्याबाबत सुचवले आणि नक्की जाणार असे आश्वासन घेतल्यावरच तिथुन निघाले.

यानंतर मात्र हेमाडपंत राजी होउन शिरडीस जावयास निघतात. त्यावेळी ते दादर पर्यंत तिकीट काढुन दादर वरुन मनमाड ही मेल पकडणार असतात. अशा वेळी एक यवन चालती गाडी चपळतेने पकडतो. हेमाडपंतांचे सामान पाहुन चौकशी करतो. हेमाडपंतांनी वस्तुस्थिती सांगितल्यावर तो हेमाडपंताना सावध करतो दादर ला न उतरता सरळ बोरिबंदर गाठावे. कारण मनमाडची मेल दादरला थांबणारी नसते. त्याने न मागता दिलेल्या सल्ल्यामुळे हेमाडपंताना गाडी मिळाली व ते शिरडीस पोहोचले.

1. इथे नानासाहेबांचे गुणसंकिर्तन, तसेच जे मला मिळाले ते माझ्या आप्ताना मिळावे, इतकेच नाही तर त्यासाठी आग्रही असावे हा महत्त्वाचा गुण दिसुन येतो. त्यांच्या तोंडुन वदवुन हेमाडपंताना राजी करवले म्हणजेच श्रीसाईंनी नानासाहेबाना त्यांचा नंदी बनवले.

2. हेमाडपंत हे सुशिक्षित आणि वेदवेदांत जाणणारे होते. ते नित्याने ग्रंथ वाचन पठणही करित असत. भागवत मुखोद्गत होते. म्हणजे ते देवयानपंथीच होते. परंतु सदगुरुंशिवाय त्यांचा अध्यात्मिक विकास होणे शक्य नव्हते. बाबानाच याची काळजी म्हणुन त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येणा-या सर्व अडथळ्याना बाबाना काढुन टाकायचे होते. त्यासाठीच त्यांचे इतुके प्रयास.

3. साईनाथांची खरी लिलेची सुरुवात होते ती नानासाहेबांच्या गाडीपासुन. नानांना वसईला जाण्यासाठीची गाडी येण्यास एक तास अवकाश होता. तेव्हा ती वेळ सत्कारणी लावावी असा विचार येताच वांद्र्यापुरती एक गाडी आली. हा योगायोग नसुन साईनाथांची करणीच होती. त्यावेळेत त्यानी हेमाडपंताची भेट घेउन मन वळविले होते.

4. मग हेमाडपंत राजी होउन शिरडीस निघाले म्हणजे बापुंनी सांगितल्याप्रमाणे त्याचे पहिले पाउल. प्रत्येक जीवाकडुन सदगुरुस या पहिल्या पाउलाचीच अपेक्षा असते. बाकीची पावले सदगुरु आपल्यापर्यंत येत असतातच. अगदी त्याचप्रमाणे बाबांचे यवन रुपी पाउल हेमाडपंतांच्या जीवनात पडले. जसे हेमाडपंतानी पहिले पाउल टाकले बाबा त्याच्या दिशेने धावत सुटले. म्हणुन त्यानी गाडी सुटायच्या आत चपळतेने पकडली. मी सदगुरुंपर्यंत पोहोचावे हा सदगुरु संकल्पच असतो. त्याचा संकल्प स्विकारणे हे माझे फक्त माझ्यावर अवलंबुन असते म्हणजेच कर्मस्वातंत्र्य.

5. बाहेरगावी गेलेलं बाळ घरी येणार म्हटल्यावर आईच्या जीवाची जी घालमेल असते तीच या सदगुरु तत्त्वाची असते. मग आई जशी त्याच्या येण्याच्या अगोदर सगळी तयारी करुन तत्पर असते.तशीच ही गुरुमाउली. म्हणुन हेमाडपंत जेव्हा दादरवर उतरण्याचा चुकीचा निर्णय घेतात तेव्हा ही गुरुमाउली पुन्हा त्यांचा मनात विकल्प निर्माण होउ नये म्हणुन यवन रुपात त्याना सावध करती झाली.

6. आपल्या जीवनातही जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो तेव्हा झालेल्या नुकसानीचे खापर देवावर फोडतो. पण त्यावेळी आपल्याला सदगुरुनी कोणत्यातरी रुपात सावध केलेले असतेच. पण मला ते ओळखता येत नाही म्हणुन मी कोणाचे ऐकत नाही. आपल्याही बापुंबद्दल सांगितल्यानंतर किती जणानी पटकन विश्वास ठेवला ? पुढील प्रगती त्यानुसारच झाली. सदगुरु आपल्या भक्ताची साथ कधीच सोडत नाहीत. पण आम्हीच तो बरोबर आहे या जाणिवेचा विसर पडलेला असतो.

तो नेहमी बरोबर असतोच मला त्याच्याबरोबर रहाता आलं पाहीजे म्हणजे मी सावध असले पाहीजे. इथे हेमाडपंताना त्याच क्षणी विश्वास बसतो की ही साईनाथांची योजना असावी. हेच त्यांचे विश्वासाचे पहिले पाउल असे मला वाटते. जर हेमाडपंतानी त्या यवनावर विश्वास ठेवुन ऐकले नसते तर ते शिरडीस पोहोचले नसते. म्हणुन तो यवन त्यांच्यासाठी साईनाथच आहेत.

