Home » Marathi » मर्मज्ञ मार्गदर्शक (Falguni Pathak)

मर्मज्ञ मार्गदर्शक (Falguni Pathak)

English हिंदी

फाल्गुनी पाठक  (Falguni Pathak)Falguni feature image

मी गेली २७ वर्षे गात आहे. माझं गाण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वगैरे झालेलं नव्हतं. पण रेडिओवर गाणं ऐकता ऐकता मी गायला लागले. वयाच्या नवव्या वर्षी मी पहिला स्टेज शो केला. त्यानंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. मी गात राहिले, यश मिळत गेलं. काही कमी पडत नव्हतं. तरीही आपलं संगीत शिक्षण झालेलं नाही, आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, याची सल मनात होती. पण मी बापूंकडे आले आणि माझं संगीत शिक्षण सुरू झालं.

माझी मैत्रिण शीतल हिने खूप आग्रह केला म्हणून मी २००४ साली बापूंकडे दर्शनासाठी आले. सुरुवातीला मी गुरुवारी दर्शन घेऊन जात असे. पण हळूहळू संस्थेच्या उत्सवांमध्ये सहभागी होऊ लागले. पुढे मी बापूंच्या भक्तपरिवाराचा भाग कधी बनले ते माझं मला कळलं नाही. मी बापूंना सद्गुरु मानू लागले. आणि मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे माझे सद्गुरु अगदी आमच्यासारखेच राहतात. आम्ही सिनेमाला जातो, तसे तेदेखील सिनेमा पाहतात, कुटुंबाबरोबर फिरायला जातात, हे सगळं वेगळं वाटलं. सद्गुरु असूनही त्यांचं आमच्यासारख्या सामान्यांप्रमाणे वावरणं मला अतिशय भावलं. विशेषतः मला जसं संगीत आवडतं, तसंच त्यांनाही संगीत आवडतं, हे कळल्यानंतर मला खूपच आनंद झाला.

मराठी मातृभाषा नसलेल्यांसाठी बापूंनी ‘मराठी क्लासेस’ सुरू केले होते. इथे बापू मराठीबरोबरच इतर अनेक गोष्टी शिकवायचे. अगदी साध्या साध्या गोष्टीतून खूप मोठे बदल घडून येतात, हे या क्लासमध्ये मी पाहिलं. साधं आपल्या आवडत्या सिनेगीतांचं उदाहरण घ्या. जुन्या हिंदी सिनेमातली गाणी कुणाला आवडत नाही? नायिकेने नायकाला किंवा नायकाने नायिकेला उद्देशून म्हटलेली ही गाणी आपण आपल्या भगवंताला उद्देशून गायलो तर… संगीताचं काम आहे भाव उत्पन्न करणं. जेव्हा तुम्ही हिंदी सिनेमातलं गाणंही भगवंताच्या प्रेमाने भारून गाता, त्यावेळीही तुमचा भाव त्याच्यापर्यंत पोहोचतोच. हा विचार बापूंनी दिला. ही गाणी मी पूर्वीही ऐकलेली होती आणि कायम गातही आले होते. पण आता मला ही गाणी ऐकताना वेगळं वाटतं. मनात भक्तीभाव उमटतो.

मदन मोहन हे बापूंचे सर्वात आवडते संगीतकार. वो भूली दास्तॉंन, त्यांची यू हसरतों के दाग, आप की नजरोनें समझा, लग जा गले, ही गाणी बापू दिवसभरातून कितीही वेळ ऐकू शकतात आणि कितीही वेळा ऐकून ते प्रत्येक वेळी तितकेच खूष होतील, असं मला वाटतं. मोहम्मद रफी हे बापूंचे आवडते गायक. त्यांच्याबद्दल बापू भरभरून बोलतात.

बापूंचं संगीतावरचं प्रेम केवळ हिंदी सिनेमातील गाण्यांच्या आवडीपुरतं मर्यादित नाही. तर त्यांना संगीताची सखोल जाण आहे, याची जाणीव मला हळूहळू होऊ लागली. दर गुरुवारी श्री हरिगुरुग्राम येथे सत्संग होतो, गजर गायले जातात. मी या टीमची सदस्या आहे. या गजरांची तयारी करणार्‍या टीमची बापूंबरोबर मिटिंग होत असते. या मिटिंगमध्ये बापूंनी केलेलं मार्गदर्शन आणि दिलेल्या सूचना इतक्या परिपूर्ण असतात, की त्याला दुसरा पर्याय असूच शकत नाही.

गजरांना चाल लावायची असेल तर ती कशी लावायची. सा कसा लावायाचा, ठेका कसा द्यायचा, हे बापू अगदी सहजतेने शिकवतात. संगीत क्षेत्रात अडीच दशकाहून अधिक काळ घालवणार्‍या माझ्यासारख्या गायिकेला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी बापूंनी लक्षात आणून दिलेल्या आहेत. काही गजर आणि अभंगांना त्यांनी आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, अशा चाली बांधून आम्हाला दाखविलेल्या आहेत. आरतीमध्ये हार्मोनियम नको, इथे नगारा हवा, इथे टाळ हवा, तबला वापरा, पखवाज वापरा, अशा सूचना बापू देतात. त्यावेळी का? हा प्रश्‍न आम्ही विचारत नाही. ही सूचना अमलात आणली की त्या ‘का?’चं उत्तर मिळतं. 

falguni_title(1)आधी सांगितल्याप्रमाणे मी शास्त्रशुद्ध संगीत शिकलेले नाही. गाणी ऐकत गेले आणि गात राहिले. पण बापूंनी चांगलं गाणं गायचं असेल, तर चांगलं संगीत ऐकणं भाग आहे, असं सांगून आमच्याकडून अभ्यास करून घेतला. किशोरी आमोणकर, मोगूबाई कुर्डीकर, जोत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार या थोर गायिकांची गाणी ऐका. त्यातून तुम्ही खूप काही शिकाल, हे बापूंनी शिकवलं. पूर्वी मी शास्त्रीय संगीत ऐकत नसे. मराठी नाट्यसंगीताचाही मला आवड नव्हती. पण बापूंनी सांगितल्यानंतर ऐकू लागले आणि मला त्याची गोडी लागली.

