जाणीव - भाग ४ (Consciousness-Part 4)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात 'जाणीव - भाग ४ (Consciousness-Part 4)' या बाबत सांगितले. 

समाजात वावरायला काही ठिकाणी खोटं बोलावंच लागतं. पण ज्या खोटं बोलण्याने दुसर्‍याला दु:ख होतं, दुसर्‍यावर अन्याय होतो, ज्या खोटं बोलण्याने दुसर्‍यावर अन्याय होतो आणि ज्यामुळे तुम्ही अपवित्र बनता, ते असत्य. पटलं? ज्या तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे, आलं लक्षामध्ये, दुसर्‍याला दु:ख होतं कारण त्याच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही अपवित्र बनता, त्यामुळे हे असत्य आणि हे असत्य ज्या प्रमाणामध्ये आपण बोलतो वागतो, त्या प्रमाणामध्ये आपल्या जाणिवा क्षीण होत जातात आणि आपल्या जाणिवा कमी झाल्या की परमेश्वराला सुद्धा आपल्याला प्रतिसाद देता येत नाही. देवाची हाक आपल्याला ऐकू येत नाही.

तुम्ही म्हणाल, बाप रे! देवाची हाक नकोच ऐकायला, नाही तर त्याचा अर्थ काय लावू, नाही तर देवाने हाक मारली, ये बाबा वरती, तशी ती हाक नसते. परमेश्वराची हाक असते, त्या परमात्माची हाक असते, ती कशासाठी असते? तुम्हाला सावध करण्यासाठी, तुम्हाला सावध करण्यासाठी, संकटातून वाचवण्यासाठी. ‘अरे थांब पुढे पाय टाकू नकोस’, ही हाक ऐकू येऊ शकत नाही, पटतंय.

त्यामुळे आयुष्यामध्ये मनुष्याने काय बाळगलं पाहिजे कायम, की माझ्याकडून कोणावर अन्याय होणार नाही, माझ्या खोट्या वागण्यामुळे किंवा माझ्या खोट्या बोलण्यामुळे किंवा माझ्या खोट्या आरोपांमुळे कुणावर अन्याय होणार नाही ह्याची अतिशय मोठी काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे कारण आपल्याला तेवढी बुद्धी परमेश्वराने दिलेली आहे. तुम्ही म्हणाला बापू! आम्ही एवढे स्मग्लर अमुक-तमुक सगळे जण आपण बघतो की एवढं खोटं वागत असतात, इतरांवर अन्याय करत असतात. अरे तुम्हाला दुसर्‍यांचं काय पडलंय?

उद्या तुमच्या अंगात ताप आला, बरोबर, समजा एक हजार जण पिकनिकला गेलात, तुमच्या अंगात ताप आला, तुम्ही हट्ट धरून बसाल का की बाकीच्यांना का नाही आला, मलाच का? तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या तापावर औषध घ्या आणि आनंद करा ट्रीपचा. बाकीच्यांना का आला नाही म्हणून दु:ख करत बसलात तर काय होईल? आणखीन ताप वाढेल कमी व्हायच्या ऐवजी, उलट ब्लडप्रेशर पण वाढेल त्याच्याबरोबर, बरोबर. कारण प्रत्येक जिवाचा मार्ग स्वतंत्र आहे, कोणी दुसर्‍याच्या लाईनमध्ये घुसू शकत नाही, पटलं?, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