7. यवन एक गाडी सुटता l अति चपळतां आंत ये l

इथे गाडी म्हणजे श्रसाईनाथांच्या दिशेने वाटचाल असे मला वाटते. या देवयान पंथावर आरुढ झालेल्या हेमाडपंतांची गाडी चुकताच विकल्प येउ नये म्हणुन साईनाथांची ही चपळता. त्याकरिता हा यवन अति चपळता आत येतो. म्हणजेच वेळेवर शिरकाव करतो. या त्रिविक्रमाची येण्याची वेळ कधीच चुकत नाही. किंबहुना ती गाठण्यासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावतो. आज बापुंच्या तपश्चर्या, उपासना, नित्याचे जागरण ही भक्तांच्या उद्धारासाठीची चपळता नाही तर काय आहे? या चपळतेमध्ये तत्परता, तन्मयता, ओढ, वात्सल्य, प्रेम इ. अनेक अर्थ दडलेले आहेत. म्हणजेच काय तर हा साईनाथच त्यांच्या लेकराला भेटण्यास जास्त आतुर आहे.

सवें पाहूनि सर्व सामान l यवन पुसे मज “कोठे गमन” l

हेमाडपंतानी काहीही चौकशी केली नसतानाही स्वत:हुन तो यवन प्रश्न विचारतो आहे. यावरुन आई जशी बाळाच्या प्रत्येक हालचालीवर काळजीने लक्ष ठेवुन असते आणि चौकशी करत असते. तसे हा यवन विचारतो आहे. खरं पहाता रेल्वेच्या त्या डब्यात चौकशीच करायचीच असती तर किती तरी प्रवासी होते. पण प्रश्न फक्त हेमाडपंताना विचारला गेला. यावरुन तो यवन हेमाडपंतासाठीच गाडीत आलेला होता.
हा अकारण कारुण्याचा महासागर आहे आणि याच्याकडे अपरंपार प्रेम आहे हेच दिसुन येते.

तव तो सुचवी वेळेवर l उतरुं नका दादरावर l
मेल न तेथें थांबणार l बोरीबंदर गाठावे ll 128 ll

तो त्याची वेळ नेहमीच पाळतो तसेच आपल्या भक्ताना सुचित ही करत असतो. आज या कलियुगात जे काही घडते आहे त्या घडामोडींबाबत बापुही त्यांच्या प्रवचनातुन आपल्याला सुचित करत असतात. प्रत्यक्ष मधुन सावध करतात. म्हणुनच आपल्याला कुठे वेग वाढवायचा आणि कुठे थेट पोहोचायचे याचे मार्गदर्शन करतात म्हणुनच आपली गाडी चुकण्याची आणि चुकीच्या गाडीत बसण्याची वेळ येत नाही.

परि ते दिवशी प्रयाण योग l साधावा ऐसाचि होता सुयोग l
म्हणोनि मध्यंतरी हा कथाभाग l घडला मनाजोग अवचिता ll 130 ll

त्या दिवशी हेमाडपंतानी शिरडी गाठावी असा साईनाथांचा संकल्प होता म्हणुनच तो सुयोग साधला गेला. त्यासाठीच साईनाथाना यवन होउन यावं लागलं. यावरुन आपल्या भक्ताच्या, मग भक्ति त्याच्या कोणत्याही रुपाची केलेली असो, त्याच्यासाठी हा सदगुरु कसा तत्पर असतो हे या यवनाच्या भेटीतुन लक्षात येते. कारण हेमाडपंतानी साईरुपाची भक्ती केली नसली तरी ते देवयानपंथावरचे होते.

साईनाथांचा भक्त कणव आपणास इथे पाहायला मिळतो. यांच्या कारुण्याचा स्त्रोत स्वभक्त हितार्थ कुठेही कधीही आणि कुठेलेही रुप घेउन प्रकटत असतो. कधी वाट चुकु नये म्हणुन वाटाड्या बनुन तर कधी अघोरी शक्तींच्या त्रासातुन सोडवणुक करण्यासाठी प्रत्यक्ष प्रकट होउन. आपण सर्वच जाणतो प्रवीण वाघांच्या सकटातही बापु असेच धावुन गेले होते. प्रत्येक अवतारात ही माउली अशीच धाव घेत असते. जवळ घेण्यासाठी हातही पसरलेलेच आहेत. मला फक्त संपुर्ण विश्वासाने स्वत:ला सोपवता आलं पाहीजे.

आपण प्रवास करताना म्हणजे जीवन रुपी प्रवासामध्ये तन मन बुद्ध्यादी ओझी वाहुन प्रवास करत असतो. शरिराची तगमग, मन चंचल तर, बुद्धी अस्थीर असे विचारांचे ओझे घेउन जीवनाचा प्रवास करत असतो. तेव्हा हा यवन रुपी वाटाड्या जीवनात येतो. आणि अचुक मार्गदर्शन करतो. बापु सांगतात गाडीत बसल्यावर आपली ओझी मांडीवर घेउन बसता का ? ती जशी निर्धास्त पणे डेकवर टाकता तसेच तुमची सर्व ओझी त्याच्या पायावर घाला. कारण आपल्या ओझ्यांची काळजीही त्यालाच असते.

संपुर्ण श्रीसाईसच्चरितातील सर्व कथा या “एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ” या तत्त्वावर आधारलेल्या आहेत. ज्याप्रमाणात विश्वास त्याच प्रमाणात प्रत्येकाला प्रचिती आलेली आहे. साई रुपातही आणि साईअनिरुद्ध रुपातही.

हरि ओम , श्रीराम , अंबज्ञ.

अंबज्ञ स्वातीवीरा कुडव
नानाचौक, मुंबई.