काही वेळेस बापूंनी नामवंत गायक, गायिकांच्या सीडीज् आम्हाला ऐकवलेल्या आहेत. त्या ऐकताना बापूंना पाहणं म्हणजे सोहळा असतो. या गाण्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द त्यांना पाठ असतोच पण त्याच्या बरोबरीने या गाण्यातला प्रत्येक आलाप आणि हरकती देखील बापू जसेच्या तसे गातात. ते पाहून मला संगीत किती तन्मयतेने ऐकायचं याचं प्रात्यक्षिकासहीत शिक्षण मिळतं. त्यामुळे मला इतकी वर्षे संगीत क्षेत्रात काम करून आत्ता कुठे माझं शिक्षण सुरू झालंय, असं वाटू लागलं आहे.

माझ्याकडे गजर रेकॉर्ड करण्याचे काम बापूंनी सोपवले. व्यावसायिक गायिका असले तरीही मला रेकॉर्डिंग बाबतची तांत्रिक माहिती नव्हती. कोरस वगैरे कसा असावा हे बापूंनी सांगितलं. कोरसमध्ये ३० टक्के महिला व ७० टक्के पुरुष गायक असावे, तरच समतोल साधला जातो. कारण एका महिलेचा आवाज तीन पुरुषांच्या बरोबरीचा असतो, हे ज्ञान बापूंनीच दिलं. गजर रेकॉर्ड करून बापूंना ऐकवला की त्याच्या अनेक ट्रॅकमधून कुणाचा सूर कमीजास्त लागलेला असतो, हे ऐकताचक्षणी बापूंना कळतं. चेतनचा आवाज कमी का? देवेंद्रचा आवाज का वाढलेला आहे? असे नेमके प्रश्‍न ते विचारतात. यावरून ते किती सूक्ष्म गोष्टी टिपतात हे स्पष्ट होतं. या क्षेत्रातील दर्दी मंडळींसाठीही हे आव्हान ठरू शकतं.

कधीकधी वाटतं बापू सद्गुरु आहेत. त्यांना काय अशक्य? पण दुसर्‍याच क्षणी लक्षात येतं, मानवी पातळीवर असलेल्या आपल्या या सद्गुरुने अभ्यास आणि परिश्रमाने हे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केले आहे. या त्यांच्या ज्ञानाला मात्र आपण कुठल्याही मर्यादेत, म्हणजे त्यांना केवळ फिल्मी किंवा अमुक एका प्रकारचं संगीतच कळतं, अशा मर्यादेत बांधू शकत नाही. काही दिवसांपूर्वीच ते एका कौटुंबिक समारंभात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या डॉ. जयेश शहा यांना दमयंती बारडाई यांची सीडी आत्ताच्या आत्ता आण असं सांगितलं. ही सीडी मिळाल्यानंतर त्यांनी दमयंती बारडोई यांची गाणी उपस्थितांना ऐकवली. इतकंच नाही, तर दमयंती बारडोई यांच्या संगीताबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. ते ऐकून स्तिमित झाले. कारण दमयंती बारडोई ह्या गुजराती लोकसंगीत गायिका. त्यांच्याबद्दल बापूंना इतकी तपशीलवार माहिती?

असाच आणखी एक धक्का मिळाला. जुन्या काळातला एक गरबा आहे – ‘रंग ताळी रंग ताळी रंगमा रंग ताळी’. हा गरबा माझी आजी गायची. तो देखील बापूंनी एकदा अचानकपणे आमच्यासमोर गायला. केवळ गुजरातीच नाही, तर अन्य राज्यातील लोकसंगीताचे प्रकार, शास्त्रिय संगीताचे प्रवाह यांचं बापूंना ज्ञान आहे. हे ज्ञान मुक्तहस्ते वाटण्यासाठी ते उत्सुक असतात. मी लुटून घ्यायलाच आलो आहे, असं सांगणारे बापू ज्ञान देताना कधीही आखडता हात घेत नाहीत. पण हे करताना आपण काहीतरी वेगळं करतो किंवा वेगळे आहोत, हे बापू कुणालाही जाणवू देत नाहीत.

संगीताचे इतके अफाट ज्ञान असूनही मला खूप कळतं हा भाव बापूंकडे मी कधीही पाहिला नाही. उलट गायक आणि वादकांशी ते अगदी मित्रासारखी चर्चा करतात. प्रसंगी त्यांच्याकडून माहितीही घेतात. आपल्या ज्ञानाचा बडेजाव न मिरवणारे बापू सहसा कुणाचं लक्ष न जाणार्‍या वादकांच्या कामालाही दाद देतात. इतकंच काय कार्यक्रमात त्यांच्यासमोर गाणारे व्यावसायिक गायक गायिकादेखील अचंबित झालेले मी पाहिले आहेत. ‘काय सांगायचं, आम्ही गातो ते गाणं बापूंना पाठ असतं. ते आमच्याबरोबर गात असतात. आमचंच काही चुकेल अशी भीती वाटते’ अशी कबुली माझ्याकडे व्यावसायिक गायकांनी दिलेली आहे. मी म्हणते – ‘ऐसा ही है मेरा बापू’

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

English हिंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Real Time Analytics