जाणीव - भाग ६ (Consciousness - Part 6)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव - भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले.

तो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी काय करायला पाहिजे? जुळवून घ्यायला पाहिजे.

आपण निसर्गाला वळवू शकतो, त्याला जिंकू शकत नाही, काय करू शकतो? वळवू शकतो, जिंकू शकत नाही आणि असा ज्याला ज्याच्यावर आपण आपली सत्ता गाजवू शकत नाही असा हा जो निसर्ग आहे, त्या निसर्गावर सत्ता कोणाची, तर सगळं सुरळीतपणे चाललेलं आहे, मग अशी सत्ता आहे ह्याची त्याला जाणीव झाली, जाणीव परत काय आहे, जाणीव आहे आणि मग ती सत्ता त्या मनुष्याला त्या जीवनामध्ये स्वत:च्या त्याला अशी मदत निसर्गाने दिसू लागली, आलं लक्षामध्ये. जीवशृंखलेमध्ये, प्राणीशृंखलेमध्ये, वनस्पतिशृंखलेमध्ये त्याला अशी मदत निसर्गाची ठायीठायी दिसायला लागली, तो सत्ता ओळखायला लागला की सत्तेमागचा हात दिसत नाही आहे म्हणजे सत्ता डेफिनेटली आहे. मग ती सत्ता ओळखता-ओळखता त्याला जाणीव झाली की सत्ता, जी फुलांमध्ये काम करते, जी सापामध्ये काम करते, तीच बेडकामध्ये काम करते, जी उंदरामध्ये काम करते, तीच सापामध्ये काम करते.

अशी सत्ता जी आहे की परस्परविरोधी गोष्टींचं ती संतुलन राखते. उन्हाळा जी आणते तीच पावसाळा आणते. उन्हाळ्याची सत्ता वेगळी नाही, पावसाळ्यावर चालणारी सत्ता एकच. सत्ता ह्या तीनही गोष्टी फिरवते आणि हा एकचपणा, ही एकच सत्ता आहे हे त्याने ज्या क्षणाला ओळखलं, त्या क्षणाला त्या सत्तेचं स्वरूप त्याला दिसायला लागलं. प्रत्येक वेळी निसर्गामध्ये अनेक अडचणींवर मात करून पुढे जाताना, तोंड देत पुढे जाताना, स्वत:ला स्वत:चा बचाव करताना त्याला निसर्गातील अनेक घटक मदतीला कसे यायला लागले ह्याची त्याला जाणीव झाली. अगदी उत्क्रांतिवाद म्हटला तरी तिकडे वणव्यामध्ये जळलेली जनावरं, ती पोट भरण्यासाठी खाताना त्याला कळून चुकलं की जर मांस शिजवलं तर अधिक चांगलं लागेल. पूर येऊन गेल्यानंतर जो गाळ बसायला लागला त्या गाळामधून जमीन अधिक सुपीक झाली म्हणजे पुरासारख्या भयंकर स्वरूपातूनसुद्धा किती चांगलं घडतंय ह्याची जाणीव त्याला व्हायला लागली. त्या जाणिवेतून त्याला जाणीव काय कशी उत्पन्न झाली की ही सत्ता कशी आहे? तर प्रेमळ आहे. ती सत्ता आहे, पण ही प्रेमळ सत्ता आहे.

मग त्या प्रेमळ सत्तेला आपापल्या कुवतीनुसार वेगळं नाव दिलं असेल, पण हीच ती परमेश्वराची जाणीव आणि मनुष्याला परमेश्वराची जाणीव झाली ती जाणिवेतूनच झाली लक्षात ठेवा. म्हणजे मनुष्याला परमेश्वराची ओळख पटणं हीसुद्धा कोणाची कृपा आहे? त्या आदिमातेचीच कृपा आहे. पण ती कृपा जर आपण करप्ट केली असत्याने वागून वागून, तर आपण देवाला ओळखू शकणार नाही कारण देवाने पाठवलेला संदेश, देवाने पाठवलेली मदत आपण ओळखू शकणार नाही. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